स्पर्श (मायेची आठवण )
रविवार म्हटलं कि दिवस थोडा उशिरानेच सुरु होतो. आज बाहेर जायचं म्हणून काहीश्या घाईतच मी सगळ आवरल आणि घरा बाहेर पडली.स्टेशनला पोहचताच तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत माझी ट्रेन सुटली होती. आज रविवार असल्याने गाड्या उशिरानेच होत्या. त्यात मला बदलापूरला जायचं असल्याने तिकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता आता अर्धा तास तरी मला दुसरी ट्रेन नव्हती. दुपारचा पावणे एक वाजला होता आता फारच उशीर होणार असा विचार करून मी प्लॅटफॉर्मवरच्या एका बाकावर जाऊन बसले. बाजूला एक साठ पासष्ट वर्षांच्या आजी बसल्या होत्या. हिरव्या रंगाची पायघोळ नऊवारी साडी, डोक्यावर पदर कपाळावर भलं मोठं कुंकू, हातात हिरव्या बांगड्या पायाशी दोन पिशव्या एकंदर त्यांच्याकडे पाहून त्या गावाकडच्या वाटत होत्या. इतक्यात त्यांनी माझ्याकडे कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची चौकशी केली. मी त्याना सांगितल आता एक वाजून सतरा मिनिटांची खोपोली ट्रेन आहे ह्यातून तुम्ही जाऊ शकता. मग त्यांनी आणखी चौकशी सुरु केली.
"कर्जतवरन म्होरं लोणावळ्याला जायला ट्रेन हाय का ? "
मला काही फारशी माहिती नसल्यान मी म्हणाले कर्जतवरून जाणाऱ्या ट्रेनबद्दल मला काही माहित नाही पण खोपोलीवरून तुम्हाला लोणावळ्याला जायला गाड्या मिळतील.
"खोपोली कर्जतच्या म्होरं आलं काय ? आजीनि पुन्हा प्रश्न केला."
हो मी माझ्या बहिणीला फोन करून विचारते तिथून कस जायचं ते आणि तुम्हाला सांगते. इतकं बोलून मी बहिणीला फोन लावला. तीन सारी माहिती दिली मी फोन ठेऊन आजींना म्हटलं.
"आजी तुम्ही खोपोलीलाच जा तिथून तुम्हाला इको गाड्या मिळतील त्या लोणावळा स्टेशनला तुम्हाला तीस रुपयांत सोडतील."
"तिथन म्होरं मला पिंपरीला जायचं हाय. तिथं माझी लेक ऱ्हाते तिच्याकडं जायचं हाय."
आजी बऱ्याच बोलक्या असल्याने सगळ काही सांगत होत्या त्या दिव्याला त्यांच्या मुलाकडे राहत होत्या आणि आता त्या त्यांच्या लेकीकडे पुण्याला चालल्या होत्या. आजींना तीन मुल आणि तीन मुली होत्या त्यांच्या शरीर यष्टीकडे पाहता तरी त्यांना इतकी मुल असतील असं वाटत देखील नव्हतं. बोलता बोलता अर्धा तास कसा निघून गेला कळलं देखील नाही. एक सतरा ची खोपोली ट्रेन आली मी आजींची एक पिशवी घेतली आणि आम्ही ट्रेन मध्ये चढलो. ट्रेन बऱ्यापैकी भरलेली होती एक कल्याण सीट मिळाली तोपर्यंत आजींना उभ्यानेच प्रवास करावा लागला. थोड्यावेळाने मी आजींना जेवणाबद्दल विचारल
"व्हय मी डबा आणलाय भाकरी भाजी शेंगदाण्याची चटणी हाय. आजी म्हणाल्या."
"आजी खोपोलीला उतरल्यावर जेऊन घ्या पुढे जायला बराच वेळ जाईल." माझं बोलणं ऐकून आजी हसल्या आणि म्हणाल्या
"बाय तू कधी खाणार देऊ का माझ्यातली भाकरी?"
"नाही आजी मी आता बदलापूरला उतरणार आणि मावशीकडे जाऊन जेवणार आहे दहा मिनिटात पोहचेनच मी."
अंबरनाथ स्टेशन आलं तस मी आजींचा निरोप घेऊन बाहेर जायला निघाले. आजीनी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटलं "बाय सावकाश जा हा."
का कोण जाणे पण आजींचा तो स्पर्श होताच पटकन डोळ्यात पाणी तरळलं. कधी कधी अनोळखी व्यक्ती काही मिनिटातच आपलीशी होऊन जाते हे आपलं आपल्यालाच कळत नाही. तासभरश्या ओळखीने त्या आजी माझ्या मनात कायमच घर करून गेल्या. जड अंतकरणाने मी आजींचा निरोप घेतला. बदलापूर स्टेशनला उतरल्यावर खिडकीतून पाहिलं तर आजी हात दाखवत होत्या. गाडी सुटली आणि आजीनी डोळ्यांच्या कोपऱ्याला लावलेला पदर खाली करत निरोप घेतला. मी भरधाव वेगाने स्टेशन सोडणाऱ्या ट्रेनकडे पाहतच राहिले.
-स्नेहा शिंदे.