नाट्यसृष्टी व मराठी माणसांमधील आपला ठसा उमटवणाऱ्या प्रोड्युसर,कलावंत,साहित्यिक संतोष राणे यांच्याशी राजेंद्र वखरे यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.

CRIME BORDER | 16 September 2022 12:08 AM

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : संतोष तुमचं बालपण कुठे आणि कस गेलं?

संतोष : साधारण चार साडेचार हजार लोकसंख्या असलेलं,अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेलं निसर्गरम्य असं आवास हे माझं जन्मगाव. नारळी पोफळी आणि आंब्याच्या बागांसोबत विस्तृत आणि शांत समुद्र किनारा आणि त्या लगत असलेले टुमदार बंगले अश्या सौंदर्याने नटलेल्या आणि सामाजिक आणि साहित्यिक वारसा लाभलेल्या गावी माझं बालपण गेलं.घरची परिस्थिती तशी सर्वसाधारण म्हणता येईल, माझे वडील मुंबई महानगर पालिकेत कार्यरत असल्यामुळे निवृत्ती पर्यंतचे त्यांचे संपूर्ण आयुष्य हे मुंबईतच गेले,केवळ शनिवार रविवार ह्या दोन दिवशी ते गावी येत, ते दोन दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळी सारखे असायचे. त्यांच्या अनुपस्थितीत शेती, घर आणि आमच्या शिक्षणाची जबाबदारी ही सर्वस्वी आईने पार पाडली. घरातील वातावरण हे अध्यात्मिक आणि कडक शिस्तीचे होते.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व नियम ठरलेले असायचे. अभ्यासात हुशार असूनही माझा ओढा हा संगीत आणि चित्रकला ह्या विषयांमधे होता. दिवस दिवसभर चित्र काढत बसायचं किंवा संगीत ऐकत राहायचं आणि त्यातून वेळ मिळाला तर अभ्यास करायचा असा माझा नित्यक्रम असायचा. आम्ही तीन भावंडं त्यात मी सगळ्यात लहान असल्यामुळे मित्रांसोबत स्वछंदपणे उनाडत राहणं. धमाल, मस्ती करणं, ह्या बाबतीत जराशी सूट मिळायची पण शिक्षणाच्या बाबतीत कधीच तडजोड नसायची.शिक्षणाच्या बाबतीत हेळसांड केली तर त्यासाठी कठोर शिक्षा ठरलेली असायची,पण तस असूनही माझं बालपण खूप छान गेलं.पण आता काळाच्या ओघात सगळं बदलू लागलय त्यात भौगोलिक परिस्थितीत ही खूप बदल झाले आहेत. प्रत्येकाला स्वतःच बालपण रम्य वाटत असतं, पण माझ्या बालपणात एक fantacy होती, एखादं स्वप्न पडावं आणि काहीतरी adventurous करावं असं ते बालपण होतं जे मी आज खूप मिस करतोय.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे - तुमचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं?

संतोष : माझं पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे रायगड जिल्हा परिषद आवास ह्या शाळेत झालं. पुढे  पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण माझ्याच गावातील बाबासाहेब नाझरे हायस्कुल आणि जुनिअर कॉलेज येथे झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण अलिबाग तालुक्यातील जे, एस, एम. महाविद्यालयात झाले व उच्च महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबई विद्यापीठ कलिना येथे पार पडले.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : आपले छंद आणि आवडी-निवडी ह्या बद्द्ल काय सांगाल?

संतोष : मी आधी म्हटल्याप्रमाणे माझा ओढा हा चित्रकला, संगीत, नाटक आणि पाककला ह्यामध्ये होता.आईचं वारंवार आजारी असणं आणि बहिणीच लवकर लग्न होऊन सासरी जाणे त्यामुळे घरातील सगळी कामे मी करायचो. विहिरीवरून पाणी भरून आणणे, जेवण बनवणे, भांडी घासणे हे नित्याचे झाले होते. स्वतःचे कपडे स्वतः धुवायची सवयही तेव्हापासूनच लागली.ह्या सगळ्या परिस्थितीतही आवडी-निवडी जोपसायला वेळ मिळायचा.वेगवेगळी नाटकं वाचणं, वेगवेगळ्या पद्धतीचे संगीत ऐकणं चालू असायचे पण ह्या सगळ्यात जास्त मी रमायचो तो चित्र काढण्यात, शालेय जीवनात शिकत असलेल्या इतर विषयांपेक्षा मला चित्रकला, संगीत, कार्यानुभव हे विषय जास्त जवळचे वाटायचे. संगीत आणि चित्रकला ह्या विषयाच्या शिक्षकांचा मी नेहमीच लाडका राहिलोय, माझ्या चित्रकलेचं आणि हस्ताक्षराचे नेहमीच सगळे खूप कौतुक करत असत,भूगोल आणि विज्ञान ह्या विषयातील आकृत्या पाहून शाळेचे मुख्याध्यापक माझ्या वह्या घेऊन स्वतः शाळेतल्या प्रत्येक वर्गात दाखवून माझं नेहमी कौतुक करीत असत, एक किस्सा आठवला म्हणून सांगतो, पहिल्या स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर ह्या आमच्या गावच्या, त्यांच्या नावाने २००६ मध्ये आमच्या गावात कोकण मराठी साहित्य परिषदेचे १ले महिला मराठी साहित्य संमेलन झाले, संमेलनामध्ये वेगवेगळी प्रदर्शने भरली होती . त्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यातील एक वर्ग मी शाळेला काढून दिलेल्या आकृत्या आणि नकाशे ह्या साठी राखीव ठेवण्यात आला होता, ती गोष्ट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती.

