आपत्‍कालीन स्थितीमध्‍ये फ्रण्‍टलाइन मेडिक्‍स: मानसिक आरोग्‍य उत्तम राखणे महत्त्वाचे- मानसोपचार तज्ञ डॉ. केदार तिलवे

CRIME BORDER | 12 September 2022 06:58 PM

नवी मुंबईतील वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटलमधील इंटेसिव्‍ह केअरचे वरिष्‍ठ सल्‍लागार डॉ. चंद्रशेखर तुलसीगिरी व मानसोपचार तज्ञ डॉ. केदार तिलवे यांचा लेख-कोविड-१९ महामारी जगभरात वणव्‍यासारखी पसरत आहे. या महामारीचा लाखो लोकांच्‍या जीवनावर आणि संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे जगभरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. पण गेल्‍या काही महिन्‍यांपासून हेल्‍थकेअर व्‍यावसायिक संसर्गाचे निराकरण करण्‍यासाठी धैर्याने काम करत आहेत. आरोग्‍यसेवा कर्मचा-यांमध्‍ये 'संसर्गाचे निर्मूलन' करण्‍याच्‍या दबावामुळे त्‍यांच्‍यावर प्रचंड शारीरिक व मानसिक तणाव निर्माण झाला आहे.

 

वारंवार उच्‍च दबाव निर्माण करणा-या स्थिती उद्भवत असल्‍यामुळे आपत्‍कालीन स्थितीमध्‍ये शारीरिक व विशेषत: मानसिक तणाव निर्माण होण्‍याच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत आहे. आरोग्‍यसेवा कर्मचा-यांना एकाच वेळी वैद्यकीय केअरसंबंधित आपत्‍कालीन स्थितींसोबत वैयक्तिक व व्‍यावसायिक जबाबदा-या पार पाडाव्‍या लागत आहेत. या जबाबदा-यांचा अनेकदा कामावर परिणाम होऊन व्‍यक्‍तीवर तणाव निर्माण होतो. सामान्‍यपणे अपघात, आयसीयू, ऑपरेटिंग रूम्‍स अशा आपत्‍कालीन सेट अप्‍समध्‍ये काम करणा-या आरोग्‍यसेवा कर्मचा-यांमध्‍ये चिंता, औदासिन्य, चिडचिडेपणा, निद्रानाश इत्‍यादींसारख्‍या मानसिक आरोग्‍यविषयक समस्‍या आढळून आल्‍या आहेत.

 

कारणे जाणून घेणे हा समस्‍येवर नियंत्रण ठेवण्‍याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांचे मानसिक आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य सुधारण्‍यासाठी स्‍वत: आरोग्‍यसेवा व्‍यावसायिक, स्‍थानिक आरोग्‍यसेवा प्रशासकीय अधिकारी आणि हॉस्पिटल यांच्‍याकडून संघटित प्रयत्‍न आवश्‍यक आहेत. आरोग्‍यसेवा कर्मचा-यांमध्‍ये असलेले काही तणावपूर्ण घटक पुढीलप्रमाणे:

 

- संसर्ग होण्‍याची भिती

- उपचार करण्‍यात येणा-या रूग्‍णांच्‍या मृत्‍यूमुळे उपचार करणा-या कर्मचा-यामध्‍ये नकारात्‍मक विचार येऊ शकतो

- दीर्घकाळापर्यंत काम करण्‍याची वेळ किंवा अनेक ठिकाणी अपुरा कर्मचारीवर्ग

- वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक असुरक्षितता निर्माण होण्‍याची शक्‍यता

- आपत्‍कालीन सेटअपमध्‍ये स्थिती खालावत चाललेल्‍या रूग्‍णांना जलद व कार्यक्षम उपचार देण्‍याची गरज

- अशा स्थितींची हाताळणी करण्‍यासाठी अपुरे प्रशिक्षण किंवा सुसज्‍जता (ही स्थिती प्रत्‍येक ठिकाणी वेगळी असू शकते)

- आरोग्‍यसेवा कर्मचा-यांमधील झोप-उठण्‍यासंदर्भातील चक्रामध्‍ये बदल झाल्‍यामुळे कामावर नसताना पुरेसा आराम व झोप मिळण्‍याचा अभाव

- आरोग्‍यसेवा कर्मचा-यांमध्‍ये मनोरंजनपूर्ण कार्यक्रमांचा अभाव किंवा अशा उपक्रमांप्रती जागरूकतेचा अभाव

आरोग्‍यसेवा व्‍यावसायिक त्‍यांना स्‍वत:ला कशाप्रकारे मदत करू शकतात?

 

(१) जीवनशैलीमध्‍ये बदल आणि काम व जीवनामध्‍ये संतुलन:

-  पुरेसा आराम घ्या आणि दिवसातून किमान ७ तास झोप घ्‍या.

