वैशाख  वणवा....-स्नेहा शिंदे.

CRIME BORDER | 16 September 2022 05:59 AM

CRIME BORDER CORNER 

रकरखत्या  दुपारशी माझं गेल्या जन्माचं काय नातं आहे कोण जाणे ? पण ती रखरखती दुपार आणि रणरणत ऊन ह्याच मला प्रचंड आकर्षण आहे. बहुतांश लोक मला ह्या बाबतीत वेड्यात काढतील कारण फारशी कोणाला दुपार आवडतच नाही अन त्यांना आवडते ज्यांना दुपारची झोप काढायची असते किंवा मग दुपारचीच वेळ त्यांना थोडी निवांत मिळत असते. पण मला दुपारच्या रणरणत्या उन्हात प्रवास करायला फार आवडत. उन्हात चमकणारी झाड कमी झालेली माणसांची वर्दळ सगळीकडे निरव शांतता जी शहरात संध्याकाळची मिळणे कठीणच. दुपारच्या वेळी लोकलने प्रवास करताना गर्दी देखील तशी कमीच असते त्यात खिडकी शेजारची सीट मिळाली कि मग दुग्धशर्करा योग साधल्याचा कोण आनंद होतो मनाला. मग खिडकीबाहेरून रकरखत्या उन्हातली दृश्य मनात साठवता साठवता प्रवास कधी संपतो हे कळत देखील नाही. 

 

आज देखील असाच भर दुपारी प्रवास करण्याचा योग आला. खिडकीतून ठिकठिकाणी बहरुन आलेला गुलमोहर दिसत होता. भर उन्हात तो मोठ्या दिमाखात उभा होता. पानन् पान फुलांनी झाकून गेलेलं अखंड गुलमोहर लाल रंगात न्हाऊन गेलेला. झाडाखाली पडलेला  फुलांचा सडा पाहून वाटत आताच फुलांचा पाऊस पडून गेला असावा. अहाहा ss गुलमोहराच्या फुलांचा पाऊस नुसत्या विचारानेच भर उन्हात अंगावर शिरशिरी आली. प्रत्येक ऋतूत निसर्ग बहरलेलाच असतो. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला, हिवाळ्यात दवबिंदूंनी सजलेला अन उन्हाळ्यात फुला फळांनी लगडलेला. प्रत्येक ऋतूत निसर्गाचं रूप न्याहाळण्याजोगं असत. तो कधी म्हणत नाही पावसाळा आल्यावरच मी आनंदात राहीन तर मग आपण माणसांनी तरी का संध्याकाळच्या शीतल छायेची अपेक्षा करत रखरखीत दुपार कंटाळवाणी घालवायची. दुपार माणसाला खूप काही शिकउन जाते मग ती त्या दिवसाची दुपार असो कि आयुष्याची. 
-स्नेहा शिंदे.