तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या  १०१ कौशल्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

CRIME BORDER | 2 February 2024 09:26 AM

मुंबई, : - पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील, असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सांगितले.

               सह्याद्री अतिथीगृह येथे पी. एम. विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील१०१ केंद्रांच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मनी, केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सचिव अतुल तिवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, राज्यातील १५ जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्वकर्मा केंद्राचे संचालक, स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित  होते.

           मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून राज्यात नवनवीन  स्टार्टअपही सुरू व्हावीत. या स्टार्टअपनी जागतिक स्पर्धेत उतरावे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजेनेच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील १०१ तुकड्यांना हे प्रशिक्षण देतोय. आगामी काळात अन्य जिल्ह्यांतही या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल. त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल.

            राज्यात कौशल्य विकासासाठी मुंबईसह, नागपूर, पुणे येथे कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केली आहेत. राज्यात नमो रोजगार अभियानांतर्गत नमो महारोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये मेळावा आयोजित केला होता. लवकरच ठाण्यामध्ये हा मेळावा होईल. महाराष्ट्र हे उद्योगाभिमुख, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि प्राधान्य देणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येतेय. दावोस मध्ये ३ लाख ८३ हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून अनेक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

           प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील १०१ केंद्रांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला.

राज्यात अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

           कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग राज्यात जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर देत असून, राज्यात ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे सुरू झाली आहेत. आज पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजना देखील १५ जिल्ह्यात १०१ ठिकाणी सुरू करत आहोत. यापुढे ही संख्या वाढविण्यात येईल. नमो महारोजगार मेळावे, रोजगार मेळावे यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन प्रत्येक हाताला काम देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.