द ग्रेट व्हिजिट ह्या मोबाईल संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिल्या महिला होमगार्ड राष्ट्रपती पदक प्राप्त राजश्रीताई लाखन यांची विशेष मुलाखत-एक नजर गृहरक्षक दलावर
होमगार्ड ला राबवलं जातं पण आवश्यक त्या सोयी आणि सुविधा मात्र शासनाकडून दिल्या जात नाहीत.चार चार महिने भत्ते मिळतं नाहीत तरीही एकवेळ उपासमारीची वेळ ओढवलेली असतानाही होमगार्ड आपलं कर्तव्य बजावत असतो.होमगार्ड ला भेडसवणाऱ्या समस्या वेळोवेळी शासनदरबारी मांडूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जातं नाही.जेव्हा खेळांच्या स्पर्धा असतं तेव्हा मला दिल्ली,लखनऊ, बंगलोर येथे जाण्याची संधी मिळालीय.होमगार्ड मध्ये ज्युडो, कराटे,योगाभ्यास ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं सोबतच फर्स्ट किट, विमोचन,प्रगत शिक्षण,अग्निशमन असे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते.
राजेंद्र वखरे : वंदे मातरम राजश्रीताई सर्वप्रथम “द ग्रेट व्हिजिट”ह्या "मोबाईल संवाद" कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो, गृहरक्षक दलातील आपल्या प्रदीर्घ सेवेत आपण आपल्या कार्य क्षेत्र व विभागात खुप लोकप्रिय राहिलेल्या आहात. आपण दिलेल्या सेवेची पोचपावती म्हणजे " राष्ट्रपती पदक " प्राप्त पुरस्काराने झालेला आपला सन्मान.आपल्यासारख्या अतिशय कणखर, कार्यतत्पर तसेच कुटुंबवत्सल असणाऱ्या व्यक्तिमत्वाची मुलाखत ही गृहरक्षक दलात येऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी,सोबतच समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेलं.
राजश्रीताई लाखन : सर्वप्रथम मी आपले खुप आभार व्यक्त करते की , आपण मला ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिलीत.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई मुलाखतीला सुरुवात करीत असतांना आपल्या वाचकांना नक्कीच उत्सुकता असणार की आपलं जन्मस्थान कोणतं आणि आपलं बालपण कुठे आणि कसे गेले?
राजश्रीताई लाखन : माझा जन्म हा मुंबईत झाला, पण माझं बरंचसं बालपण हे मुंबई तसेच कर्नाटकात गेले.
राजेंद्र वखरे : आपण आपलं कुटुंब आणि कुटुंबातील एकंदरीत वातावरणाबद्दल आपल्या वाचक व श्रोत्यांना काय सांगाल?
राजश्रीताई लाखन : मी माझे पती आणि माझ्या दोन मुली असा छोटासा परिवार आहे, माझे पती हे मिल मध्ये कामाला आहेत, धाकटी मुलगी आत्ताच B.A.पास झालीय आणि मोठ्या मुलीचे लग्न झालेय तिला दोन मुलं आहेत. एकंदरीत काय तर छोटं आणि आनंदी अस माझं कुटुंब आहे.
राजेंद्र वखरे : आपण आपल्या शिक्षणाबद्दल काय सांगाल? आपलं शालेय शिक्षण कुठे आणि कसं झालं?
राजश्रीताई लाखन : माझं शालेय शिक्षण हे कर्नाटक मधून कन्नड मिडियम मध्ये झालंय.आणि पुढील बारावीचं शिक्षण हे मुंबईमध्ये झाले.
राजेंद्र वखरे : आपले छंद आणि आवडी-निवडी ह्याबद्दल आपण काय सांगाल.
राजश्रीताई लाखन : छंद आणि आवडीनिवडी बद्दल सांगायचं तर मला योगाभ्यास आणि वेगवेगळे exercises करायला आवडतात.त्यात योगाभ्यासाचा आमचा एक ग्रुप आहे, ज्यात आम्ही दररोज योगाचे वेगवेगळे प्रकार शिकत असतो.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई प्रत्येकाला त्याच्या लहानपणी वाटत असतं की मोठेपणी आपण डॉक्टर , इंजिनियर, वकील व्हावं, पण आपल्यासारख्या तेव्हाच्या तरुणीला होमगार्ड क्षेत्रात यावं हा विचार आपल्या मनात केव्हा आला?
