डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक

CRIME BORDER | 14 September 2022 04:46 PM

डोंबिवलीहून राजू नलावडे लिहतात 

डोंबिवली एमआयडीसीची स्थापना १९६४ साली झाल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी सत्तरच्या दशकात जमिनीखालील सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली होती. निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची कामे १९८५ नंतर सुरू करण्यात आली होती. औद्योगिक आणि निवासी मधील सांडपाणी वाहिन्यांना बांधून ३५ ते ५० वर्षाचा काळ लोटला असून त्या अतिशय जीर्ण, नादुरुस्त झाल्या आहेत. त्याची देखभाल दुरुस्ती करणे पण आता शक्य नाही. सदर वाहिन्यांची एकूण लांबी कमीतकमी अंदाजे ३१ किमी इतकी असून १५० ते ८०० व्यासाचा जाडीचे सिमेंट पाईप त्यावेळी टाकण्यात आले होते.

 

कालांतराने विविध कारणांमुळे हे पाईप व त्यावरील चेंबर नादुरुस्त होत गेले. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहिन्या या कंपन्यांचे सांडपाणी वाहून त्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत CETP त्यानंतर प्रक्रिया करून शुद्धीकरण केलेले हे सांडपाणी खाडीत सोडले जाते. औद्योगिक क्षेत्रातील तयार होणारे कंपन्यांचे सांडपाणी मधील सिओडी ( केमिकल ऑक्सिजन डिमांड ) याचे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा त्यात वाढ झाल्यास व इतर रासायनिक घन कचरा आल्यास त्या जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमधून वाहून जातांना वाहिन्यांवर दाब येऊन किंवा चोकअप होऊन त्या वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. शिवाय रस्ते, पाइपलाइन, केबल इत्यादी कामाचा वेळी त्या वाहिन्यांना धक्का बसून नादुरुस्त होत असतात.

 

सदर नादुरुस्त वाहिन्यामधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाजूचा उघड्या नाल्यात किंवा रस्त्यावर वाहते. त्यावेळी त्याचे रासायनिक प्रदूषण होऊन त्याचा उग्र वास आजूबाजूचा परिसरात पसरला जातो. शिवाय ते प्रदूषित न प्रक्रिया केलेले सांडपाणी उघड्या नाल्याद्वारे खाडी, नदीत जाऊन त्यातील पाणी प्रदूषित होत असते.

 

एमआयडीसी निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची स्थिती पण अतिशय खराब झाली आहे. त्या जुन्या झालेल्या वाहिन्यांना रस्ते दुरुस्ती, महानगर गॅस, पाण्याच्या पाइपलाइन तसेच केबल टाकताना त्यांना धक्के बसून त्या नादुरुस्त झाल्या असाव्यात. शिवाय त्यात वृक्षांची खोलवर गेलेली खोड/मुळे वाहिन्यांत शिरून वाहिन्या खराब झाल्या आहेत. निवासी भागात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि त्यांचे चेंबर फुटलेले आढळून येत असून त्यातून बाहेर पडणारे सांडपाण्यामुळे दुर्गंधी येत असते. अशाच प्रकारचा सांडपाण्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोना विषाणूंचे जीवजंतू सापडल्याचे समजले आहे. या सांडपाण्यामुळे मच्छरांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यात निवासी भागातून रोज 4.5 MLD (४५ लाख लिटर) निर्माण होणारे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करिता ते खाडीत सोडले जात आहे. हे माहिती अधिकारातून स्वतः एमआयडीसीने माहिती दिली असल्याने ही बाब गंभीर आहे. शिवाय ड्रेनेज, सांडपाणी वाहिन्या दुरुस्ती करिता निवासी आणि उद्योगांकडून ड्रेनेज कर एमआयडीसी दर महिन्याला पाणी बिलाबरोबर वसूल करीत असून त्यातून एमआयडीसी कडे करोडो रुपये जमा होत आहेत. 

 

वरील नादुरुस्त, जीर्ण, जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमुळे रासायनिक प्रदूषण, दुर्गंधी, आरोग्य, पर्यावरण इत्यादी यांचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. डोंबिवली एमआयडीसी मधील प्रदूषण कमी झाल्याचे विविध प्रयोग आणि दावे काही जणांकडून दाखविले जात आहेत. प्रत्यक्षात प्रदूषणाचा परिस्थितीत काही फरक पडलेला अजून दिसून येत नाही. एमआयडीसी कडून जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे प्राथमिक स्तरावर कागदावर नियोजन चालू आहे. याकामासाठी जरी काही दिवसांनी प्रस्ताव पाठविला तरी त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळणे, टेंडर काढणे इत्यादी कामांसाठी काही महिने/वर्षे जातील त्यानंतर सदर हे मोठे काम पूर्णत्वास येण्यास अजून काही वर्ष जातील. आरोग्य, प्रदूषण याविषयी असलेल्या या महत्त्वाचा प्रश्नात हे काम तातडीने लवकर कसे मार्गी लागेल यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे ही विनंती.