- आपत्‍कालीन सेट अप्‍समध्‍ये तणाव टाळता येऊ शकत नाही, पण कामाच्‍या ठिकाणी असलेल्‍या कामाचा ताण विसरण्‍याचा प्रयत्‍न करा. मोकळ्या मनाने घरी जा.

- मनोरंजनपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्‍या. दीर्घकाळापासून गमावलेल्‍या छंदांना उजाळा द्या आणि ते जोपसण्‍याला वेळ द्या.

-नियमितपणे व्‍यायाम करा किंवा मैदानी खेळ खेळा; यामुळे चिंता व तणाव कमी होऊन एण्‍डोर्फिन पातळ्या वाढतात.

-आहारामध्‍ये हिरव्‍या पालेभाज्‍या व प्रथिनांची भर करत आरोग्‍यदायी व संतुलित आहाराचे सेवन करा. तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ सेवन करणे टाळा.

- दररोज एक तास सुर्यप्रकाशामध्‍ये जा.

- दररोज काही वेळ योगा किंवा मेडिटेशन करण्‍यास सुरूवात करा. यामुळे तणाव, क्रोध व चिंता दूर होण्‍यामध्‍ये मदत होते.  

 

(२) स्‍वत:ला सक्षम करा:

- तुम्‍हाला स्‍वत:ला आणि टीममधील इतर सदस्‍यांना मानसिकदृष्‍ट्या सुसज्‍ज करण्‍याकरिता हॉस्पिटलमध्‍ये आयोजित करण्‍यात येणा-या मॉक‍ ड्रिल्‍समध्‍ये सहभाग घ्‍या.

- नियमितपणे तुमचे ज्ञान, कौशल्‍य व आत्‍मविश्‍वास वाढवण्‍याप्रती काम करा; तुमच्‍या टीममधील सदस्‍यांना या स्‍वयं-विकास सवयी आत्‍मसात करण्‍यासाठी प्रेरित करा.  

- आरोग्‍यसेवा कर्मचा-यांना नोव्हेल व अवघड केसेस किंवा स्थितींचा सामना करावा लागू शकतो; तुमची टीम व सहका-यांसोबत याबाबत सविस्‍तरपणे चर्चा केल्‍याने अनुभव व ज्ञानामध्‍ये भर होईल.

 

(३) कुटुंबाला सामावून घ्‍या:

- कुटुंब हे भावनिक पाठिंब्‍याचे मूलभूत स्रोत आहे आणि त्‍यांचे आरोग्‍य हे चिंतेचे प्रमुख कारण असू शकते. आरोग्‍यसेवा कर्मचा-यांनी त्‍यांना कामाचे स्‍वरूप, घ्‍यावयाचे खबरदारीचे उपाय आणि निर्धारित करण्‍यात आलेले सुरक्षितताविषयक नियमांबाबत सांगावे. कुटुंबाला वेळ द्या; यामुळे तणाव दूर होण्‍यामध्‍ये मदत होते.

 

(४) नित्‍यक्रम निर्धारित करा:

- आपल्‍या क्षमतेपलीकडे काम करताना येणारे अहेतूपूर्ण अडथळे कमी करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे रोजचा कामाचा नित्‍यक्रम निर्धारित करणे आणि या नियमाचे पालन करणे; विशेषत: सद्यस्थितीमध्‍ये वैयक्तिक सुरक्षितता महत्त्वाची असल्‍यामुळे हे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

-सावधगिरीच्‍या तंत्रांचा वापर केल्‍याने मनावरील ताण दूर करण्‍यामध्‍ये आणि हातामध्‍ये असलेल्‍या कामावर लक्ष देण्‍यामध्‍ये लाभदायी ठरू शकते.

 

(५) सुरक्षितता जाळे तयार करणे:

- उच्‍च ताणाच्‍या स्थितींमध्‍ये काम करताना काहीवेळा भावनिकदृष्‍ट्या उत्‍साहित होण्‍यासोबत मानसिकदृष्‍ट्या खचून देखील जातो. अशा महत्त्वपूर्ण स्थितींना जाणून घेऊन त्‍यांचा सामना करण्‍यास शिकणे भावनिक आरोग्‍य व व्‍यावसायिक कार्यक्षमतेसाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

- दिवसातून किमान एकदा सहकारी व परिचित व्‍यक्‍ती किंवा शुभचिंतकासोबत संवाद साधा.

- तुमचे काम पूर्ण झाल्‍यानंतर प्रियजनांसोबत संवाद साधण्‍यासाठी वेळ काढा.

- गरज असल्‍यास मानसिक आरोग्‍य व्‍यावसायिक किंवा तुमच्‍या परिसरामध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या स्‍ट्रेस हेल्‍पलाइन्‍सना भेट द्या.

शरीर आरोग्‍यदायी असल्‍यास मन देखील स्वस्थ राहते. त्‍याचप्रमाणे आरोग्‍यदायी मन शरीर स्वस्थ राखण्‍यासाठी आवश्‍यक आहे. स्थिर व विविध प्रयत्‍नांसह हे ध्‍येय साध्‍य करता येऊ शकते.