ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन,

CRIME BORDER | 19 August 2025 05:08 PM

कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी साधावा संपर्क

ठाणे :- ठाणे जिल्ह्याला आज दि.19 ऑगस्ट 2025 रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील खाडी आणि नदी / नाला इ. पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०२२- २५३०१७४० किंवा ९३७२३३८८२७ या क्रमांकावर अथवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

आपत्ती अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने दि.19 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळा / महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त उर्वरीत कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडणेबाबत कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्याबाबत कार्यालयप्रमुखांना निर्देशित करण्यात आले आहे. दि.20 ऑगस्ट 2025 रोजी शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत पावसाच्या अंदाजानुसार आज (दि.19 ऑगस्ट रोजी) संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असेही ठाणे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.