अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

CRIME BORDER | 19 August 2025 05:01 PM

ठाणे:- गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामानखात्याने ठाणे शहराला रेड अलर्ट दिला आहे, या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24X7 कार्यान्वित असून या कक्षाची पाहणी ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज केली. यावेळी त्यांनी शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासन यांनी समन्वय साधून काम करावे, असे नमूद केले.

यावेळी प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे महापालिकेचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर आदी उपस्थित होते.

ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून तक्रारींचे निवारण कशा प्रकारे केले जाते. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षात येणाऱ्या दूरध्वनीद्वारे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून त्या त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणारी यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा, उपलब्ध असलेले मनुष्यबळ आदींबाबतची सर्व माहिती जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाणून घेतली.

संपूर्ण शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे डाटा सेंटर हाजुरी येथे असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहरात उद्भवत असलेल्या ‍ परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे. तसेच एनडीआरएफच्या धर्तीवर (टीडीआरएफ) ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल असून या माध्यमातून ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्याचे काम केले असल्याचे उपायुक्त गोदेपुरे यांनी नमूद केले. आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रत्येक दूरध्वनीवरुन आलेल्या तक्रारींचे निवारण हे काही मिनिटातच केले जात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. तडवी यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी देखील सर्व माहिती जाणून घेत असताना महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांनी समन्वयाने काम करुन शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींचे निवारण करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित केले. तसेच सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही दिल्या.