स्पेशल व्यक्तीची  स्पेशल  मिठी...

CRIME BORDER | 14 September 2022 07:17 PM

कधी तरी एखादा व्यक्ती नकळत आयुष्यात येते  त्या गोष्टीची आपल्याला जाणीव देखील नसताना. नकळत आपण त्याला आवडतो हि गोष्ट ओघाओघाने तो बोलून जातो आपल्या मनात मात्र शून्य भावना असतात. हळू हळू तो व्यक्ती आपल्याशी बोलू लागतो मग नकळत त्याच्या बोलण्याची सवय लागून जाते. अजूनही भावना शून्य असतात पण सवय मात्र लागलेली असते. आपण जाणून बुजून अंतर ठेऊन वागत असतो पण एका नाजूक क्षणी शेवटी आपण त्या व्यक्तीत गुंततो अन मग सुरु होतो एक स्वर्गमयी दुनियेचा प्रवास. 

त्या प्रवासात आपणच आपल्या सोबत असतो कल्पनेच्या त्या दुनियेत स्वतःच स्वतःला शोधत बसतो. मग दुरून ऐकू येते त्या व्यक्तीची साद अन भान हरपून आपण त्याच्या पाशी धाव घेतो. किती सार मनात साचलेलं शब्दातून व्यक्त होणं केवळ अशक्य. एक घट्ट मिठी सार काही सांगून जाते. मन शांत होत त्याच्या मिठीत सार काही सामावून जात उरतो तो फक्त श्वास. ना काही बोलायचं असत ना काही सांगायचं असत तासन्तास त्या मिठीत राहायचं ती हवीहवीशी वाटणारी एकमेव जागा तशीच अंनत काळापर्यंत टिकली तर आयुष्य सुखकर होऊन जात.अन तुटली तर अर्धवट उरलेल्या स्वप्नांना सोबत घेऊन स्वतःच स्वतःचा आधार बनून पुढे चालत राहायचं. 

 

तो कोपरा ती मिठी शोधायची नाही ती आपसूकच एक दिवस आपली होती ह्या कल्पनेत आणखी काही काळ जगायच. नात्याचा प्रवास फार अवघड असतो सुरवात छान असेल पण शेवट छानच असेल ह्याची शाशवती नसते. पण म्हणून नात्यांवरचा विश्वास ढळू दिलात तर आयुष्यात राम उरत नाही. असं केविलवाणं आयुष्य जगण्यापेक्षा आठवणीतली मिठी आठवून एकांतात तिचा सोहळा साजरा करणं केव्हाही चांगलंच. 

 

- स्नेहा शिंदे.