33 वर्षीय महिलेवर लोणावळ्यात लैंगिक अत्याचार; 24 तासांच्या आत आरोपीला अटक

CRIME BORDER | 20 July 2025 03:35 PM

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील एका गावात 15 जुलैला दुपारी एका 33 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर कोणताही ठोस पुरावा नसताना शिताफीनं तपास करत पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला काही तासात अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयानं 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोणावळ्यातील एका गावात महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना झाल्यानंतर कोणताही पुरावा नसताना ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 24 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. बाळू दत्तू शिर्के (वय अंदाजे 37 असं याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 "15 जुलैला लोणावळ्यातील एका गावात 33 वर्षीय महिला रस्त्यानं चालत जात होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीनं त्या महिलेचा पाठलाग करत तिची वाट अडवली. यानंतर त्या महिलेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगल परिसरातील निर्जनस्थळी नेऊन तिच्या इच्छेविरूद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीचा तत्काळ शोध घेण्यासाठी पोलीस अंमलदारांची पथकं तयार करून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यात आरोपीनं घातलेल्या जॅकेटमुळं पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बाळू दत्तू शिर्के याला अटक केली," अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.

आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयानं आरोपीला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील तपास सुरू केला आहे. sabhar etvbhart