राजश्रीताई लाखन : कामानिमित्त माझे वडील हे त्यावेळेस मुंबईतच रहात होते. पण दुर्दैवाने माझ्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले.आमच्या कुटुंबावर तो फार मोठा आघात होता. वडिलांच्या निधनानंतर आम्ही कर्नाटक मधून मुंबईला आलो. इथे मुंबईत आमचं कुणीच ओळखीचं नव्हतं त्यामुळे इथे आम्हाला कुणाकडून मदत मिळेल असं वातावरण नव्हतं त्यात माझी आई गावाला राहणारी असल्यामुळे तिलाही इथलं काहीच माहित नव्हतं त्यामुळे अडचणी खुप होत्या.अश्या परिस्थितीत घराचा गाडा हाकायचा कसा हा यक्षप्रश्न होताच त्यामुळे साहजिकच घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली त्यामुळे मला माझं शालेयशिक्षण मध्येच थांबवून नोकरी पत्करावी लागली.वयाच्या दहाव्या वर्ष्यापासून मी काम करू लागली, अश्या त्या खडतर परिस्थितीतही एकीकडे नोकरी, घर, तर दुसरीकडे शिक्षणाची तळमळ होतीच.पुढे नोकरी सांभाळत रात्रशाळेत जाऊन मी माझे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, तो पर्यंत मेहनत करण्याची सवय ही अंगी चांगलीच बाणली गेली होती.
वयाच्या बाविसाव्या वर्षी माझे लग्न झाले.माझे पती हे जरी मिलमध्ये कामं करीत असले तरी त्यांच्या मनात देशप्रेम, देश सेवा ह्या बद्दल खुप आवड होती खरंतर त्यांना सैन्यात भरती व्हायचं होत पण काही अडचणींमुळे ते शक्य झाले नाही पण देशसेवा करण्याची त्यांची तळमळ होती तिचं तळमळ माझ्या अंगी आली आणि आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो . ह्या भावनेतून आपल्याहातून देशसेवा घडावी हे नेहमी वाटत असे पुढे त्यातच एके दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली, ती जाहिरात गृहरक्षक दला (होमगार्ड )ची होती, ज्यांना देशसेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या संघटनेमध्ये सामील व्हावं असं त्या जाहिरातीत आवाहन केलं होतं, त्यामुळे मी लगेचच होमगार्ड शी जोडले गेले.
राजेंद्र वखरे : आपण होमगार्ड हेच क्षेत्रं निवडण्यामागे आपली नेमकी भूमिका आणि प्रेरणा काय होती?
राजश्रीताई लाखन : देशसेवा करता यावी ही इच्छा होतीच पण मी मुंबईत आल्यानंतर काही काळ मला राष्ट्र सेवा दल ह्या संघटनेमध्ये जायची संधी मिळाली आणि तेथून माझी देशसेवेची आवड आणखीनच वाढू लागली. थोडक्यात देशसेवा हे धेय्य मला गृहरक्षक दला (होमगार्ड ) कडे घेऊन गेले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई आपल्या गृहरक्षक दल (होमगार्ड ) बद्दल काय भावना आहेत? त्याबाबतीत आपण थोडक्यात काय सांगू शकाल?
राजश्रीताई लाखन : होमगार्ड ही एक अशी संघटना आहे जी सामाजिक उपक्रमांत पोलिसांच्या बरोबरीने सेवा देते, ह्या दलात भरती झाल्यानंतर उत्तम प्रशिक्षण दिलं जातं ज्या आधारे जीवनात खूप फायदा तर होतोच सोबतच त्या आधारे प्रगतीच्या मार्गाला जाण्यास मदत होते.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई महाराष्ट्रात एकंदरीत किती होमगार्ड्स आहेत आणि त्यात महिलांचे प्रमाण किती आहे.
राजश्रीताई लाखन : संपूर्ण महाराष्ट्रात एकूण पंचेचाळीस हजार होमगार्डस आहेत त्यापैकी अकरा हजार ह्या महिला होमगार्ड आहेत.
राजेंद्र वखरे : महिला होमगार्ड व पुरुष होमगार्ड ह्यांच्या कामाचे तास सारखेच असतात का? आणि आपल्याला अतिरिक्त वेळेच्या कामाचे किती पैसे दिले जातात?
