दारुच्या नशेत मित्रांने केला मित्राचा निर्घुन खून, एका टोपीमुळे उकलले खुनाचे रहस्य - राजेंद्र वखरे

CRIME BORDER | 13 September 2022 09:05 AM

डोंबिवली : कोणतेही व्यसन हे अतिशय वाईट व घातक असते हे वेळोवेळी अनेक घटनांवरून आपल्याला दिसते परंतु म्हणतात ना ? की कळते पण वळत नाही.अशाच प्रकारे डोंबिवली पश्चिम मध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा नशेच्या धुंदीत आपल्या मित्राचा निर्घुण खून केल्याची घटना वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी घडली आहे.

डोंबिवली पश्चिम येथील बाव्वन चाळ हा परिसर रेल्वे हद्दीमध्ये येतो.पण पोलीस तपासाची हद्द ही विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या ठिकाणी अनेक मोडकळीस आलेल्या रेल्वे क्वार्टर्स अस्तित्वात होत्या परंतु अलीकडे त्यां तोडण्यात आल्या आहेत. तर ज्या क्वार्टमध्ये कर्मचारी राहात आहेत, त्याच अस्तित्वात आहेत. परंतु बावन्न चाळ ही कु-प्रसिद्ध म्हणूनच प्रसिद्ध आहे .कारण याठिकाणी नशेडी ,दारुडे अशी मंडळी रात्रीच्या काळोखात रेल्वेच्या मैदानाच्या लगतच्या भिंतीजवळ व पडक्या खोल्यांमध्ये तसेच झाडी झुडपात बसून नशा करीत असत . पूर्वी याठिकाणी अनेक गुन्हे घडलेले आहेत. एक प्रकारे हा परिसर म्हणजे नशेडी लोकांसाठी एक आदंणच होते. असे म्हटल्यास वावगे ठरू नये परंतु अलीकडे पोलीसांनी या परिसराकडे लक्ष दिल्याने ते प्रमाण खूपच कमी झालेले आहे.या ठिकाणी खूनासारखे प्रकार ही घडलेले आहेत.

 

याच ठिकाणी पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा पुल असल्याने या ठिकाणी सायंकाळी पोलीस हमखास असतातच व बीट मार्शलही या ठिकाणी फेरफटका मारत असल्याने अशा नशा करणाऱ्या लोकांची मोठी पंचाईत झाली आहे.आता जरी हा परिसर मोडक्या रेल्वे क्वार्टर्स पासून मुक्त झाला असला तरी या विभागात झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत .याचाच फायदा अशा या नशा करणाऱ्या व गर्दुल्या लोकांना अजूनही होतो. डोंबिवली प.रेल्वे स्टेशन जवळच रेल्वेचे मोठे एक मैदान आहे. याठिकाणी या विभागातील मुलं क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात विशेष म्हणजे इथे क्रिकेटचे सामने अधूनमधून भरत असतात.

अशाच प्रकारे या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून एक जण याच विभागातील एका ठिकाणी एका आडोशाला राहत होता .त्याने ती जागा आपली एक तोडकी-मोडकी बॅक व काही फाटके-तुटके कपडे एका दोरी वर लटकवून ती जागा अनभिषिक्तपणे अडवली होती. तो दिवसभर इकडे तिकडे भटकून प्लॅस्टिक, भंगार गोळा करून ते विकून दारु पिऊन रात्री झोपायला त्याठिकाणी येत असे.दिनांक १३ जून २०२२ रोजी रेल्वे मैदानावर काही मुलांनी क्रिकेटचे सामने भरवले होते या क्रिकेट शौकिनांनी क्रिकेट चे सामने संपल्यानंतर जेवणाचा बेत आखला होता .त्या सर्वांनी क्रिकेट या खेळाचा आनंद लुटून चिकन बिर्याणीवर ताव मारला परंतु चिकन बिर्याणी जास्त व खाणारे कमी त्यामुळे बिर्याणी उरली आता या बिर्याणी चे काय करायचे ? याचा ते विचार करत असतानाच त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी जे कोणी असतील त्यांना आपण ती देऊन टाकू.

