टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या सदस्यांना ठाण्यातील सदनिका नियमानुसार वितरित करण्यात येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CRIME BORDER | 27 October 2022 08:10 AM

मुंबई, दि. 19 : ठाणे येथील वर्तकनगर सर्व्हे क्र. २१० येथील अल्प उत्पन्न गटातील ६७ सदनिका टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्याकरीता सकारात्मक विचार करुन नियमानुसार सदनिका वितरित करण्यात येणार असल्याचे उप मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन सदस्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल दिघीकर, कोकण बोर्डचे मुख्याधिकारी यांच्यासह टीव्हीवर जर्नालिस्ट असोसिएशनचे विनोद जगदाळे, राजेश भाळकर,संतोष पालवणकर यांची उपस्थिती होती.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाच्या धोरणानुसार टीव्ही जर्नालिस्ट संघटनेच्या ज्या सभासदांनी  यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नाही व ज्या सभासदांचे ठाणे महापालिकेच्या हद्दीत स्वतःचे घर नाही अशा सभासदांकरीता म्हाडाने त्वरीत सोडत काढण्याची कार्यवाही करावी व त्यांना घराचा ताबा देण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.