राजश्रीताई लाखन : तसं पाहता पुरुष आणि महिला होमगार्ड ह्यांच्या कामाचे तास हे सारखेच असतात.सर्वसाधारण बारा तासाची ड्युटी असते आणि ओव्हरटाईम बद्दल म्हणाल तर तुम्ही जेव्हा कामावर रुजू होता तेव्हा तुम्ही बारा तास काम केले किंवा चोवीस तास काम केले तरी निश्चित केलेले ५७० रुपये हेच मानधन तुम्हाला दिले जाते.
राजेंद्र वखरे : बरं मग कोरोना ह्या महामारीच्या काळात आपल्याला दिल्या जाणाऱ्या भत्त्यात काही वाढ झालीय का?
राजश्रीताई लाखन : हो कोरोना च्या काळात आम्हाला महानगरपालिकेकडून ९८८ रुपये देण्यात येणार आहेत पण अद्यापपर्यंत ते आम्हाला मिळालेले नाहीत,त्याबाबतही आम्ही वारंवार पाठपुरावा करीत आहोत. खरंतर कोरोना ह्या संकटात जिथे जायला आणि यायला कोणती साधनं नाहीत अश्या वेळेतही केवळ सेवा करायला मिळतेय ह्या भावनेतून होमगार्ड दिवस रात्र सेवा देतोय. पण हाती केवळ निराशा मिळतेय. आमच्या हक्काच्या पैश्यासाठीही आम्हाला वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे, ह्याहून आणखी काय शोकांतिका असेल?काहीना नोव्हेंबर तर काहीना डिसेंबर पासून आजतागायत मानधन मिळालेले नाहीये.
राजेंद्र वखरे : मग अश्या वेळेस महिला तसेच पुरुष होमगार्ड आपला घरखर्च आणि इतर खर्च कसा भागवताहेत ?
राजश्रीताई लाखन : मी तेच म्हणतेय की, भत्ते वेळेत मिळत नाही त्यामुळे असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, जेव्हा कधी तीन चार महिन्याचा भत्ता एकदम येतो त्यावेळेस काटकसर करून, पैसे सांभाळून वापरण्याशिवाय पर्याय नसतो. बऱ्याचदा काहींना वाण्याकडून तीन चार महिन्याची उधारी ठेवून घरातील आवश्यक सामान भरावे लागते तर काहीजण भत्ता वेळेत मिळत नाही म्हणून किंवा मिळणाऱ्या भत्त्यात घर सांभाळणं अशक्य होतं असल्याकारणाने बाहेरही कामाला जातात.
राजेंद्र वखरे : म्हणजे एकीकडे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गृहरक्षक दलाची पोलीस विभागाच्या समकक्ष विभाग म्हणून शासन दरबारी नोंद असतानाही तटपुंज वेतन तेही वेळेत नाही त्यासोबतच सेवेत नियमिततेचा अभाव अश्या परिस्थितीतही देशसेवा करीत असताना निदान आवश्यक सेवा सुविधातरी उपलब्ध व्हाव्यात ह्या साठी नक्की काय उपाययोजना होणं अपेक्षित आहे?
राजश्रीताई लाखन : खरंतर ह्या समस्यांचा सामना नेहमीच करावा लागतं आलाय. वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करीत असतानाही आम्हाला त्यात यश मिळतं नाहीये ह्याचं नक्कीच वाईट वाटतं. ह्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ह्यांना आमच्या प्रश्नांच्या संदर्भात आम्ही भेटीसाठी शुक्रवार दिनांक १० जुलै २०२० रोजी पत्र पाठविले आहे.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई आपल्या ह्या सर्व समस्या मांडण्यासाठी कोणत्या संघटना कार्यरत आहेत का?
राजश्रीताई लाखन : खरंतर संघटना वगैरे हे आमच्या नियमात बसत नाही, तरीही वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आम्ही नागपूर येथे 'ऑल महाराष्ट्र होमगार्ड विकास समिती'स्थापन केलेली आहे.ही कोणतीही युनियन नसून एक धर्मादाय आयुक्त संघटना आहे,ज्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील होमगार्डचे काम पहिले जाते. ह्या संघटनेवर बंदी आणण्याचे प्रयत्न करण्यात आले पण आम्ही एकजुटीने ते प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.