 

तसे पाहता रात्रीच्या काळोखात नशा करणाऱ्यांची पावले आपोआपच बाव्वनचाळीकडे वळत असतात. हा रस्ता त्यांचा तोंडपाठ झाला असल्याने दिवसभर भटकून केर कचरा उचलून, प्लास्टिक, भंगार गोळा करुन ते सायंकाळी विकायचे व त्यातून दारू व चकणा विकत घ्यायचा व एका बाटलीत पाणी भरून ही मंडळी ठराविक जागी बसून दारूचा आस्वाद घेत असतात.अशाच प्रकारे एका ठिकाणी एक इसम वय अंदाजे ४५ ते ५० हा दि.१३ जून २०२२ रोजी नेहमीप्रमाणे दारू पीत बसला होता. तर त्याच्याच थोड्या अंतरावर दोन इसम दारू पीत बसले होते. त्यांना पाहून या क्रिकेट मैदानावरील एकाने त्यांच्यापैकी एकाला बोलावले व त्याला उरलेली बिर्याणी खायला दिली. ती बिर्याणी बघून या दोघांच्या तोंडाला पाणी सुटले आणि आपण येथेच्छपणे या बिर्याणीवर ताव मारू असा त्यांनी विचार केला व पुन्हा ते एक चपटी दारुची बाटली घेऊन आले.  त्यानंतर हळूहळू ती दारू रिचवत बसले . कारण आज त्यांची मजाच झाली होती. दारू सोबत बिर्याणीची पार्टी त्यांना मिळाली होती.

दारू पीत व बिर्याणी खात असतांंना ते एकमेकांशी गप्पा मारु लागले. थंड हवेच्या झुळके मध्ये दारूची नशा हळूहळू चढत होती रात्री साधारणतः अकरा-साडेअकरा वाजले असावेत. त्यानंतर त्या तिघांनी दारूच्या नशेत विविध विषयावर बोलायला सुरुवात केली विषयावर विषय निघत गेला.त्या तिघांपैकी दोघे जणच बिर्याणी खात होते,तर तिसरा मात्र दारू आणि चखण्यावरच संतुष्ट होता आणि त्याचा हा दिनक्रम ठरलेला होता.शुल्लक कारणावरून दोघा मित्रांमध्ये शाब्दिक भानगड सुरु झाली या भानगडी चे स्वरूप हळूहळू वाढत गेले.या ठिकाणी दारू पीत असलेला अर्जुन आनंदा मोरे याला मात्र दारुचा अंमल जास्त चढला होता. तो हवेत तरंगत असल्याने आपल्या एका मित्राशी मुद्दामच भानगड उकरून काढत होता. त्यांच्यात भांडण वाढले तसे त्यांचा मित्र राकेश पाटील त्या दोघांना भानगडी करू नका रे !गपचूप खा आणि झोपा असा सल्ला त्यांना देत होता पण अर्जुनला मात्र दारूची नशा काही शांत बसू देत नव्हती. त्याने त्याच्या मित्राला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि त्या शिव्या ऐकून दुसरा मित्र सुद्धा त्याला प्रत्युत्तरादाखल शिव्या देऊ लागला. त्या दोघांची भानगड आता शिव्या वरून हातापायी वर आली होती.तसे पाहता अर्जुन हा तरुण होता त्याने मागचा पुढचा विचार न करता आपल्यापेक्षा पाच दहा वर्ष वयाने मोठ्या असलेल्या आपल्या मित्रास चापटी व बुक्क्याने मारायला सुरुवात केली.

 

अर्जुन मात्र पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्याला आपला मित्र आपल्याला शिवीगाळ करतो आहे. याचा प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरात त्याने आजूबाजूला काही मारायला मिळते का हे बघितले असता त्याला एक लाकडी फळी दिसली.  त्याने ती बॅटे सारखी उचलली व बॅटेने चेंडू मारावा तशा पद्धतीने त्याने ती लाकडी फळी आपल्या मित्राच्या डोक्यात हाणली आणि त्यानंतर त्याने त्या लाकडी फळीने त्याला झोडपायला सुरुवात केली. हे पाहून मित्राने अर्जुनला आवरायचा प्रयत्न केला व मारू नको म्हणून त्याला सांगू लागला तेव्हा अर्जुनने आपल्या मित्राला सुद्धा धक्का देऊन लांब केले व मध्ये पडलास तर तुला पण खल्लास करीन असा दम दिल्याने तो घाबरला व बाजूला उभा राहिला .

