अनैतिक प्रेमसंबंधात पती ठरला अडसर, पत्नीने पतीचा घेतला जीव -

नागपूर : नातेसंबंध हे विश्वासावर अवलंबून असतात, पण जेव्हा तेच नाते विकृत वासनेच्या गर्तेमध्ये अडकते तेव्हा गुन्हा घडतो. अशीच काहीशी एक घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं अर्धांगवायु झालेल्या पतीची गळा आवळून हत्या (Wife Killed Husband) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केल्याची माहिती, सय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी दिली.
अनैतिक प्रेमसंबंधात पती ठरला अडथळा : चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक समजून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, दुसऱ्या दिवशी शव-विच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके यांचा मृत्यू अकस्मात नसून तर गळा आवळून झाल्याचं स्पष्ट झालं. यावरून वाठोडा पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. मृतकाची पत्नी दिशा चंद्रसेन रामटेके हिची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी दिशा रामटेक हिने तिच्या प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांतूनच नवऱ्याची हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती सय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी दिली.
पत्नीच्या संबांधची माहिती नवऱ्याला : मृत चंद्रसेन रामटेके हे यापूर्वी एका ट्रॅव्हल्स कंपनीत मॅनेजर होते. दीड वर्षापूर्वी अर्धांगवायु झाल्यामुळं चंद्रसेन हे घरीच होते. आरोपी दिशाने शुध्द पाणीपुरवठ्याचा प्लँट लावला. ती पाण्याचा ठिकठिकाणी पुरवठा करुन, घरचा उदरनिर्वाह चालवत होती. तिचा प्रियकर आरोपी आसिफ राजा इस्लाम अंसारी उर्फ राजा बाबूचे टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान आहे. टायर पंक्चर दुरुस्तीच्या निमित्ताने दिशा आणि आसिफ यांची ओळख झाली आणि यातून त्यांच्यात प्रेम फुलले.
नवऱ्याने जाब विचारला म्हणून केली हत्या : आसिफ सोबत संबंध लक्षात आल्याने चंद्रसेन यांनी दिशाला जाब विचारला. यातून वारंवार होणाऱ्या वादांमुळं वैतागलेल्या दिशाने प्रियकर आसिफसोबत संगनमत करून पतीला संपवण्याचा कट रचला. ४ जुलै रोजी दुपारी दिशाने आसिफला घरी बोलावलं आणि पतीचा उशीने तोंड दाबून गळ आवळला. यात चंद्रसेन यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.sabhr etvbharat