राजेंद्र वखरे : असं म्हणतात की होमगार्ड हा एक पोलीस व संवेदनशील असतो ह्यावर आपलं काय मत आहे.
राजश्रीताई लाखन : अगदी खरं आहे, होमगार्ड हा संवेदनशील असतोच. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करीत असतो हे जरी खरं असलं तरी एक खंत अशी आहे की होमगार्ड ला राबवलं जातं पण आवश्यक त्या सोयी आणि सुविधा मात्र शासनाकडून दिल्या जात नाहीत.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई आपण सोयी आणि सुविधांबद्दल म्हणालात, होमगार्ड आणि सध्याची सामाजिक स्थिती ह्यावर आपण काय सांगाल?
राजश्रीताई लाखन : सध्याची सामाजिक स्थिती ही अत्यंत बिकट अशीच म्हणावी लागेल, आणि ही बिकट अवस्था आपल्याला गृहरक्षक दलाकडे (होमगार्ड ) पाहून लक्षात येईल.चार चार महिने भत्ते मिळतं नाहीत तरीही एकवेळ उपासमारीची वेळ ओढवलेली असतानाही होमगार्ड आपलं कर्तव्य बजावत असतो. होमगार्ड ला भेडसवणाऱ्या समस्या वेळोवेळी शासनदरबारी मांडूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जातं नाही.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई, अनेक बेरोजगार युवती लक्षणीय संख्येत कर्तव्य बजावण्यासाठी गृहरक्षक दलात (होमगार्ड )आता सहभागी होताना आपल्याला दिसतायत, अश्या नव्याने सेवेत येऊ इच्छिणाऱ्यांना विशेषतः तरुणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
राजश्रीताई लाखन : अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर मी प्रशिक्षण देत असताना सर्वप्रथम मुलींचं शिक्षण पाहते, एखाद्या मुलीचे शिक्षण दहावी किंवा कमी असेल तर अश्या मुलींना दुसरीकडे रोजगार मिळवणं तेवढं शक्य नसतं त्यांच्यासाठी होमगार्ड ठीक आहे पण ज्या मुलींचं शिक्षण बारावी आहे किंवा ग्रॅजुएशन पर्यंत झालेले असेल तर मी त्या मुलींना हाच सल्ला देते की इथे आलायत तर चांगलं प्रशिक्षण घ्या, इथून बाहेर पडून इतरही चांगले कोर्सेस करून पोलिसात भरती होण्यासाठी प्रयत्न करा कारणं होमगार्डमधून पोलिसात भरती होण्यासाठी दहा टक्के आरक्षण आहे किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये काम मिळवा कारणं तुमच्या कडे शिक्षण आहे टॅलेंट आहे तर मग तुम्ही आणखी चांगल्या ठिकाणी तुमचं करियर करू शकता तुम्हाला होमगार्ड मध्ये भविष्य नाही, होमगार्ड मध्ये परिस्थिती फार बिकट आहे त्यात आधीच अनेक समस्या आहेत.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई आपण होमगार्ड मध्ये किती वर्षापासून सेवेत आहात?
राजश्रीताई लाखन : मी गेली पस्तीस वर्षे होमगार्ड मध्ये कार्यरत आहे.
राजेंद्र वखरे : बरं मग ह्या आपल्या पस्तीस वर्ष्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात आपण कामानिमित्त म्हणा किंवा बंदोबस्तासाठी कुठे कुठे गेला आहात?
राजश्रीताई लाखन : बंदोबस्तासाठी मी सातारा, सांगली, रायगड ह्या ठिकाणी सेवा बजावली आहे, ह्या व्यतिरिक्त तशी मला बंदोबस्तासाठी बाहेर जाण्याची जास्त संधी मिळाली नाही पण मुळात मला खेळाची आवड असल्याकारणाने जेव्हा खेळांच्या स्पर्धा असतं तेव्हा मला दिल्ली, लखनऊ, बंगलोर येथे जाण्याची संधी मिळालीय.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई आपल्या प्रदीर्घ अश्या सेवा काळात आपला असंख्य लोकांशी संपर्क आला असणार तर आपला महाराष्ट्रात साधारण किती लोकांशी संपर्क असेल? सोबतच त्यापैकी बऱ्याच दिग्गज लोकांशी आपला संपर्क आला असेल तर अश्या व्यक्तींचा आपल्यावर काय प्रभाव पडला असं आपल्याला वाटतं?
