ताणतणावांमुळे उत्पन्न झालेला हृदयविकार

CRIME BORDER | 15 September 2022 04:55 AM

ताणतणावांमुळे उत्पन्न झालेला हृदयविकार लेखक – डॉ. ब्रजेश कुमार कुंवर -आपल्या सर्वांच्याच आयुष्यात थोडेफार ताणतणाव असतातच, मात्र कोव्हिड 19 ने निर्माण केलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे या ताणतणावांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सामाजिक आणि भावनिक दुरावा, संसर्गाची लागण होण्याची सततची भीती, आपल्या प्रियजनांना गमावण्याची भीती आणि नोकरी सुटणे, दैनंदिन कमाईमध्ये झालेली घट अशा सगळ्या कारणांमुळे आयुष्य मोठे तणावग्रस्त बनून गेले आहे. याशिवाय अपुरी झोप, एखादे आजारपणे, शरीरातील शक्ती संपून जाईपर्यंत अथक काम करणे इत्यादी कारणांमुळेही मनावरील ताण वाढू शकतो. हे ताणतणाव हृदयाच्या आरोग्यावर लक्षणीय प्रभाव टाकू शकतात आणि त्यांना वेळीच ओळखून त्यांवर उपचार केले नाहीत तर प्राणघातकही ठरू शकतात.

ताणतणांवाचा हृदयावर कशाप्रकारे परिणाम होतो ?

ताणतणावांना प्रतिसाद म्हणून शरीरा. कॉर्टिझोल नावाचे एक संप्रेदक उत्सर्जित करते. दीर्घकालीन ताणतणावांना कारणीभूत ठरणा-या कॉर्टिझोलची शरीरातील पातळी वाढली की त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइन अशा सर्व हृदयविकाराचा धोका वाढविणा-या गोष्टींचीही पातळी वाढते. त्यात भर म्हणजे, आर्टरीजमध्ये साचलेला प्लाकचा थर हा सुद्धा ताणतणावांमुळे झालेल्या बदलांचाच एक भाग असू शकतो. तसेच तणावपूर्ण प्रसंगांना प्रतिसाद म्हणून शरीरातील अड्रेनल ग्रंथींमधून ‘कॅटेचोलामाइन्स’ नावाचे संप्रेरक उत्सर्जित केले जाते, त्यामुळेही रक्तदाबात वाढ होते व ही गोष्ट हृदयविकाराचा झटका येण्यास तसेच हृदय निकामी होण्यास कारणीभूत होऊ शकते.

ताणतणावांवर मात करण्यासाठी बरेचदा बेफिकिरीने सिगारेट ओढण्याची इच्छा होते. ताणतणावांची पातळी थोडी जरी वाढली तरी त्यामुळे हृदयाच्या स्नायूंकडे जाणा-या रक्तप्रवाहामध्ये अडथळा येण्यासारख्या हृदयाच्या दुखण्याला निमित्त मिळू शकते – या प्रकारामध्ये हृदयाला पुरेसे रक्त किंवा ऑक्सिजन मिळत नाही. तणावग्रस्ततेची स्थिती दीर्घकाळ तशीच राहिली तर त्याचा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो – अशावेळी रक्त अधिक चिकट बनते व स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

ताणतणावाचा सामना करून हृदयाचे संरक्षण करण्यासाठी:

1-पुरेसा व्यायाम करा.

व्यायामामुळे तणावग्रस्ततेचे हृदयावर होणा-या घातक परिणामांना प्रतिरोध होण्यास मदत होईल. हृदयाच्या आरोग्याला पाठबळ देण्यासाठी दिवसातून किमान अर्धा तास आणि आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करण्याचे लक्ष्य समोर ठेवले पाहिजे. व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होत असल्याने, कॉलेस्ट्रॉलच्या पातळीवर नियंत्रण राहत असल्याने आणि रक्तदाब कमी होत असल्याने कार्डिओव्हॅस्क्युलर अर्थात हृदय व धमन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय, व्यायाम करणा-या माणसांच्या शरीराकडून ताणतणावांना दिला जाणारा प्रतिसाद कमी असतो. तणावाच्या स्थितीमध्ये त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके व्यायाम न करणा-या मंडळींप्रमाणे वाढत नाहीत. नियमितपणे व्यायाम केल्याने नैराश्याचा धोकाही कमी होतो, जे हृदयविकाराचा धोका वाढविणारे आणखी एक कारण आहे.

