खरंच महाराजांचा वारसा आपण जपतोय का ?
आज सोशल मीडियाववर एक व्हिडीओ पाहिला. सहा जूनला महाराजांच्या राज्यभिषेक दिनी तलवारी घेऊन गडावर गेलेल्या मुलांच्या प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीचे पत्रकार घेत होते. ते विचारत होते तलवारी गडावर घेऊन जाणे गरजेचं होत का त्यांनी कुणाला दुखापत होऊ शकते ह्यावर आपलं काय मत आहे ? त्यावर एक वीस पंचवीस वर्षांचा मुलगा म्हणाला तलवार हि महाराजांनी दिलेला वारसा आहे आपण आपला वारसा पुढे न्यायला हवा. पुढच्या पिढीला समजवायला हवा. आणि तलवारी नाचवताना कोणाला दुखापत होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतली. तलवारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन गुन्हेगारी आहे तर तस न पाहता महाराजांचा वारसा म्हणून पहा असं त्या मुलाचं म्हणणे होत.
मला कळत नाही हजारोंच्या संख्येनं राज्यभिषेक सोहळ्यासाठी माणस एकत्र आली असता तिथे तलवारीचा खेळ खेळला गेला चांगलं आहे पण एवढ्या गर्दीतून तलवारी घेऊन जाण खरंच गरजेचं होत का ? तलवार म्हणजेच महाराजांचा वारसा का ? त्यांचे विचार अभ्यासलेत का कधी ? वागलात कधी त्यांच्या विचारांनी ? जगलात कधी त्यांचे विचार? सुंदर स्त्री बघून येतात का हो तुमच्या तोंडून असे उद्गार " अशीच असती आमुची माता तर आम्ही हि असेच सुंदर जाहलो असतो "
माउलीने पाहीलेल स्वप्न साकारायला अखंड आयुष्य खर्ची घालणाऱ्या छत्रपतींचा वारसा पुढे घेऊन जाण म्हणजे फक्त तलवारी घेऊन जाण्याइतके सोपं वाटलं का ? आपल्या पिढीमध्ये महाराजांबद्दलची ओढ आपुलकी भक्ती पाहिली कि एक वेगळंच समाधान मिळत. महाराजांची जयंती राज्याभिषेक सोहळा सगळं सगळं इतक्या उत्साहात साजर होताना पाहून धन्यता वाटते. पण इतक्यावरच आपण थांबलं पाहिजे का ? त्यांचे विचार आत्मसात करताना कुठे जाते तुमची शिवभक्ती ? तुमच्या वागण्या बोलण्यात सुद्धा दिसूदे ना ती. हृदयात महाराज वसतात असं म्हणायचं आणि तोंडातून दुसऱ्याच्या आई बहिणीचा उद्धार करायचा असं करून स्वतःला मावळे म्हणवणर्याना जरा देखील शरम येत नसेल का ? छोट्या मुलींच्या हातात तलवार देऊन तिला डोक्यावर घेऊन नाचल म्हणजे स्त्रीचा आदर केला असं होत नाही. तिला सक्षम बनवायचा तर तिच्या हातात बांगड्या घालण्याऐवजी तलवार द्यायला हवी. तिला वाईट प्रवृतींविरोधात लढायला शिकवायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचं स्वतः पुरुषी अहंकार बाजूला सारून तिला पुढे जायला प्रोत्साहन द्यायला हवं.
छत्रपतींचा वारसा म्हणजे तरी काय ? त्यांचं आयुष्य म्हणजे एक तपश्यर्या होती. त्यांची लढाई कोण्या धर्माशी नव्हती तर धर्माच्या नावावर जुलूमशाही करणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरोधात होती. आपण अभिमानाने म्हणतो महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही. पण आपल्या धर्मावरची त्यांची निष्ठा देखील आपण अभ्यासायला हवी. वरवरच्या गोष्टी पाहण्यापेक्षा सखोल अभ्यास करा.नुसतंच महाराज महाराज ओरडण्यापेक्षा त्यांच्यातला एक गुण जरी अंगिकारला तरी खऱ्या अर्थाने तुम्ही शिवभक्त बनू शकता.