राजश्रीताई लाखन : नक्की आकडा सांगता येणार नाही पण अनेक लोकांशी माझा संपर्क आजही आहे. माझ्या एवढ्या वर्षांच्या सेवाकाळात अनेक माणसं जोडली गेलीत,खूप चांगली, वाईट माणसं आयुष्यात पाहिलीत, प्रत्येका कडून काहीनाकाही शिकायला मिळालंय, बऱ्याचदा माझ्या कामाचं कौतुक केलं जायचं त्या आधारे वाट्टेल ती मदत करण्याची आश्वासने दिली जायची पण खरं सांगते प्रत्यक्षात मात्र कधीही कुणी मदत केली नाही,.ह्याची उदाहरणे द्यायची तर मी सांगेन की एखाद्या वेळेस एखादा होमगार्ड रेल्वेसाठी सेवा बजावत असतांना एखादा प्रसंग ओढवला गेला तर तिथे असणारे अधिकारी किंवा टीसी हे त्या होमगार्ड ना कोणतही सहकार्य करीत नाहीत, कित्येकदा बंदोबस्तावेळी पोलीस हे होमगार्ड ला पुढे करतात पण एखादा प्रसंग ओढावतोय असे लक्षात येताच पोलीस हे होमगार्ड ला सहकार्य करण्याकरिता पुढे येताना दिसत नाहीत.
राजेंद्र वखरे : गृहरक्षक दलातील आपला कौतुकास्पद राहिलेला प्रवास, सेवेत असतांना आपण केलेली कामे ह्या कडे आपण आज मागे वळून कश्या पाहता.
राजश्रीताई लाखन : अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आल्यामुळे,आणि अत्यंत साधा स्वभाव असल्यामुळे सुरुवातीला आपण ह्या क्षेत्रात कसे निभावून नेणार हा प्रश्न होताच.पण हळू हळू माझ्यात आत्मविश्वास येऊ लागला, माझी प्रगती होऊ लागली, सुरुवातीला मला लोकांशी बोलतांना अडचण येत असे, भीती वाटत असे पण कालांतराने ती भीतीही नाहीशी झाली. होमगार्ड मध्ये ज्युडो, कराटे, योगाभ्यास ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं सोबतच फर्स्ट किट, विमोचन, प्रगत शिक्षण, अग्निशमन असे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते त्याचा मला खुप फायदा झाला.मुळातच कन्नड मिडियम मध्ये शिक्षण झालेले असल्यामुळे सुरुवातीला मराठी बोलताना अडचण येत असे पण होमगार्ड मध्ये आल्यानंतर भाषेवर काम करता आलं आणि आज मी चांगलं मराठी बोलू शकते. होमगार्ड मध्ये सेवा करीत असतानाच मी माझे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, सभेमध्ये बिनधिक्कत बोलण्याचे धाडस माझ्या अंगी आले त्याचे श्रेय मी होमगार्डलाच देईन. थोडक्यात काय तर ह्या क्षेत्रातील आर्थिक विवंचना सोडल्या तर एक उत्तम नागरिक हा होमगार्ड मार्फत घडला जातो ह्यात शंकाच नाही.
राजेंद्र वखरे : आपल्या ह्या संपुर्ण प्रवासाबद्दल आपल्या कुटुंबियांच्या काय भावना आहेत.
राजश्रीताई लाखन : माझे पती, दोन मुली, माझी बहिण आणि आई ह्यांचा माझ्या प्रवासात खुप मोलाचा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलेलं आहे. होमगार्ड चे कामाचे स्वरूप आपण सगळे जाणून आहात. कधी कुठे बंदोबस्तासाठी जावे लागे हे कधी निश्चित नसे त्यात कुठे इमर्जन्सी आली तर रात्री अपरात्री बंदोबस्तासाठी हजर राहावे लागतं असे अश्या वेळेत मी एक स्त्री असल्यामुळे कामासोबत इतरही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना कुटुंबाचा आधार आणि पाठिंबा हा अतिशय महत्वाचा असतो, जो मला माझ्या कुटुंबियांकडून सातत्याने मिळतं राहिलाय.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई आपल्या प्रदीर्घ अश्या सेवेत असा एखादा कोणता प्रसंग आठवतो का? ज्याने तुम्हाला खुप त्रास झाला आहे.
