विवाहिता हत्या प्रकरण : प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचं पुन्हा गावातील तरुणाशी जुळलं सूत; प्रियकरानं काढला काटा

CRIME BORDER | 16 July 2025 03:27 PM

सातारा : शिवथर गावातील विवाहितेच्या हत्येचं गूढ उकललं असून घरात एकटी असताना गावातीलच प्रियकरानं घरात घुसून तिचा गळा चिरून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आणत सातारा ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. अक्षय रामचंद्र साबळे असं संशयित मारेकऱ्याचं नाव आहे. संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली.

दुपारची वेळ गाठून मारेकऱ्यानं डाव साधला : मृत पूजाचं घर शिवथर गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. त्या वस्तीवर पाच सहा घरं आहेत. लोक शेतात गेल्यानं दुपारी वस्तीवर शुकशुकाट होता. पूजाचा पती कामावर गेला होता तर सासू-सासरे शेतात गेले होते. पूजा घरात एकटी असल्याची संधी साधून अक्षय घरात घुसला. त्यांच्यात लग्नावरून वाद झाला. त्या रागातूनच अक्षयनं चाकूनं गळा चिरून तिची हत्या केली आणि पळून गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोघांच्या प्रेमसंबंधाची गावात होती कुणकुण : पूजा आणि अक्षयच्या प्रेमसंबंधाची शिवथर गावातील अनेकांना कुणकुण होती. त्यामुळं हत्येचं गूढ उकलण्यासाठी पोलिसांना फारसे कष्ट पडले नाहीत. नाहीत. संशयिताचं नाव निष्पन्न झालं. मात्र, तो पळून गेल्यानं त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तांत्रिक मदत पोलिसांना घ्यावी लागली. त्या आधारे सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डी. बी.) पथकानं पुण्यात जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक चौकशीमध्ये त्यानं प्रेमसंबंधातून पूजाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.sabhr etvbharat