अर्जुनचा मित्र दारूच्या नशेत असल्याने त्याला प्रतिकार करता येत नव्हता परंतु तो शिव्या देत होता आणि याच गोष्टीचा राग अर्जुनला जास्त येत असल्याने तो मारहाण करत होता. त्या माराने तो मित्र जोरजोराने ओरडत होता तर अर्जुन लाकडी फळीने त्याच्या तोंडावर, डोक्यावर, पाठीवर ,हातावर ,मिळेल त्या ठिकाणी लाकडी फळीने प्रहार करत होता.एक प्रहार त्या इसमाच्या मागच्या बाजूला डोक्याला लागला आणि तो धपकन जमिनीवर पडला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरु झाला .ते पाहून हे दोघेही घाबरले तरीही दोन-चार फटके अर्जुनने पुन्हा त्याला दिले व तेथून पळ काढला. दारूच्या नशेत आपल्या हातून आपल्या मित्राला जास्तच मारले गेले असे अर्जुनला वाटू लागले परंतु आता विचार करून फायदा नव्हता त्यांना वाटले की ,सकाळी तो उठेल व नंतर आपण काय करायचे ते पाहू असे म्हणून ते तेथून पळाले व जवळच असलेल्या भागशाळेच्या मैदानामध्ये येऊन झोपले.

 

डोंबिवली पश्चिम बावन्न चाळ येथील क्रिकेट मैदानाच्या दक्षिण बाजूच्या कंपाऊंडच्या भिंतीलगत सदर हाणामारी करून अर्जुन पळून गेला होता.सदर मैदानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या एका दक्ष नागरिकाचे लक्ष निपचित पडलेल्या इसमाकडे गेले त्याला संशय आल्याने तो त्याच्याजवळ गेला पाहतो तर काय तो इसम रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला असून तो काही एक हालचाल करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने तात्काळ विष्णूनगर पोलीसांना सदर घटनेची माहिती दिली.

विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी ताबडतोब पो.निरी.(गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पो.निरी.(प्रशा.) मोहन खंदारे यांना खरा काय प्रकार आहे.  याची शहानिशा करण्यासाठी त्याठिकाणी पथकासह पाठवले.पोलीस पथक डोंबिवली पश्चिम येथील रेल्वे मैदानात आले व त्यांनी पाहणी केली असता मैदानाच्या भिंतीजवळ एक इसम खरोखरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्यांनी बारकाईने त्याची पाहणी केली असता तो इसम मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.तात्काळ या घटनेची माहिती व. पो. निरी. पंढरीनाथ भालेराव यांना देण्यात आली असता ते घटनास्थळी आले.व त्यांनी पाहणी केली .या घटनेची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ,डोंबिवली विभागाचे एसीपी सुनील कुराडे यांना देण्यात आली.ताबडतोब वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली.मयताची व घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी व.पो. निरी. पंढरीनाथ भालेराव यांना तातडीने मार्गदर्शन करुन काही सुचना देत अज्ञात आरोपींना पकडण्याचे आदेश दिले.सदर खुनाचा तपास व. पो. निरी. पंढरीनाथ भालेराव यांनी स्वतःकडे घेत तपास आरंभला.घटनास्थळावरून एक जांभळी  कॅप, तोडकी-मोडकी बॅग, रक्ताने माखलेली लाकडी फळी ,दारुच्या बाटल्या, रक्तमिश्रित माती अशा वस्तू इनक्वेस्ट पंचनाम्यात जप्त करून सदर मृतदेह राणी रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण येथे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला.

 

घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता पोलीसांच्या असे लक्षात आले की ,सदर घटना ही दारूच्या नशेत मित्रांमध्ये घडली असावी. त्या व्यतिरिक्त दुसरे असे काही कारण त्यांना दिसत नव्हते. त्यांच्यात प्रॉपर्टी किंवा दुसरे कोणते सबळ कारण नसल्याने हा मर्डर दारूच्या नशेत मित्रा मित्रांनीच केला असावा इथपर्यंत पोलीसांनी अंदाज बांधला.पोलीसांनी या परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तात्काळ तपासायला घेतले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ परिसरात पाहणी करून काही धागादोरा मिळतो का ?यासाठी तपासाला लावले. आणि खबरेही माहिती काढण्यासाठी लावले.यासाठी तीन पोलीस पथके तयार करण्यात आली या पथकांना विविध काम वाटून देण्यात आले.

