ज्ञानेश्वरी चिंचोलीकरची यशोगाथा मुंबईची तरुणी थेट अमेरिकेत ‘अ‍ॅटर्नी’शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ 

CRIME BORDER | 14 September 2022 05:41 AM

मुंबई : यश मिळत नाही तर यश मिळवावं लागतं हे ज्ञानेश्वरीने दाखवून दिले आहे . महाराष्ट्र राज्य शासनाकडून विधी शाखेतल्या पदव्युत्तर पदवीसाठी असलेली एकमेव शिष्यवृत्ती मिळवत ज्ञानेश्वरी चिंचोलीकर या मराठी तरुणीने अमेरिकेत जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जागतिक बँकेने तिची निवड केली. न्यूयॉर्क राज्यातील न्यायदान क्षेत्रातील सर्वात अवघड समजण्यात येणारी न्यूयॉर्क बार कॉन्सिलच्या परीक्षेत ज्ञानेश्वरीने गुणांनी प्रावीण्य मिळवले आहे आणि आता तिथे अ‍ॅटर्नी म्हणून काम करण्यास पात्र ठरणार आहे.

 

राज्याकडून उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या २० शिष्यवृत्तीपैकी विधी शाखेतल्या पदव्युत्तर पदवीसाठी असलेली एकमेव शिष्यवृत्ती मिळवत ज्ञानेश्वरीने ‘इंटरनॅशनल लॉ’ या विषयात अमेरिकेतल्या ‘एनवाययू स्कूल ऑफ लॉ कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. वर्षभराचा एलएलएम अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी हाती पडताच जागतिक बँकेच्या वॉशिंग्टन मुख्यालयात ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ अहवालासाठी तिची निवड झाली आहे. त्यासाठी जागतिक बँकेने  ज्ञानेश्वरीला सात हजार अमेरिकन डॉलर्स शिष्यवृत्ती देऊ केली आहे.

 

ज्ञानेश्वरीचं शालेय शिक्षण वांद्रयातील एव्हीएम शाळा आणि नंतर बारावीपर्यंतचे शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. पाच वर्षांचा विधी शाखेचा अभ्यासक्रम प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ, मुंबई इथून पूर्ण केला.

महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलची वकिलीची सनद प्राप्त केली. या प्रत्येक टप्प्यावर ती पहिल्या पाच क्रमांकात असायची. याच क्षेत्रात मास्टर्स पूर्ण करायचं ठरवल्यानंतर तिने महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ‘गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती‘ या योजनेअंतर्गत आपला अर्ज दाखल केला. उत्तम गुणांच्या जोरावर शिष्यवृत्ती पटकावत तिने अमेरिकेतल्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

 

ज्ञानेश्वरी तिच्या परिवारातील चौथ्या पिढीची वकील आहे. तिचे पणजोबा दि. बापूसाहेब तुकाराम चिंचोलीकर हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व निजाम स्टेटमध्ये नंतर राज्यात वकील होते, तिचे आजोबा शिवाजीराव चिंचोलीकर हे सेवा निवृत्त न्यायाधीश आहेत तर तिचे वडील दयानंद चिंचोलीकर हे राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी असून त्यांनी देखील सेवेत येण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात काही वर्षे वकिली केली.साभार लोकसत्ता