मातृदिन आणि आई....

स्त्री मग ती कोणत्याहि रूपात असो आई ,बहीण, आजी, मावशी,आत्या, काकी प्रत्येक स्त्री एक आई असते आणि तिच्यात दडलेली असते माया ममता वात्सल्य. मातृदिनाच्या दिवशी खुप साऱ्या पोस्ट पाहिल्या आई वरच्या कविता वाचल्या पण जी शब्दांत मांडता येत नाही ती असते एक आई. जी भावनांच्या पलीकडे जाऊन आपल्या मुलांच सुख पाहत असते ती असतें एक आई ,जी मरणाच्या दारात जाऊन एक जीव जन्माला घालते ती असते आई.जी आपल्या सगळ्या चूका पदरात घेते ती असते आई.
आई ,मम्मी, माँ,अम्मी किती नावं आणि किती धर्म पण माया मात्र तीच प्रेम मात्र तेच .हळवी प्रेमळ आई आपल्या मुलांवर संकटं येताच कणखऱ खंभीर ढाल बनुन मुलांवरच संकट आपल्या अंगावर झेलते आणि म्हणूनच ती एक आई असते.
आजहि आपल्या देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे मुलगी जन्माला येणं पाप आहे स्रीभ्रूणहत्येची अनेक उदाहरणं आपण पाहतो मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे ओझ. पण त्याच वंशाच्या दिव्याला एक ओझ वाटणारी मुलगी मिळाली नाही तर तो तरी कसा तेवत ठेवणार तुमच्या वंशाचा दिवा? खरं तर आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत असताना स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत प्रत्येक क्षेत्रांत स्त्री अग्रगण्य आहे पण दुसरीकडे त्याच देशात त्याच स्त्रीवर भयंकर अत्याचार होतायत कुठे तिला जन्मा आधीच मारून टाकलं जातंय तर कुठे तिला शिक्षणापासुन वंचीत ठेवलं जातंय तर कुठे तिला वासनांध लोकांचा बळी व्हावं लागतय..
मातृदिनानिम्मित्त किमान प्रत्येक मुलानं आपल्या आईला एक जरी वचन दिलं ना तरी खूप झालं. ते वचन असेल मातृत्व जपण्याचं स्त्रीत्व जपण्याचं तिचा आदर करण्याचं तिला एका आईच्या रूपात पाहण्याचं.
वंशाचा दिवा म्हणून आई वडील लाडात वाढवतात थोडे पंख फुटले की मग तेच दिवे उडायला लागतात आणि लग्नानंतर हळू हळू आई नकोशी होत जाते. थकलेली आई मग ओझ बनते तीचं प्रेम मग कटकट वाटू लागतं आणी सुरू होतो वृद्धाश्रमाचा प्रवास. आईला नातवंडासोबत खेळायचं असतं पण जीनं आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं त्या आईला आता लहान मुलांना सांभाळणं जमेनासं झालेलं असतं तिच्या जागी कोण्या परक्या बाईला आया म्हणुन ठेऊन भरगच्च पगार दिले जातात पण मायेची सावली मात्र नकोशी होते. नातवंडाशी खेळण्याच्या वयात म्हातारी एकटी पडते सोबतच्या म्हाताऱ्यांसोबत मग वेगळ्याच विश्वात रमते.
असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी पण आजच्या तिन्ही जगाच्या स्वामीला आई नावाची संपत्ती नको वाटते. पैसा संपत्ती इतकी श्रेष्ठ वाटते कि आईच मग भिकारी होते. अपडेटेड जमान्यामध्ये मग आई आऊटडेटेड होते. आपल्या कुटुंबामधून हळुच आई वेगळी होते आपल्या मुलांना मोठं करताना आईच मागे उरत जाते.
म्हातारपणं जसं दार ठोठावत तेव्हा कळते आईची फरफट आपल्याच डोळ्यांनी जेव्हा आपलीच मुलं आपल्याला वृद्धाश्रमात नेतात तेव्हा कळतात आईच्या वेदना. मरणाच्या दारात जेव्हा उभे राहतो तेव्हा दिसते चितेवर पेटणारी आई आणि आपली चिता रचल्यावर दिसते आपल्या वेदनांनी रडणारी आई.
मित्रांनो मातृ दिवस नक्की साजरा करा पण कोणता एक दिवस नाही आपला प्रत्येक श्वास आपला प्रत्येक क्षण आईचा ऋणी आहे आणि ह्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाहीं आपल्या हातात आहे फक्त तिला जपणं .ज्या दिवशी आपल्या देशात प्रत्येक स्त्रीला आईच्या रूपात पाहिलं जाईल तोच दिवस खऱ्या अर्थाने मातृदिन असेल. ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद होतील तो दिवस असेल मातृ दिवस.
-स्नेहा शिंदे .