 

मुलाखतकार -राजेंद्र वखरे : लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की मोठेपणी डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हावं पण खेडेगावात राहणाऱ्या आपल्यासारख्या तरुणाला कलाक्षेत्रात यावं असं केव्हा मनात आले ?

संतोष : माझं गाव समुद्रकिनारी वसलेले असून मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे इथे कला आणि साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज राहतात.स्मिता पाटील,अलेक पदमसी,मोहन जोशी,रवी शास्त्री आणि इतर अनेकांची नावे घेता येतील.त्यांच्या निमित्ताने इथे बऱ्याच मोठ्या लोकांचा वावर असायचा. पूर्वी दूरदर्शन हेच मनोरंजनाचे माध्यम असायचे त्यातच साधारण १९८९-९० ची गोष्ट असेल.जागतिक कीर्तीचे नाटककार आणि ऍड मॅन म्हणून नावाजलेल्या अलेक पदमसी सरांच्या बंगल्यात जागतिक कीर्तीच्या लोकांचं येणं जाणं असायचे त्या काळात कित्येकदा त्यांच्या घरी नाटकाच्या तालमी होताना मी लपून बघायचो. ते वातावरण फार विलक्षण असायचे, खरंतर ह्या क्षेत्राचे आकर्षण त्या क्षणापासून माझ्यात निर्माण झालं असावं असं म्हणायला हरकत नाही. भविष्यात काय होणार हे माहित नव्हतं पण खूप मोठं होऊन नाव कमवायचं एवढं मात्र नक्की वाटायचं. घरी वडिलांची इच्छा होती की मी वकील व्हावे किंवा दोंघांपैकी एका मुलाने सैन्यात जावं, इयत्ता सहावी पास झाल्यानंतर वडिलांना पुण्याच्या सैनिकी शाळेबद्दल माहिती मिळाली.त्यामुळे पुढील शिक्षण सैनिकी शाळेत घ्यायचे निश्चित झाले पण ऐन वेळेस प्रेमापोटी म्हणा किंवा काळजीपोटी म्हणा आईने जाण्यास साफ नकार दिला.त्यामुळे त्या गोष्टीला तिथेच पूर्णविराम मिळाला.त्यामुळे पुढे कलाक्षेत्रात येण्याच्या भूमिकेला बळ मिळाले पण ह्या क्षेत्रात येण्यासाठी काय करावं लागतं ह्याबद्दल जराही माहिती नव्हती. खूपदा वाटायचं की, पदमसी सरांना जाऊन भेटावं ! पण ते धाडस होतं नव्हतं.आणि दुसरं कुणाकडून मार्गदर्शन मिळेल अशी शक्यताही नव्हती.पण हे सगळं करत असतांना  पुढे काहीही झाले तरी कलाक्षेत्रात करिअर करायचं हे मनोमन निश्चित झाले होते.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : कलाक्षेत्रात जायचं हे मनोमन निश्चित झाल्यानंतर हायस्कूल ते महाविद्यालयीन शिक्षण हा प्रवास कसा होता?