2.नैराश्य आणि चिंतेवर इलाज करा:

दीर्घकालीन चिंताग्रस्तता किंवा भावनिक ताण यांच्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन अकस्मात मृत्यू येण्याचा धोका वाढू शकतो, असे संशोधनातून आढळून आले आहे. तुम्हाला नैराश्य किंवा चिंता जाणवत असेल तर वैद्यकीय उपचारांची मदत घ्या, या स्थितीवर कोणती औषधे लागू पडतील हे विचारून घ्या. योगासने, चालणे आणि चिंतेची पातळी खाली आणणा-या औषधांसारख्या उपाययोजना करून पहा. मद्यपान, तंबाखूसेवन आणि कॅफिनचे सेवन सोडून द्या, कारण या गोष्टींमुळे चिंताग्रस्ततेमध्ये भर पडते, या गोष्टी तणावाची पातळी आणि रक्तदाबही वाढवितात.

3.कामाचा ताण कमी करा:

निर्णय घेण्याची संधी क्वचितच देणा-या किंवा खूप कमी समाधान मिळवून देणा-या खडतर, कष्टप्रद कामांतून वाढणारी तणावग्रस्तता हृदयविकाराचा धोका खूप जास्त प्रमाणात वाढविते असे अभ्यासांतून दिसून आले आहे. एका अहवालानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये चाळिशीखालच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण नाट्यमयरित्या, जवळ-जवळ तिपटीने वाढले आहे. भारतीय तरुणांमध्ये हार्ट अटॅक्सचे प्रमाण हे पाश्चात्य देशांतील तरुणांपेक्षात 3-4 पट अधिक असल्याचेही ही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल लिहिणा-याच्या मते तरुण मुलांना आपल्या वयापेक्षा या वाढलेल्या धोक्याला तणावग्रस्तताच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. कामाच्या अनियमित वेळा आणि खाण्यापिण्याच्या अपायकारक सवयी यांच्यामुळेच आजकाल तरुण मुले आपल्या वयापेक्षा प्रौढही दिसू लागली आहेत.

तेव्हा नियमितपणे काही वेळ कामापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मनाला सैलावायला मदत करणारे, ज्यात तुम्हाला आनंद मिळेल असे काहीतरी करा, मग ते वाचन असू शकेल, चालणे असू शकेल किंवा एखादा छंद असू शकेल. समुपदेशकही तुम्हाला कामाशी संबंधित ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करणारे काही उपाय सुचवू शकतात.

4.एकमेकांच्या संपर्कात रहा आणि खंबीर सपोर्ट सिस्टिम तयार करा:

सामाजिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेल्या माणसांमध्ये राहणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन लागू झाल्याने आणि प्रवासावर निर्बंध आल्याने अनेक जण आपल्या प्रियजनांपासून दूर अडकले आहेत. यामुळे मानसिक स्वास्थ्याला आधीच असलेले धोके अधिकच वाढले आहेत. इंटरनेट आणि इतर गॅजेट्स तुम्हाला हरक्षणी आपल्या कुटुंब व मित्रपरिवाराच्या संपर्कात रहायला मदत करतील व त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. ऑनलाइन फोरम्स, पॉडकास्ट्स, ग्रुप स्ट्रीमिंगसारख्या गोष्टींच्या माध्यमातून एखादा छंद जपा. एक मजबूत, प्रेमळ अशी आधारयंत्रणा तुमच्याभोवती असेल तर तुम्ही स्वत:ची अधिक चांगली काळजी घेता येईल. ज्याच्यासमोर आपले मन उघड करता येईल, ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल अशी एखादी व्यक्ती सोबत असेल तर तुमच्या मनावरील ताणतणावांचे ओझे कमी व्हायला मदत होऊ शकते.

आपल्या आयुष्यातील ताणतणावांमुळे आपल्याला हृदयविकाराचा असलेला धोका वाढला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या. ते तुम्हाला समुपदेशन, क्लासेस किंवा तुमच्या तणावाची पातळी कमी करून हृदयरोगाचा धोका कमी करू शकतील अशा इतर उपक्रमांचे पर्याय सुचवू शकतील.

डॉ.ब्रजेश कुमार कुंवर,डायरेक्टर आणि हेड–इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉडी,फोर्टिस हॉस्पिटल्सच्या समुहाचा भाग असलेले हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी ~