गृहीणी...!!! लेखक - दीपक कांबळी 

CRIME BORDER | 13 September 2022 06:00 PM

अमृता एक उच्च शिक्षित महिला. करिअरच्या बाबतीत ती फार उत्सुक होती. आपल्या शिक्षणाचा समाजासाठी कुटुंबासाठी काहीतरी फायदा करून द्यायचा अशा विचाराची अमृता, पण नियतिने तिच्यासाठी काही वेगळेच लिहीले होते. सगळ्यात पहिला अडसर म्हणजे लग्न. बोलणी करताना हे ठरलं होतं की आमची मुलगी शिकलेली आहे, ती नोकरी करणार. त्यांना नोकरीची काही गरज नव्हती, कारण मुलगा मल्टिनॅशनल कंपनीचा सिईओ होता. एका पाॅश सोसायटीत त्याचा फ्लॅट होता. जिथे महिला जीम आणि किटी पार्टी मधे रमत होत्या. तिथे नोकरी करणा-या महिला नव्हत्या पण त्यांना अमृता पसंत पडली होती. त्यांनी नोकरीसाठी हो म्हंटल. लग्न झालं आणि वर्षात ती गरोदर राहिली. हा दुसरा अडथळा तिला सचिनच्या वेळेस कडक डोहाळे होते. खूप त्रास होत होता तिला जाॅब सोडायला लागला आणि तिथून पुढे ती बाहेर पडूच शकली नाही.

 

नंतर दोन वर्षाने सई झाली आणि ती मुलांमधेच अडकून पडली. तिच्या शिक्षणाचा उपयोग आता फक्त मुलांच्या अभ्यास घेण्या पुरताच होता. आता यांचे चौकोनी कुटुंब झाले होते तसे सगळेच ठीक होते पण अमृता मधे मधे डिस्टर्ब व्हायची, जेव्हा ती टीव्ही वर कर्तबगार महिलांच्या मुलाखती पहायची, तेव्हा तिला आपली किव यायची याचसाठी मी उच्च शिक्षण घेतलं होतं? रांधा वाढा उष्टी काढा एखाद्या अडाणी बाई सारखंच तिला वाटायचं. घरात मात्र तिला प्रत्येक बाबतीत गृहीत धरलं जातं होतं. कधी कधी ती एकटीच रडत रहायची. मुलांच्या मागेच तिचा सगळा वेळ जायचा. 

 

आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून जवळच्या काही मित्र मैत्रीणींना जेवायला बोलावले होतं. घरात सगळ्यांची तयारी सुरू आहे. हीची आवराआवर सुरूच आहे सई मधेच सुचना देऊन जाते, आई तू लवकर आवर सगळे यायची वेळ झाली. तू तयारी केव्हा करणार अगबाई सहा वाजले पण. तिची लगबग सुरू होते. बेल वाजते एक एकजण यायला सुरुवात होते. 

 

हळूहळू घर भरते. मग कुणीतरी गाण्याचा आग्रह करते नेहमी प्रमाणे अमृताला गाण्याची फरमाईश होते. अमृताचा आवाज मुळातच सुंदर. आज ती साडीत खूप खुलून दिसत होती. ती गाणं सुरू करते "ये तेरा घर ये मेरा घर..." सगळे स्तब्धगाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट गाण्यात आकाश हरवून जातो डोळ्यासमोर जुना काळ एखाद्या चित्रपटा सारखा सरकतो. टाळ्यांच्या आवाजाने तो भानावर येतो. मग पुरुषांच्या आणि मुलांच्या गाण्यांच्या भेंड्या सुरू होतात आणि महिला किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागतात. अमृताचा स्वयंपाक तयारच असतो सकाळ पासून राबून प्रत्येक गोष्ट अगदी मनासारखी व्हायला हवी हा नेहमीच तिचा प्रयास असतो. पंगती सुरू होतात आधी मुले मग पुरूष आणि शेवटी बायका. 

 

जायची वेळ येते. सगळ्यांनी मिळून प्रत्येकाला एक गिफ्ट आणली आहे. मग ते उघडून बघण्याचा आग्रह होतो. पहिल्यांदा मुलांची गिफ्ट उघली जातात, सईला एक छान फ्राॅक, सचिनला सुंदर टेडी मग मोठ्यांची पाळी प्रकाशला मस्त टिशर्ट, त्याला घालून बघण्याचा आग्रह होतो. तोही बेडमधे जाऊन चेंज करून येतो. बाहेर आल्यावर कमेंटस् वाॅव, मस्तच, छान, वगैरे वगैरे.. आता पाळी अमृताची. ती हळूहळू पॅक उघडते, आत असते एक कोटेड छोटीशी इस्त्री! तिचा चेहरा पडतो, कशी आहे? कुणीतरी विचारते 'छान आहे' असे म्हणून ती हसण्याचा प्रयत्न करते आणि किचन मधे पळते. 

 

तिच्या डोळ्यात पाणी येतं असे नेहमी का घडते? सगळ्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी आणि गृहीणीला नेहमी गृहीत धरून अशाच वस्तू दिल्या जातात तिचं आयुष्य तिचं जग सगळं काही जणू फक्त सेवाच?. सगळे निघून जातात आकाश आणि मुलं थकून झोपी जातात. अमृता मात्र याच विचारात की आता हे बदलायला हवं आणि याची सुरवात आपणच करायची पुढची पार्टी ज्या कुणाकडे असेल तिथे हा नवा पायंडा पाडायचा हा ठाम विचार मनात येताच तिचं मन हलकं होतं. तिला शांत झोप लागते....

 

लेखक - दीपक कांबळी : राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई  - ९९८७१९३३३८

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे: बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा - मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६