संतोष : दहावी पास झाल्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण कला शाखेतून घेत असताना त्या दोन वर्षात कॉलेज मध्ये होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी माझ्यावर टाकली जायची,अनेक नावीन्यपूर्ण  कार्यक्रम राबविण्यात माझा सिंहाचा वाटत असायचा,पुढे बारावीला असताना मला एक नाटकं लिहिण्याची आणि त्या नाटकाला दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली.मला आजही आठवतं माझ्या त्या नाटकाने मला एक नवी उमेद दिली.त्या नाटकामुळं आजूबाजूच्या गावात मला एक वेगळी ओळख मिळाली.शिकत असतांना  मला बरेच जणं म्हणायचे की तू आर्किटेक्ट लाईन किंवा जे .जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई  मध्ये जावं पण त्यासाठी तशी आर्थिक परिस्थितीही नव्हती आणि मार्गदर्शनही नव्हतं त्यामुळे माझ्या मनात संभ्रम आणि अस्वस्थता वाढत चालली होती. मी कोणतं क्षेत्र निवडावं त्या बाबतीत निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मला घरातून मिळत होतं.  पण एकीकडे आईचं आजारपण, वडिलांची सेवानिवृत्ती त्यामुळे घरातील इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडीत असताना पैशाचा ताळमेळ बसवणं कठीण होतं चाललं होतं.अशा  परिस्थितीत माझ्या शिक्षणासाठी पैसे कसे उभे करायचे हा यक्ष प्रश्न होताच. आत्मविश्वास खूप होता पण मार्गदर्शन नव्हतं आणि मी मनोमन निवडलेल्या क्षेत्राबद्दल पुरेसं ज्ञानही नव्हतं.आत्ता उपलब्ध असलेली माध्यमं पूर्वी नव्हती पण त्यातही मिळवलेल्या माहितीवरून ह्या क्षेत्राला समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो.बारावी नंतरचे शिक्षण मुंबईत जाऊन घ्यावं असं खूप वाटत असूनही घरातल्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही.पुढे नाईलाज म्हणून अलिबाग मधील जे . एस .एम कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले, पण माझ्या सुदैवाने मला इंग्रजी साहित्य ह्या विषयात प्रवेश मिळाला, मी निवडलेल्या अभ्यासक्रमात नाटक, कादंबरी,दिग्दर्शन ह्या गोष्टींचा समावेश असल्यामुळे मला बळ मिळाले, सोबतच NSS मध्ये सहभागी होऊन तिथेही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.NSS च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्याची संधी मिळाली, वेगवेगळी नाटकं लिहिणं. दिग्दर्शन करणं ह्या माध्यमातून माझ्यातला आत्मविश्वास वाढू लागला होता.लहानपण अत्यंत सुखात गेल्यानंतर आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीत अचानक झालेल्या बदलांमध्ये अनेक अडचणींना सामोरं जातं अखेर २००४ मध्ये मी इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : महाविद्यालयीन शिक्षण ते अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् ह्या प्रवासाबद्दल आपल्या काय भावना आहेत?

संतोष : खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारा हा कालावधी होता. २००४ साली मी इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली.  आणि अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् ला प्रवेश २००९ ला मिळाला, हा मधला कालावधी माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि आयुष्याबद्दल खूप खोलवर विचार करायला भाग पडणारा असा होता.२००४ साली ग्रॅज्युएट झालो . त्याच वर्षी मला मुंबई विद्यापीठात नव्याने सुरु झालेल्या आणि प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक श्री . वामन केंद्रे संचालित नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या विभागाबद्दल माहिती मिळाली.एवढ्या मोठ्या दिग्दर्शकासोबतच देशातील व परदेशातील दिग्गज लोकांकडून शिकायला मिळणार ह्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले होते. विद्यापीठातील ह्या विभागात माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर समजले की ह्या विभागात प्रशिक्षण घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात आणि त्यातून दरवर्षी निवडक २५ विद्यार्थी निवडले जातात.निवड प्रक्रियाही अत्यंत कठीण मानली जाते.माझा ह्या सगळ्यात टिकाव लागेल का? ही भीती होतीच पण सगळ्यात जास्त भीती ही होती की निवड झाली तर शिक्षणासाठी लागणारा खर्च भागवायचा कसा आणि फुल टाईम डिग्री कोर्स असल्यामुळे राहायचं कुठे अशा अनेक प्रश्नांनी मनात काहूर निर्माण केल होतं. माहिती पुस्तिका घेऊन घरी आलो. घरच्यांशी चर्चा केली पण पैसे उभे करणं शक्य नव्हतं. नातेवाईक व इतर अनेक मार्गाने पैशाची व्यवस्था करता येईल का ? ते पाहिलं पण प्रत्येक ठिकाणाहून नकार मिळत होता.खचून न जाता पुढे जाण्याचा निर्णय घेतला, वाट्टेल ते करून पैसे जमा करायचे आणि कितीही वेळ गेला तरी ह्याच ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचा माझा निर्धार ठाम झाला होता.पुढे थोड्या दिवसांनी थोडे पैसे जमवून मुंबईला जायचा निर्णय घेतला. मुंबईत जाऊन कॉल सेंटर मध्ये कामं करायचं ठरवलं.मुंबईत भावाकडे राहून कॉलसेंटर ट्रेनींग इन्स्टिटयूट मध्ये ट्रेनिंग सुरु केली.पैसे वाचावे म्हणून राहत्या ठिकाणापासून ट्रेनिंग सेंटर हा जाऊन येऊन १४ किलोमीटर चा पायी प्रवास करून मी ट्रेनिंग पूर्ण करून मुंबईत एका कॉलसेंटर मध्ये सहा महिने कामं करत असतांना  DNA ह्या नव्याने येणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्रासाठी मार्केट रिसर्च चे कामं मिळाले.तिथे माझ्या हाताखाली १८ जणांची टीम कामं करत होती.त्या संपुर्ण टीम ला सांभाळणं कामांचं नियोजन करणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं पण कलेच्या क्षेत्रात जायचं हे स्वप्न जीवंत ठेवण्यासाठी मी तिथे चौदा चौदा तास कामं करीत होतो पण तेवढ्यावर भागणारे नव्हते. ह्या सगळ्यात वर्ष निघून जातं होती पण दरवर्षी युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन न चुकता माहिती पुस्तिका आणायचं सोडलं नव्हतं.समोर धेय्य वेगळं असल्यामुळे अस्वस्थता वाढत होती शेवटी २००६ ला अलिबागला जायचा निर्णय घेतला.अलिबागला आल्यानंतर जमलेल्या पैशात मित्रासोबत काजू प्रक्रिया उद्योग सुरु केला . ते करत असतांना  सोबतच आंब्याच्या वाड्या ठेकेदारी पद्धतीने घेऊ लागलो, तयार झालेला आंबा APMC मार्केट आणि मुंबईत नेऊन विकायला सुरुवात केली.हे साधारण अडीच ते तीन वर्ष केल्यानंतर शेवटी ती वेळ  २००९ साली आलीच. चालू व्यवसाय मित्राच्या हाती सोपवून मी युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवायचा निर्धार करून अखेर ऍडमिशन फॉर्म भरला.निवड समिती मध्ये जब्बार पटेल, वामन केंद्रे, फिरोझ खान, डॉली ठाकूर, शफाअत खान, रीमा लागू असे दिग्गज समोर होते.दोन दिवस चाललेल्या निवड प्रक्रियेत जगभरातून आलेल्या दोन अडीचशे विद्यार्थ्यांमधून पहिल्याच प्रयत्नात २५ जणांमध्ये अखेर माझी निवड झालीच.जणू  माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद मला झाला होता.आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या निवडीमुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढला होता, धाडस करून मी अलेक पदमसी सरांना जाऊन भेटलो,खूप नावलौकिक असलेल्या ह्या माणसाचा साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव पाहून मी खरंच खूप भारावून गेलो. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या कडून वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळत राहिले.  ह्या गोष्टीचा मला नेहमीच अभिमान राहिलाय .

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : अस म्हणतात की कलाकार हा संवेदनशील असतो ह्यावर आपल्याला काय वाटत?

संतोष : माणूस म्हटलं की भावना आल्या आणि भावना म्हटलं की संवेदना आल्याच.संवेदनशील असणं हे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते, एरव्ही असंवेदनशील असलेला माणूस हा प्रसंगानुरूप संवेदनशील होताना आपण पाहिलेला असेल ? आपण त्याला सिलेक्टिव्हली सेन्सिटिव्ह म्हणू शकतो .पण कलाकारांकडे असलेली संवेदनशीलता ही सामान्य माणसांपेक्षा अधिक तरल आणि उत्कट असते अनायसे ती असावी लागते.   सोबतच सृजनशीलता, जिज्ञासा, कुतूहल हे सतत जागृत असावे लागते.  तरच त्याच्या कलाकृतीतून समाजाचं प्रतिबिंब अधोरेखित होऊ शकतं. कलाकृती कोणतीही असो , ती समाजाचा आरसा असते आणि कलाकार त्याच्या संवेदनशीलतेतून कलाकृतीत जिवंतपणा आणत असतो. सध्या जगात सेन्सिबिलिटी ट्रैनिंग लॅब चे फॅड उदयास आलय पण सेन्सिबिलिटी ट्रैनिंग ने माणूस संस्कारित होऊ शकतो का ? शेवटी काय तर कलेच्या साधनेतून आणि अनुभवातून संवेदनशीलता वृद्धिंगत होतं असते.जी कलाकारांकडे असणं गरजेचे आहे .

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर आपण काय भाष्य कराल ?

संतोष : सध्याची सामाजिक परिस्थिती सगळ्यांना चिंतन करायला भाग पाडणारी आहे, तंत्रज्ञान आणिआर्थिक क्षेत्रात जलद गतीने झालेल्या बदलांमुळे आज समाजात जीवघेणी स्पर्धा पाहायला मिळतेय, माणूसकी लोप पावत चालली आहे, जो तो स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काहीही करायला तयार होतोय. अक्षम्य अश्या अपराधाच्या घटना तर अगदी सर्वसामान्य झाल्या आहेत . भ्रष्टाचार बोकाळू लागलाय ह्या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणाही त्यातून सुटलेल्या नाहीत, इतरांचा आदर करणं, प्रामाणिकपणे कामं करणं, एकमेकांना मदत करून मिळून मिसळून राहणं ह्याच महत्व राहिलेले दिसत नाही. आज मनोरंजन वेड्या संस्कृतीमुळे माणसा-माणसांमधील संवाद कमी झालाय, अशा परिस्थितीत सुसंवाद तर लुप्तच होईल की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे .अनैतिक प्रभावांखाली आजचा तरुण दिशा चुकू लागलाय, खरंतर समाजात आजही असे अनेक घटक आहेत . ज्यांच्यामुळे अशा परिस्थितीत समतोल राखण्याचं कामं होतय पण वेळीच प्रबोधन झाले नाही.  तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. समाजातील ही परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे, आज समाजातील प्रत्येक माध्यमांच्या मार्फत समाजभावनेचे बीज रोवण्याचे कामं करण्याची नितांत गरज आहे, तर आणि तरच चांगुलपणावरचा विश्वास समाजात दृढ होण्यास मदत होईल.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : कलाक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?

संतोष : खरंतर मार्गदर्शन करणं आणि सल्ले देण्याइतकी योग्यता माझ्यात नाही.  आजही मी शिकतोयच पण तरीही मला अनुभवातून एक जाणवलं की ह्या क्षेत्राबद्दल समाजात आजही अनेक गैरसमज आहेत, ह्या क्षेत्रात असलेले ग्लॅमर पाहून अनेकजण ह्या क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळतात जे चुकीचं आहे. ह्या क्षेत्रात पैसा, मान सन्मान खूप मिळतो पण हे दिसत तेवढं सोप्प नाहीय. खूप कठीण असलेले हे क्षेत्र अनिश्चिततेने भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वीच्या मानाने आता असंख्य माध्यमं निर्माण झालेली आहेत.  हे जरी खरं असलं तरी ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी नीट अभ्यास करून आणि ह्या क्षेत्राला नीट समजून घेऊन पाऊल टाकणं गरजेचं आहे. तुमच्यात आत्यंतिक प्रतिभा, चिकाटी, दृढनिश्चय, महत्वाकांक्षा असावी लागतेच पण सोबतच दिवसरात्र कामं करण्याची तयारी असावी लागते. वशिलेबाजी आणि शॉर्टकट च्या माध्यमातून ह्या क्षेत्रात येणं सोप्प वाटत असलं तरी इथे टिकाव धरून राहणं सोप्प नाहीय. योग्य ठिकाणी योग्य माणसांमार्फत प्रशिक्षण मिळणं गरजेचं ठरतं शिवाय तुमचा स्वतःवर विश्वास असेल, कष्ट करण्याची तयारी असेल आणि आवश्यक प्रतिभा तुमच्यापाशी असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. एकदा का तुम्ही ह्या कसोटीवर उतरलात की ह्या क्षेत्रातील वेगवेगळी दालने तुमच्यासाठी आपोआप उघडी झालेली तुम्हाला पाहायला मिळतील.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् मध्ये शिकत असताना आणि प्रत्यक्ष कलाक्षेत्रात कामं करीत असताना आपल्याला अनेक दिग्गजांचा सहवास लाभला तर त्यांचा आपल्यावर काय प्रभाव पडला आणि त्याचा तुमच्या आयुष्यात काय परिणाम झाला?

संतोष : अकॅडेमी मध्ये निवड झाल्यानंतर सुरवातीला तीन चार महिने मी अलिबाग ते मुंबई असा साधारण सात ते आठ तासाचा प्रवास करीत होतो खरंतर शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. मुंबईत भाऊ राहतो पण आधीच लहान असलेली खोली आणि त्यात त्याचं कुटुंब त्यामुळे तिथे राहणं मला संयुक्तिक वाटलं नाही.पण माझ्या सुदैवाने विद्यापीठाशेजारी राहणाऱ्या आमच्या गावातील ओळखीच्या काकांनी मला त्यांच्या रूमवर राहण्यास परवानगी दिली. ते मुंबईत एकटेच राहतं असल्यामुळे माझं कामं सोप्प झालं, जेवण बनवायचं आणि कॉलेजला जायचं असा नित्यक्रम सुरु होता, अकॅडेमी मध्ये शिकत असताना वामन केंद्रे सर, मंगेश बनसोड, जागतिक कीर्तीचे संगीततज्ज्ञ अशोक रानडे सर, रीमा लागू, परेश रावल, नसरुद्दिन शाह, डॉली ठाकूर, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, गोविंद नामदेव, हिमानी शिवपुरी, शफाअत खान, शिवदास घोडके, रणजीत कपूर, नीरजा पटवर्धन, उमेश जाधव, दीपाली विचारे, उदय देशपांडे, छाया खुटेगावकर, पुरुषोत्तम बेर्डे, बोरकर काका, संध्या रायते, राम गोपाल बजाज, रतन थियाम, राजश्री शिर्के, नितीन नेरुरकर, कमलाकर सोनटक्के यांसारख्या अनेक जेष्ठ आणि नामवंत व्यक्तींचा सहवास लाभला त्यांच्या कडून थिएटर आर्टस् चे धडे गिरवत असतानाच माझी सेट डिजाईन मधील रुची आणि समज पाहून वामन केंद्रे सरांना नेहमी माझे कौतुक असायचे, कामाप्रती माझं असलेले  डेडिकेशन आणि माझं कौशल्य पाहून अकॅडेमीच्या प्रत्येक कार्यक्रमात मला पुढाकार घेण्यास ते सतत प्रोत्साहित करीत असत, त्यामुळे माझा उत्साह नेहमी इतरांपेक्षा जास्त असायचा पुढे पुढे तर फार मोठमोठ्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या जाऊ लागल्या, दोन वर्ष शिकत असताना अकॅडेमी मध्ये माझी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करण्यात मी यशस्वी ठरलो. थिएटर आर्टस् चे शास्त्रीय शिक्षण घेत असताना स्वतःवर संस्कार होताना मी अनुभवलेत,त्यातच एक मजेशीर आठवण म्हणजे संगीततज्ज्ञ अशोक रानडे सर हे कलानगर मधील साहित्य सहवास मध्ये राहतं होते आणि जवळच असलेल्या टीचर्स कॉलनी मध्ये मी राहायचो त्यामुळे ऑफिस च्या कामानिमित्त एकदा मला साहित्य सहवास मध्ये जाण्याचा योग आला, पण एकदा गेल्यानंतर सर आणि मॅडम कडून मला एका वेगळ्याच आपुलकीचा अनुभव मिळाला,माझा स्वभाव पाहून त्यांनी माझं नामकरण जंटलमन असे केले, माझ्यासाठी ती फार मोठी प्रेमाची पावती होती, त्यांच्या कडे वारंवार जाणंयेणं सुरु राहिलं, मी घरी गेल्यानंतर माझ्यासाठी काहीतरी गोड खायला केलेलं असायचं, आणि गंम्मत म्हणजे दोघेही मला जंटलमन ह्याच नावाने हाक मारीत असत, पुढे जाऊन त्यांच्या कुटुंबाशी मी कधी जोडला गेलो हे मला कळलंच नाही,ज्या ठिकाणी सगळे साहित्यिक राहतात आणि जिथे सचिन तेंडुलकर चे बालपण गेले अश्या साहित्य सहवास मध्ये रानडे सरांच्या निमित्ताने वारंवार जाण्याची संधी मला मिळत होती ह्याचा मला अभिमान वाटतो. अश्या ह्या अनेक थोरामोठ्यांचा परिसस्पर्श मला लाभला त्या अनुभवांचा आणि मला मिळालेल्या शिक्षणाचा फायदा मला व्यक्तिगत आयुष्यातही होताना मी अनुभवतोय. हे सगळं घडत असतानाच अखेर आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांमधुनही मी माझे शिक्षण उत्तम रित्या पूर्ण केले.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : थिएटर आर्टस् मध्ये पदव्युत्तर परीक्षा पास झाल्यानंतर तुमचा कला क्षेत्रातील प्रवास, तुम्ही केलेली कामे ह्या बद्दल आपण आपल्या वाचकांना काय सांगाल?