आपल्या देशात आणखी एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणात केली जाते ती म्हणजे मोठमोठ्या व्यक्तींचे बॅनर लावणे. कुणाचा वाढदिवस असेल लग्न असेल मोठमोठे बॅनर लावले जातात. तसेच आपल्या देवदेवतांचे देखील बॅनर लावले जातात. महाराजांच्या जयंतीला देखील असेच असंख्य बॅनर लावले जातात. तुम्ही कधी लक्षपूर्वक पाहिले असेल तर कित्येक बॅनरवर महाराजांपेक्षा तर त्या नेत्यांचेच फोटो मोठे असतात. त्यांच्या मागे कुठे तरी महाराजांचा छोटासा फोटो लावलेला असतो. पूर्ण बॅनरभर त्या नेत्यांच्या चेल्यांचे असंख्य फोटो असे काही लावलेले असतात कि ह्यांच्या फोटोंशिवाय महाराजांची जयंती साजरीच होणार नाही. बर इतक्या सगळ्या बॅनरच शेवटी होत तरी काय याचा आपण कधी विचार केलाय का ? ज्यांना आपण दैवत मानतो त्याच दैवतांचे फोटो कालांतराने कचऱ्यात पडलेले असतात किंवा कुठे तरी गावात पावसापासून संरक्षणसाठी लाकडांच्या ढिगाऱ्यावर किंवा गवतावर पसरवलेले दिसतात. कुठून त्यांचा हात दिसत असतो कुठे चेहऱ्याचा भाग झाकलेला असतो तर कधी फाटलेला असतो.हे सगळं बघून मन विषन्न होत. तुम्ही ज्यांना दैवत म्हणताय मनापासून माना पण त्यांच्या चित्रांचे असे धिंडवडे मात्र काढू नका.
परवाच ठाण्याला एके ठिकाणी महाराष्ट्र लॉटरी नावाच एक लॉटरीचा दुकान पाहिलं. त्या दुकानावर दुकानाच्या नावाशेजारी चक्क महाराजांचा फोटो होता. आता कोणी महाराजांना मानाव हि चांगली गोष्ट आहे पण आपण काय करतोय आणि तिथे महाराजांचा फोटो लावणे योग्य कि अयोग्य इतका विचार मात्र त्यानि नक्कीच करायला हवा. स्वराज्य निर्माता अशी ज्यांची ख्याती त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो एका लॉटरीच्या दुकानावर पहायला मिळावा ह्यासारखा दुर्भाग्य नाही.
मित्रानो शिवभक्ती दिसण्यातून नाही वागण्यातून दाखवा. तलवारी घेऊन गडावर गेलं म्हणजे महाराजांचा वारसा पुढे घेऊन गेलं असं होत नाही. त्यासाठी मुळातच महाराजांवर प्रेम असण महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल आम्ही शिवप्रेमीच आहोत आमचं महाराजांवर प्रेम आहेच. मग जस आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्याची प्रतिमा डागाळली जाणार नाही ह्याची आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे महाराजांच्या गड किल्यांची आणि मावळ्यांची प्रतिमा आपल्या वागण्यामुळे डागाळली तर जाणार नाही ना ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी. प्रत्येकाच्या मनामनात राजांबद्दलच प्रेम क्षणाक्षणाला असच वाढत जावं त्यांच्या विचारांवर चालणारा समाज घडावा. महाराजांच स्वप्न पूर्ण व्हावं स्वराज्य पुन्हा घडावं आणि राजांच्या स्वनातला समाज घडावा इतकीच एक इच्छा.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
महाराsssssज गडपती... गजअश्वपती...भूपती... प्रजापती... सुवर्णरत्नश्रीपती... अष्टवधानजागृत... अष्टप्रधानवेष्टित... न्यायालंकारमंडित... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत... राजनितिधुरंधर... प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... राजाशिवछत्रपती महाराज कि जय.
-स्नेहा शिंदे.