वपोनि.पंढरीनाथ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली,पो.नि.(गुन्हे) राहुरकुमार खिलारे,पो.नि.(प्रशा.) मोहन खंदारे,सहा.पो.निरी.गणेश वडणे, पो.उप.निरी.कुलदिप मोरे यांचे पथक कार्यरत झाले. स. पो. निरी.गणेश वडणे यांचं पथक डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात तर पो.उप.निरी.कुलदिप मोरे यांचे पथक बावन्न चाळ,पो.नि.राहुलकुमार खिलारे यांचं पथक डोंबिवली पूर्व गणेश मंदिर विभागात,पो.नि.मोहन खंदारे हे टिमसह मोठागाव ,खाडी परिसर विभागात काही धागा मिळतो का याची चाचपणी करू लागले .घटनास्थळाजवळील स्ट्रीट वरील सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी प्राप्त केले.विशेष म्हणजे पोलीस तपास सुरु असतांना आरोपी हा पोलीसांसोबत फीरत होता एवढेच नव्हे तर पोलीसांनी दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती देऊन तपास भरकटवत होता. पण शेवटी पोलीस ते पोलीसच असतात.पोलीसांना घटनास्थळी दारुच्या बाटल्या भेटल्या असल्याने फुटेज मधील इसमांना वाईन शॉप वाले ओळखू शकतात.त्या अनुशंगाने तपास आरंभला असता एका वाईन शॉप वाल्याने सांगितले की साहेब यातील इसम हे रोज दारू घ्यायला येतात.

 

तर दुसरीकडे डोंबिवली परिसरातील भंगार घेणारे दुकानदार यांच्याकडे चौकशी केली असता डोंबिवली पूर्व गणेश मंदिराजवळील भंगार घेणाऱ्या  इसमाला फुटेज दाखवले असता.त्यातील लंबू दिसत असणाऱ्या इसमाला पाहून तो म्हणाला की साहेब हा इसम रोज माझ्या कडे प्लॅस्टिक व भंगार गोळा करून विकायला येत असतो.यावर पोलीस म्हणाले की,तो जेव्हा इकडे येईल तेव्हा त्याला थांबवून ठेव आणि आम्हाला कळव .काही वेळानंतर तो इसम भंगारवाल्याकडे आला तेव्हा भंगार वाल्याने त्याला चहा देऊन थांबविले आणि त्या संशयित इसमाला भंगार वाल्याचा संशय आला व त्याने तेथून पळ काढला सदर बाब पोलीसांना समजली. सर्व पोलीस अलर्ट झाले डोंबिवली पश्चिमेतील दींनयाल रोडवर तो इसम फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आणि पोलीसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

पोलीसांना घटनास्थळावरून कॅप मिळाली होती. फुटेजमध्ये कॅप घालणारी व्यक्ती दिसल्याने पोलीसांना त्या पहिल्या इसमावर संशय आला व त्यांनी त्याला पकडण्यासाठी फिल्डिंग लावली आणि एकदाचा तो पकडला गेला त्याला पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याला विचारले की तू कॅप घालतो का व तुझ्याकडे किती कॅप आहेत यावर तो म्हणाला की हो मी कॅप घालतो व माझ्याकडे दोन कॅप आहेत.तेव्हा त्या कॅप कुठे आहे असे विचारले तर तो म्हणाला की माझी कॅप माझ्या बॅगेत आहे. त्याने त्याची बॅग उचकटून दाखवली. परंतु त्यामध्ये एकच  कॅप होती दुसरी त्याला सापडत नव्हती.पोलीसांनी घटनास्थळावर सापडलेल्या जांभळी कॅपचा फोटो त्यांला दाखविला व विचारले हीच तुझी कॅप आहे का ? त्यावर तो म्हणाला साहेब ही माझीच असे राकेश पाटील म्हणाला . त्यानंतर त्याच्याकडे सदर खुना बाबत चौकशी करण्यात आली परंतु तो ताकास तूर लागू देत नव्हता त्याला खास पोलीसी खाक्या दाखवला असता तो म्हणाला की साहेब मी त्याचा खून  केलेला नाही‌.  त्याचा खून अर्जुनने केलेला आहे. त्यानंतर पोलीसांनी अर्जुनचा शोध सुरू केला. पोलीसांनी फुटेज मध्ये असलेल्या फोटो मध्ये अर्जून कोण आहे असे त्या पकडलेल्या लंबूकडे विचारले असता त्याने अर्जुनला ओळखले विशेष म्हणजे पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना तो इसम म्हणजेच अर्जुन हा भेटला होता व त्याने पोलीसांची दिशाभूल केली होती. हे भामरे यांच्या लक्षात आले होते.  त्यांनी त्या आरोपीला बघितले होते .त्यामुळे त्याला पकडणे आता अवघड नव्हते परंतु दुसरीकडे अर्जुन हा त्याचे कपडेलत्ते घेऊन बॅग भरून पळून जाण्याच्या तयारीत होता पण पोलीसांनी त्याला पकडण्यासाठी एक प्लान रचला व तो कुठे मिळू शकतो याची खात्री करून त्याठिकाणी पोलीसांचा गुप्त सापळा रचला.