संतोष : अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् मध्ये शिकत असतांना  आत्तापर्यंत पासआऊट  होऊन गेलेल्या इतर कोणत्याही विद्यार्थ्यांपेक्षा मला जास्त कामं करण्याची संधी मिळाली.  सुमारे वीस पेक्षा अधिक क्लास रूम, प्रोडक्शन साठी सेट डिझाईन करण्याची संधी मिळाली.  पुढे प्रसिद्ध नाटककार रणजीत कपूर सरांच्या ' हम रहे ना हम '  आणि  ' कोर्टमार्शल '  ह्या नाटकांसाठी नेपथ्यकार म्हणून कामं करण्याची संधी मिळाली. त्या नंतर सिनेनाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे ह्यांच्या ' 26/11 A High Alert ' ह्या नाटकात लेखन,अभिनय तसेच नेपथ्य करण्याची संधी मिळाली, त्या नंतर मी  ८ व्या '  इंटरनॅशनल वूमेन्स प्लेराईट कॉन्फेरंस ' आणि ६ व्या राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवासाठी सेट डिसाईन तसेच टेकनिकल को-ऑर्डिनेटर म्हणून कामं पहिले.पुढे मंगेश बनसोड दिग्दर्शित ' लोटन '  तसेच मिलिंद इनामदार दिग्दर्शित ' ऐन वसंतात अर्ध्या रात्री '  ह्या नाटकांसाठी नेपथ्य सहाय्यक म्हणून कामं पहिले. पुढे एके दिवशी वामन केंद्रे सरांचा मला फोन आला आणि सांगितलं की तुला एका मोठया इव्हेंट साठी को-ऑर्डिनेटर म्हणून कामं पाहायचं आहे.  त्यानुसार मी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित ' महाराष्ट्र युवा रंग महोत्सव ' साठी को-ऑर्डिनेटर म्हणून कामं पाहिले. माझं ते कामं पाहून PLD च्या संचालिका सौ . सुप्रभा अगरवाल (IAS) मॅडम  ह्यांना माझं कामं आवडलं. त्यांनी मला पु. लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी साठी काम कराल का  म्हणून विचारलं, मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. इथून खऱ्या अर्थाने माझ्या कामांना गती मिळाली. रवींद्र नाट्य मंदिर हे पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या अखत्यारीत येत असल्या कारणाने इतर इव्हेंट सोबतच मी रवींद्र नाट्य मंदिर साठीही कामं पाहू लागलो. माझ्या राहण्याची व्यवस्था तिथेच करण्यात आली होती, त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत अनेक कलाकारांना भेटण्याची संधी सहज मिळायची. कोणत्या न कोणत्या कामानिमित्त अनेक नामवंत कलाकार मला समोरून भेटायला येत असतं, सुरवातीच्या काळात ह्या गोष्टीच मला फार अप्रूप वाटत असे, PLD साठी कामं करत असतांना  अनेक कलाकारांचा सहवास मला लाभला . त्यात विशेषकरून दिलीप प्रभावळकर, किरण शांताराम, जब्बार पटेल, कमलाकर नाडकर्णी, पंडित अजय पोहनकर ह्यांच्याशी चर्चा करण्याची नेहमी संधी मिळत असे.सौ . सुप्रभा अगरवाल मॅडम सारख्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ IAS ऑफिसर सोबतच कामं करीत असताना खूप प्रेरणा मिळत असे.त्यांची कामं करण्याची पद्धत आणि प्रशासकीय कामांवरील पकड ह्या गोष्टी मला खूप काही शिकवत होत्या, पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ साली ' महाराष्ट्र फूड फेस्टिवल ' ह्या शासनाच्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ह्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. कार्यक्रम design करणं, बजेट करणं, स्टॉल्स डिजाईन करून ते तयार करणे, तंत्रज्ञ निवडणे त्यांचे मानधन निश्चित करणे ह्या व इतर अनेक जबाबदाऱ्या मी यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित ' NORTH EAST CHILDREN THEATRE FESTIVAL ' ह्या आणखी एका मोठ्या इव्हेंटची जबाबदारी मी पार पाडली.  त्या इव्हेंट मध्ये जवळ-जवळ १० ते १२ नाटकांसाठी सेट तयार करण्यासोबतच को-ऑर्डिनेटर  व टेक्निकल डायरेक्टर  म्हणून कामं पहिले.माझे कामं उत्तमरीत्या चालू असतांनाच  पुन्हा एकदा वामन केंद्रे सरांनी भेटायला बोलावलं आणि मला थेट अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् म्हणजे जिथे मी नाट्यप्रशिक्षण घेतले. त्या माझ्या संस्थेत तांत्रिक अधीक्षक म्हणून कामं करशील का ? म्हणून विचारणा केली. पण PLD मधील कामं सोडून दुसरे कामं स्विकारणं माझ्यासाठी थोडं अवघड होतं . पण वामन सरांनी अगरवाल मॅडमशी चर्चा करून मला अकॅडमी मध्ये कामं करण्यास तयार केले, खरंतर युनिव्हर्सिटी मधील जॉब गव्हर्नमेंट असल्यामुळे माझ्या मनाची तयारी होतं नव्हती . कारण मला स्वतंत्रपणे बाहेर कामं करता येणार नव्हतं. पण वामन सरांच्या सांगण्यावरून मी अकॅडमी जॉईन केली. तिथे जॉईन झाल्यानंतर मला कला दिग्दर्शक म्हणून दोन सिनेमांसाठी विचारणा करण्यात आली होती.  पण विद्यापीठात कामं करीत असल्यामुळे मी ते सिनेमे नाकारले. पुढे दोन वर्ष अकॅडमी मध्ये तांत्रिक अधीक्षक म्हणून कामं पाहत असतांनाच अचानक कौटुंबिक कारणास्तव मला कामं सोडावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय भारूड महोत्सवासाठी तांत्रिक सहाय्यक तसेच को-ऑर्डिनेटर म्हणून कामं पहिले त्यानंतर अनिरुद्ध कुठवड दिग्दर्शित नाटकासाठी टेक्निकल इन्चार्ज, तसेच नॅशनल हिस्ट्री काँग्रेस समिट साठी को-ऑर्डिनेटर म्हणून भूमिका बजावली.हे सगळं घडत असताना वामन केंद्रे सरांच्या ' NO SEX PLEASE ';ह्या नाटकासाठी नेपथ्यकार म्हणून कामं करण्याची संधी मिळाली, पुढे वामन सरांच्याच ' ले सौगंध तू ' ह्या नाटकासाठी नेपथ्यकार तसेच प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून कामं पहिले. ह्या सोबतच वामन केंद्रे यांच्या बेसिक आणि ऍडव्हान्स एक्टिंग वर्कशॉप साठी सहाय्यक म्हणूनही कामं पहिले. त्यानंतर २०१४ मध्ये मी सांस्कृतिक कार्य संचालनालयाशी जोडला गेलो.तिथे माझा संपर्क सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे सरांशी आला.  तिथेही माझ्या कामाच्या शैलीमुळे त्यांच्या मनात मी माझं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालो . पुढे जाऊन २०१४ मध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ' नुपूर महोत्सव ' 'राज्य सांस्कृतिक पुरस्कार ' आणि ' स्त्री शक्ती महोत्सव ' साठी समन्वयक म्हणून कामं पहिले.खरंतर हे सगळं करीत असतांना  अनेक मोठ्या मोठ्या संधी मला मिळत गेल्या . त्यानंतर अखेर आहार्य क्रिएटर्स ह्या स्वतःच्या बॅनर च्या माध्यमातून आजतागायत असंख्य इव्हेंट्सची जबाबदारी पार पाडत आलो आहे.

 

मुलाखतकार - राजेंद्र वखरे : आपल्या कुटुंबाबद्दल थोडक्यात काय माहिती द्याल? आणि तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासाबद्दल त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत?

संतोष : कुटुंबाबद्दल सांगायचं तर आम्ही एकूण पाच सदस्य आई, वडील आणि आम्ही तीन भावंडं. आम्हा भावंडांमध्ये मी सगळ्यात लहान. माझे वडील बृहन्मुंबई महानगर पालिकेत कार्यरत होते, १९९५ साली ते सेवानिवृत्त झाले.माझ्या जडणघडणीत त्यांचं योगदान हे फार मोठं राहिलंय, कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदाऱ्या पार पाडीत असतांना त्यांची होणारी तारेवरची कसरत आम्ही पाहिलीय, त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार अनुभवलेत.माझ्या संपुर्ण प्रवासात त्यांना जे जे शक्य होते ते योगदान त्यांनी दिलंय वेळोवेळी त्यांच्याकडून मिळालेला नैतिक आधार माझ्यासाठी खूप मोठा होता. नक्कीच त्यांना माझ्या ह्या प्रवासाबद्दल खूप आनंद आहे.आई बद्दल म्हणायचं तर वडिलांच्या अनुपस्थितीत घराची सगळी जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती . स्वतः अशिक्षित असूनही आपल्या मुलांनी चांगल शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं हा नेहमी तिचा ध्यास असायचा, म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत वेळप्रसंगी तिला कठोर होताना आम्ही पाहिलंय.  सततचं आजारपण आणि त्यात आर्थिक समस्या असतानाही तिने आम्हा भावंडाना कशाचीही कमी पडू न देता आम्हाला वाढवलं. माझ्या ह्या प्रवासात आईचं योगदान खूपच मोठं आहे, प्रत्येक अडचणींच्या वेळेस ती माझ्या आणि वडिलांमधला दुवा म्हणून भूमिका पार पाडत आलीय, आम्हा तीन भावंडांमध्ये सर्वात मोठी माझी बहिण वैशाली.खूप लवकर लग्न होऊन ती सासरी गेली पण तरीही जेव्हा जेव्हा आवश्यकता असायची तेव्हा तेव्हा तिचा पाठिंबा मला नेहमीच ती देत आलीय. माझा मोठा भाऊ रंजीत, बारावी पर्यंतचे शिक्षण आटपून तो मुंबईत त्याच्या कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाला आहे, लहानपणापासूनच आम्हा दोघांमध्ये एक विशेष बॉण्डिंग राहिलंय, ह्या क्षेत्रात यायचं माझ्या मनात आलं त्या क्षणापासून तो माझ्या सोबतच असायचा,त्याला शक्य होईल तेवढी तो नेहमीच मला मदत करीत आलाय.आज त्यालाही माझ्या प्रवासाबद्दल खूप अभिमान वाटतो.येणाऱ्या प्रत्येक अडचणींमध्ये मला माझ्या कुटुंबाचं न