वर्दी मधले दर्दी
'भावपूर्ण शब्द' आणि तितकाच 'सुंदर आवाज' याची प्रचिती येते, जेव्हा दीपक कांबळी यांनी लिहिलेले आणि संगीत दिलेले तू जाता दूर परगावा हे गाणे रविंद्र साठे यांच्या आवाजात आपण ऐकतो. दीपक कांबळी यांनी आतापर्यंत पंचावन्न गाणी लिहिली आहेत ज्यात चित्रपट , आहे नाटकं आहेत आणि म्युझिक अल्बम आहेत. त्यापैकी पंधरा गाण्यांना त्यांनी स्वतः सुंदर चाली लावल्या आहेत. दीपकजींशी केलेली बातचीत..
प्रश्न - तुम्ही युनीफाॅर्म सर्वीसमध्ये असून कविता गाणी हे कसं काय जमतं?
उत्तर:- *वर्दी मध्ये सुद्धा दर्दी* असू शकतात, याचं हे उदाहरण आहे. शेवटी वर्दीत सुद्धा माणूसच असतो. त्यालाही मन भावना सगळं असतंच की.
प्रश्न:- तुमची आतापर्यंत १४ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
त्यात कविता संग्रह आहेत, एक नाटक आहे हिंदी कविता आहेत, एकांकीका संग्रह आहेत एवढ्या बिझी शेड्युल मधुन तुम्ही वेळ कसा काढता.
उत्तर:- या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येईल "आवड असली की सवड मिळते" त्याप्रमाणे वेळ मिळेल तेव्हा लिहित गेलो. आता तर मी रिटायर्ड आहे आता भरपूर वेळ आहे लिखाणासाठी.
प्रश्न:- तुमच्या कथाही फार लोकप्रिय झाल्या आहेत आता कथासंग्रह कधी येणार.
उत्तर-: हो सध्या कथांची वाचक संख्या वाढते आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच एखाद्या कथासंग्रह येईल. मला विभागात काम करत असताना आलेल्या अनुभवांवर आधारित कथा लिहायच्या आहेत. ते कामही सुरू आहे.
प्रश्न-: प्रकाशन क्षेत्रात कसे आलात.
उत्तर-: हो मी हल्लीच भद्रकाली पब्लीकेशन या नावाने प्रकाशन संस्था काढली आहे. आमचं "रस्ता" हे विनय शिर्के लिखीत पहिले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
लाॅकडाऊन मधे कर्तव्य बजावत असताना विनयजींनी मोकळ्या रस्त्यांचे फोटो काढून त्यावर लिहिलेल्या अप्रतिम छोट्या छोट्या कवितांचे हे सुंदर पुस्तक आहे. खरंतर हा या काळाचा दस्तावेज आहे. जो पुढील पिढ्यांना इतिहास म्हणून उपयोगी पडेल.
दीपकजी आपण आमच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत याबद्दल आभार. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
- राजेंद्र वखरे : संस्थापक : क्राईम बाॅर्डर