राजश्रीताई लाखन : हो एक प्रसंग नेहमीच आठवतो.तस पाहता बंदोबस्त म्हंटल की जोखीम आणि तणाव हा आलाच पण १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या घटना आजही डोळ्यसमोरून जात नाहीत, 26 जुलै 1993 रोजी मी रेल्वेला जोगेश्वरी पॉईंट येथे ड्युटी बजावत होती आणि दुर्दैवाने त्याच पॉइंटला बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोट नंतरचे दृश्य अतिशय भयावह असे होते, जिकडे तिकडे रक्ताच्या थारोळ्यात अगदी छिन्न विछिन्न अवस्थेत अस्ताव्यस्त पडलेले मृतदेह होते,लोकांच्या किंकाळ्या, आक्रोश,ती पळापळ आणि त्यातच बघ्यांना आवरण्याची जबाबदारी. ह्या सगळ्या घटनेत माझ्या बाजूला एक महिला होती जी वेड्यासारखी करत होती, बॉमस्फोटचा कानठळ्या बसवणारा तो आवाज आणि ते मृतदेह पाहून त्या महिलेला बसलेला मानसिक धक्का, ही घटना आज २७ वर्षानंतरही माझ्या डोळ्यासमोरून जातं नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात भयावह अशी ती दुर्घटना होती .
राजेंद्र वखरे : राजश्रीताई आपण सेवा बजावत असतांना असा एखादा आनंदाचा क्षण आठवतो का जो तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत?
राजश्रीताई लाखन : हो निश्चितच.असे अनेक आनंदाचे क्षण मी अनुभवलेत पण एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो की दरवर्षी २६ जानेवारी रोजी जी "हाफ परेड" होत असते. त्यासाठी दरवर्षी पाच ते सहा अधिकाऱ्यांपैकी एकाची निवड ही त्या परेड चे नेतृत्व करण्यासाठी होतं असते आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, गेली वीस वर्षे सातत्याने ह्या परेड चे नेतृत्व करण्याची संधी मला मिळतेय. त्या सोबतच मला ह्याही गोष्टीचा मनस्वी आनंद आहे की, मी महाराष्ट्रातील पाहिली महिला होमगार्ड आहे जीला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई होमगार्ड मधील आपल्या सेवेत आपल्याला भावलेले असे कर्तव्यनिष्ठ असे अधिकारी कोण आहेत?
राजश्रीताई लाखन : माझ्या एवढ्या वर्षाच्या सेवेत माझा अनेक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांशी संपर्क आला. पण त्यातही आवर्जून उल्लेख करायचा झाल्यास मी श्री . संजय कदम साहेबांचे नाव घेईन, कारणं ते अतिशय मनमिळावू आणि नेहमी सहकार्य करणारे असे अधिकारी आहेत असे असतानाही ट्रैनिंग पिरियड मध्ये वेळेला आणि शिस्तीला अतिशय महत्व देणारे ते अधिकारी असल्यामुळे ट्रेनिंग मध्ये खुप चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर युवती गृहरक्षक दलात (होमगार्ड ) सहभागी होताना दिसत आहेत, तर महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षक असतात का? आणि असाव्यात का? ह्यावर आपण काय सांगाल?
राजश्रीताई लाखन : नव्याने सहभागी होणाऱ्या महिलांचे प्रमाण पाहता महिला प्रशिक्षक असावाच असं मला कायमच वाटतं, पण आमच्या परिसरात होणाऱ्या प्रशिक्षणात आम्ही प्रशिक्षक म्हणून काम पाहतो पण मोठ्या प्रशिक्षण केंद्रात महिला प्रशिक्षक नसतात. त्याबाबतीत सविस्तर बोलायचं तर महिलांना सांभाळणे, ट्रेनिंग पिरियड मध्ये त्यांना येणाऱ्या समस्या समजून त्यावर उपाय योजना करण्यासाठी आम्ही सहाय्यक म्हणून भूमिका बजावत असतो पण महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्याकरिता ज्या सोयीसुविधा आवश्यक असतात त्या उपलब्ध होतं नाहीत त्यामुळे महिला प्रशिक्षक असावी असं वाटत असूनही ते तितकंसं शक्य नाहीये.
