भर दुपारी घरात घुसून विवाहितेची निर्घृण हत्या; श्वान पथक घटनास्थळी दाखल -

CRIME BORDER | 16 July 2025 03:31 PM

सातारा : भर दुपारी घरात घुसून अज्ञात मारेकऱ्यानं विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना शिवथर (ता. सातारा) गावात घडली आहे. पूजा प्रथमेश जाधव (वय 25), असं मृत महिलेचं नाव आहे. 2017 साली तिचा गावातीलच प्रथमेश जाधव नावाच्या तरूणाशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 7 वर्षाचा मुलगा आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट, संशयित अज्ञात : महिलेच्या खुनाची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर सातारा तालुक्यात खळबळ उडाली. विवाहितेची हत्या का झाली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच संशयित देखील अज्ञात आहे. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर साताऱ्याचे डीवायएसपी राजीव नवले आणि पोलीस अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शिवविच्छेदनासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

विवाहिता घरात होती एकटी : पूजा जाधव हिचा शिवथर गावातीलच प्रथमेश या तरुणाशी 2017 साली प्रेमविवाह झाला होता. गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शिवथर-मालगाव रस्त्यालगत त्यांचं घर आहे. घरात सासू, सासरे, पती प्रथमेश आणि मुलगा यश राहत होते. प्रथमेशचा भाऊ सागर जाधव हा कामानिमित्त पुण्यात राहतो. सोमवारी पती हा मुलाला शाळेत सोडून कामावर गेला होता, तर सासू-सासरे शेतात गेले होते. घराचे सर्व दरवाजे उघडे असल्याने शेजारी राहणारी एक आजी त्यांच्या घरात गेली असताना हत्येची घटना उघडकीस आली.

वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथकासह दाखल : महिलेच्या हत्येची घटना समोर आल्यानंतर शेजाऱ्यांनी शेतामध्ये कामाला गेलेल्या सासू-सासऱ्यांसह पतीला बोलावून घेतले. सुनेचा मृतदेह पाहून सासू सासरे हादरून गेले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांकडून तपासाला गती : विवाहितेची गळा चिरून हत्या झाल्याच्या खळबळजनक घटनेनंतर साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर, डीवायएसपी राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोर्डे, नेवसे, उपनिरीक्षक गुरव, शिंदे, महसूल अधिकारी विशाल पवार, माजी पोलीस पाटील भारत पाटील यांच्यासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस लवकरच हत्त्येचा गुन्हा उघडकीस आणतील, असा विश्वास पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी व्यक्त केला आहे.etv bhart