रशियामधील लग्न:लेखिका - सौ. सुधा नारायण मूर्ती
अलीकडेच (रशीया-पोलंड युद्धापुर्वी) मी रशियामधील मॉस्को शहरात गेले होते. ज्या दिवशी आम्ही तेथील एका उद्यानात गेलो, तो दिवस रविवार होता. उन्हाळा असला तरी रिमझिम पाऊस आणि गुलाबी थंडी पडली होती. मी छत्रीखाली उभी राहून तिथल्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते... तेव्हा अचानक माझी नजर एका तरुण जोडप्यावर पडली.यांचे नुकतेच लग्न झाल्याचे दिसत होते. सडपातळ, सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची ती वधू जवळपास विस वर्षे वयाची दिसत होती व ती खूपच सुंदर दिसत होती.
नवरा मुलगा ही जवळजवळ त्याच वयाचा आणि अतिशय देखणा होता. विशेष म्हणजे तो लष्करी गणवेशात होता. वधूने एक सुंदर पांढरा सॅटिनचा ड्रेस परिधान केला होता, जो मोती आणि सुंदर लेसेसने सजवलेला होता. दोन तरुण नववधू तिच्या मागे उभ्या होत्या आणि 'वेडिंग गाऊन'चे हेम हातात धरून होत्या, जेणेकरून ते घाण होऊ नये. पावसात ते भिजू नयेत म्हणुन एका तरुण मुलाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती.
मुलीने हातात पुष्पगुच्छ धरला होता आणि ती दोघे हात जोडून उभे होते. ते खूप सुंदर दृष्य होते. मला आश्चर्य वाटत होते की ते लग्नानंतर लगेचच या पावसात उद्यानात का आले होते? त्यांना ते नक्कीच आनंददायक ठिकाणी वाटले असणार.
उद्यानात असलेल्या स्मारकाजवळ उभारलेल्या चौथऱ्यावर ते एकमेकांसोबत एकत्र चालत जाऊन त्यांनी त्या स्मारकावर पुष्पगुच्छ अर्पण केले व शांतपणे अभिवादन करीत डोके टेकवले आणि स्मारकाला पाठ न दाखवता हळू हळू मागे सरकतांना मी पाहिले.
हे सर्व काय चालले आहे हे जाणून घेण्याची मला खूपच उत्सुकता होती... त्यांच्यासोबत एक म्हातारा व्यक्ती उभा होता. त्याने माझ्याकडे, मी नेसलेल्या माझ्या साडीकडे पाहिले आणि विचारले, "तुम्ही भारतीय आहात का?"
मी उत्तर दिले- "होय, मी भारतीय आहे." आणि संकोच दूर होऊन आमच्यात मैत्रीपूर्ण संवाद सुरु झाला. या संधीचा फायदा घेत मी काही प्रश्न विचारुन माहिती मिळवण्याचे ठरवले.
मी त्यांना विचारले, "तुम्हाला इंग्रजी कसे कळते?"
"अहो, मी परदेशात काम केले आहे."
"कृपया मला सांगू शकाल का, की त्या तरुण जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या दिवशी युद्ध स्मारकाला का भेट दिली?"
"अहो, ती रशिया मधील एक प्रथा आहे. येथे लग्न साधारणपणे शनिवारी किंवा रविवारी होते. ऋतू कोणताही असो, 'विवाह नोंद कार्यालया'त रजिस्टरवर स्वाक्षरी केल्यानंतर, विवाहित जोडप्यांनी जवळच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय स्मारकांना भेट दिली पाहिजे हा येथील दंडक आहे.
या देशातील प्रत्येक मुलाला किमान दोन वर्षे सैन्यात सेवा करावी लागते. सैन्यात तो कोणत्याही पदावर असो, त्याने लग्नासाठी त्याचा सैनिकी गणवेश परिधान केलाच पाहिजे."
"अहो पण असं का ?"
"हे देशाच्या सैनिकांप्रती नागरिकांनी कृतज्ञता दर्शवण्याचे प्रतिक आहे. रशियाने लढलेल्या विविध युद्धांमध्ये आमच्या पूर्वजांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. त्यांपैकी काही युद्ध आम्ही जिंकलो आणि काही हरलो, पण त्यांचे बलिदान हे नेहमीच देशाची अस्मिता जपण्यासाठी होते.
नवविवाहित जोडप्यांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की ते त्यांच्या पूर्वजांच्या बलिदानामुळे शांत व स्वतंत्र रशियामध्ये राहत आहेत. या उपकारांसाठी व आपल्या भावी जीवनासाठी ते त्यांचे आशीर्वाद मागतात. लग्न सोहळ्यातील मौजमजेपेक्षा देशावरील प्रेम अधिक महत्त्वाचे आहे.
मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग किंवा रशियाच्या इतर कोणत्याही भागात असो, या परंपरेला पुढे चालू ठेवण्याचा आम्हा वृद्धांचा आग्रह आहे. लग्नाच्या दिवशी त्यांना जवळच्या युद्ध स्मारकाला भेट द्यायचीच आहे."
भारतात आपण आपल्या मुलांना येथे काय शिकवतो याबद्दल मला आश्चर्य वाटले. आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या दिवशी आपल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचे सौजन्य आपल्या भारतीयांमध्ये आहे का?
आम्ही साड्यांची खरेदी, दागिने खरेदी करण्यात आणि विस्तृत मेनू तयार करण्यात, डिस्कोमध्ये पार्टी करण्यात व्यस्त आहोत.
या विचारांनी माझे डोळे अश्रूंनी भरून आले.. आणि माझी इच्छा आहे की आपण भारतीयांनी या उदात्त विचार आणि प्रथेमध्ये रशियन लोकांकडून काही धडा शिकावा आणि आपणही आपल्या देशासाठी आणि आपल्या सुरक्षित व संरक्षीत आज आणि उद्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या आपल्या हुतात्म्यांचा आदर करावा...!
मुळ इंग्रजी लघुलेखाच्या लेखिका -सौ. सुधा नारायण मूर्ती - मराठी अनुवाद- मेघःशाम सोनवणे.