राजेंद्र वखरे :आपल्या संपूर्ण सेवेत आपल्या आठवणीत राहणारे आपले सहकारी मित्र मैत्रिणी ह्यांच्याबद्दल आपण काय सांगाल?
राजश्रीताई लाखन : महिला फारशा पुढे येतांना आढळत नाहीत पण तरीही मी आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे सौ. अनिता राऊळ ह्या माझ्या सहकारी मैत्रिणीचा, कधीही, कोणतंही काम असो, ती मला मदत करण्यासाठी सदैव हजर असते. आणि पुरुषांमध्ये श्री. बाबुराव काटकर आणि श्री . सचिन गावडे ह्या सहकाऱ्यांचा मी उल्लेख करेन जे सतत मदत आणि वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात.
राजेंद्र वखरे : राजश्रीताई मी आपल्याला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतो की आपल्या ह्या संपूर्ण प्रवासातील यशाचे जर कुणाला श्रेय द्यायचे झाले तर ते आपण कुणाला द्याल?
राजश्रीताई लाखन : माझ्या संपूर्ण प्रवासातील यशाचे श्रेय हे साहजिकच माझ्या पतींना देईन, त्यांचा पाठिंबा, प्रेम आणि सहकार्याशिवाय आज ह्या ठिकाणी पोहचणं आणि स्वतःला सिद्ध करणं शक्य झाले नसते.प्रत्येक यशस्वी पुरुषमागे एक स्त्री असते असं म्हणतात, पण ह्याउलट मी असं म्हणेन की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो, माझ्याबाबतीत असं म्हणणं वावगं ठरू नये.
राजेंद्र वखरे : नक्कीच.राष्ट्रपती पदक विजेत्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होमगार्ड, असामान्य व कर्तृत्ववान अशा सौ . राजश्रीताई लाखन यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांच्या संपूर्ण प्रवासातील कटू आणि गोड आठवणींना उजाळा देतअसतांनाच आपल्याला राजश्रीताईंच्या स्वभावातील जसा हळुवारपणा सामोर आला तसाच त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा आपल्याला पाहायला मिळालाय, त्यांनी बरेचसे मुद्दे पटवून सांगितले, खरं तर पोलीस दलाला समकक्ष असणाऱ्या गृहरक्षक दलाला (होमगार्ड )त्याच बरोबरीचा सामाजिक दर्जा देण्यात शासनाला येतं असलेलं अपयश तसेच सेवा आणि सुविधांच्या अभावी गृहरक्षक दलाची होणारी ससेहोलपटही राजश्रीताईंच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली.अहोरात्र भूमिका बजावणाऱ्या गृहरक्षकांना मात्र आर्थिक व इतर मदतीची हात न मिळाल्याने होमगार्ड मध्ये पसरलेली निराशा जशी त्यांनी आपल्या सामोर आणली तशीच माणूस म्हणून अभिमानाने समाजात वावरण्यासाठी होमगार्ड कसे सहाय्य्यभुत आहे हे गौरवोदगारही त्यांनी काढले. तुटपुंजे वेतन तेही वेळेत मिळत नसल्याची खंत, सेवेत अनियमितता व इतर अनेक बाबतीत शासनदरबारी पाठपुरावा करणाऱ्या राजश्रीताई सरतेशेवटी सांगतात की, गृहरक्षक दलात नव्याने सहभागी होणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने महिला समादेशकाची नियुक्ती करण्याची गरज असल्याचे त्या नमूद करतात.
राजश्रीताई आपल्याअर्थात होमगार्ड च्या मागण्या रास्त आहेत आणि भविष्यात त्या मागण्या नक्कीच पूर्ण व्हाव्यात.आपण आमच्याशी मनसोक्तपणे संवाद साधल्याबद्दल संपूर्ण क्राईम बॉर्डर परिवारातर्फे मी आपला आभारी आहे आणि आपल्या भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद,वंदे मातरम्
राजश्रीताई लाखन : आपण मला आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मी ही आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. धन्यवाद, वंदे मातरम्
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे : बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा - मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६
शब्दांकन : संतोष राणे (रायगड जिल्हा प्रमुख:क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन , पत्रकार - क्राईम बॉर्डर )