भिकाऱ्याचा विम्याच्या रक्कमेसाठी खून करणारा आरोपी गजाआड

नाशिक : तीन वर्षांपूर्वी विमाचा लाभ घेण्यासाठी एका विमाधारकाच्या चेहऱ्याशी जुळणाऱ्या भिकाऱ्याला ठार मारलं होतं. या गुन्ह्यात फरार असलेला मुख्य संशयित आरोपी योगेश साळवी याला पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शाखाच्या पथकानं तब्बल तीन वर्षांनी बेड्या नंतर ठोकल्यात. संशयित योगेश हा साधूचा वेश परिधान करून शहरात वावरत होता.
नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2022 साली एका अनोळखी भिकाऱ्याचा निर्घृणपणं खून झाला होता. त्यानंतर वर्षभरानं मुंबई नाका हद्दीत विम्याची रक्कम लाटण्यासाठी चक्क भिकारीच्या खुनातील संशयित विमाधारकाचा खून करण्यात आला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी भिकाऱ्याचाही खून उघडकीस आणला होता. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रजनी उके, दीपक भारुडकर, मंगेश सावकार, योगेश साळवी आणि प्रणव साळवी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात योगेश हा फरार होता.
साधूचे वेशांतर करून पोलिसांना देत होता गुंगारा-संशयित आरोपी योगेश साळवी हा गेल्या तीन वर्षापासून साधूचे वेशांतर करून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यानं परराज्यामध्ये आश्रय घेतला होता. वेशांतर करत त्यानं नर्मदा परिक्रमा आणि प्रयागच्या कुंभमेळ्याचं पर्वणी स्नानही केलं. काही दिवसांपूर्वी तो त्रंबकेश्वर मध्ये राहिल्यानंतर नाशिकला आला होता. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिकच्या मालेगाव स्टॅन्ड भागात सापळा रचून पोलिसांनी योगेश साळवी याला अटक केली.
विम्याच्या रक्कमेसाठी दोघांचा बळी-विमाधारकाच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्या विमाधारकाच्या चेहऱ्याशी जुळणारा चेहरा शोधून एका भिकाऱ्याचा या टोळीनं खून केला होता. त्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं दाखवून तोच व्यक्ती हा विमाधारक आहे, असा बनाव करण्यात आला होता. त्यात, त्यांना यश मिळालं नाही. या टोळीने नंतर विमाधारक अशोक भालेराव याच्या खुनाचा कट रचला. संगनमताने त्याची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. मात्र, पोलीस तपासात या टोळीचा पर्दाफाश झाला होता.
तीन वर्षांपासून होता फरार-2022 आणि 2023 मध्ये झालेल्या खुनाच्या घटनेतील संशयित आरोपी योगेश साळवी हा पोलिसांना हवा होता.गेल्या तीन वर्षापासून पोलिस त्याच्या मागावर होते. अशातच 14 जुलै रोजी तो पंचवटी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून तो साधूचा वेश परिधान करून वावरत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. sabhar etvbhart