 

दिवसभर अर्जुन इकडे तिकडे फिरला व दुसऱ्या दिवशी त्याने इथून पळून जाण्याचा बेत रचला. तो रात्री भाग शाळा मैदानामध्ये झोपायला आला आणि पोलीसांच्या सापळ्यात अडकला.त्याला पोलीस ठाण्यात आणले पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता तो काही एक सांगत नव्हता परंतु पोलीसांनी त्याला खास पोलीसी पाहुणचार दिला आणि ही मात्र त्याला तंतोतंत लागू पडली आणि त्याने कबूल केले की साहेब हो माझ्या हातून चूक झाली आहे .मीच त्याला मारले आहे आणि त्याला पश्चाताप होऊ लागला. साहेब दारूच्या नशेत माझ्याकडून त्याला लाकडी फळीने मारले गेले त्याला मारून टाकावे असा माझा विचार नव्हता परंतु माझ्या हातून चूक झाली आणि क्षुल्लक कारणावरून एका माणसाचा जीव गेला हे त्याने पोलीसांकडे कबूल केले.पोलीसांनी कॅप, दारू, भानगड आणि मर्डर या धाग्यावरून अवघ्या बारा तासात पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या बारा तासात आरोपीला पकडले तर साक्षीदारानेही सांगितले की साहेब माझ्या समोरच अर्जुनने सदर इसमाला मारले मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने माझे ऐकले नाही अर्जुन पळून जाण्याच्या बेतात होता पण त्याचा बेत फसला.

मयत अद्याप कोण व कुठला? याची माहिती पोलीसांना कळू शकली नाही.आरोपी अर्जुन आनंदा मोरे वय वर्षे ३८ धंदा बिगारी काम हा मूळ गाव उर्दी, तालुका पन्हाळा ,जिल्हा कोल्हापूरचा असून पूर्वी त्याचे कुटुंब बांद्रा येथे राहत होते .त्याची आई वडील दोघेही वारले तर त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे तो डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा येथे गेल्या आठ ते दहा वर्षापासून त्याच्या बहिणीकडे आला होता मिळेल ते काम तो करत होता परंतु कोरोनाच्या काळामध्ये त्याची बहीण सुद्धा देवाघरी गेली आणि मग तो रस्त्यावरच गुजराण करू लागला. दिवसभर कचरा, प्लास्टिक, भंगार गोळा करणे व संध्याकाळी विकून त्यातून दारू पिऊन झोपणे या पलीकडे त्याचा काही एक काम धंदा नव्हता.तर मयत इसम हा डोंबिवली पूर्वेतील काही भागात फिरायचा परंतु अलीकडे तो दारू पिण्यासाठी व झोपण्यासाठी बावन्न चाळीमध्ये येत असे. मयत हा पेंटिंग चे काम करत असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्यानुसार तपास करीत आहे.अर्जुन आनंदा मोरे वय ३९ याच्याविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गु.  रजि.  नं.  १६२/२०२२ भारतीय दंडविधान कायदा  कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

या गुन्ह्यासंदर्भात कल्याण परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्याचे व. पो. निरी.पंढरीनाथ भालेराव त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच पो. निरी. (गुन्हे) राहुलकुमार खिलारे , पो. निरी. (प्रशासन) मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आर वडणे, पो.उप.निरी.कुलदिप मोरे,म.पो.उप.निरी.एम.बी.कपिले,परि.पो.उप.निरी. आंधळे , एएसआय. सुभाष नलावडे, मनोज सावंत,पो.हवा. शकील जमादार ,कैलास घोलप,पो.हवा.युवराज तायडे  ,हरिष थोरात,पो.ना.विक्रम गवळी, तुळशीराम लोखंडे, सचिन कांगुणे, संतोष कुरणे, शशिकांत भोई, शकील तडवी,पोलीस शिपाई कुंदन भामरे, रायसिंग चालक पो. शि.कमोदकर यांनी परिश्रम घेतले.

 

- राजेंद्र वखरे