सौ. अर्चना

CRIME BORDER | 14 September 2022 01:06 AM

२५ जून तुझा ६१ वा वाढदिवस ही ६१ वर्षे कशी निघून गेली समजलेच नाही त्यापैकी ३७ वर्षे तू माझ्या सोबत आहेस याशिवाय तीस वर्षे तू शिक्षिकेची नोकरी केलीस मी तुझ्या नोकरीच्या ठिकाणी कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही तुला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. दिले होते म्हणण्यापेक्षा तू ते मिळवलेस. असेच म्हणावे लागेल .कारण आपण दोघेही नोकरीनिमित्त एकमेकापासून कितीही दूर असलो तरी कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यावर एकमेकाला विचारल्याशिवाय कधीही करीत नव्हतो व आताही नाही एकत्र कुटुंबात तू लवकर सामावुन गेलीस प्रत्येकाच्या आवडी निवडी तुला माझ्यापेक्षा जास्त माहित आहेत. प्रत्येकाचे वाढदिवस कधी येतात लग्नाचे वाढदिवस कधी येतात प्रत्येकाच्या कपड्या ची साईज काय आहे हे सर्व तुला माहिती आहे त्यामुळे एकत्र कुटुंबातील सर्वांचा तुझ्यावरच जास्त विश्वास आहे.

 


आठवणीच्या बाबतीत तू कॉम्प्युटर आहेस .त्यामुळे हे सगळं तुझ्या लक्षात राहते घरातील कोणतीही वस्तू कुठे ठेवलेली आहे हे तू जिथे असशील तिथून सांगू शकतेस याबाबतीत तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

 


तू बोलण्यामध्ये फटकळ असलीस तरी पारदर्शी आहेस. तुला प्रत्येकाचे चांगलेच व्हावे असे वाटते त्यामुळे तू प्रत्येकाला सत्य काय आहे ते बोलून दाखवतेस आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी सदैव  प्रयत्नशील असतेस .त्यामुळे नोकरीच्या काळात गरीब विद्यार्थ्यांना तू वेळोवेळी मदत केली आहेस शिवाय काही मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी  त्यांच्या पायावर उभे केले आहेस यात माझी जरी मदत झाली असली तरी जास्त श्रेय तुझेच आहे. कारण त्यांना स्वतःजवळ ठेऊन घेऊन त्यांना मदत करून स्वतःच्या पायावर उभे केले आहेस आणि ती सर्व मुलं तू निवृत्त होऊनही एवढे वर्ष झाली तरी तुला विसरत नाहीत. गुरुपौर्णिमेला दरवर्षी फोन करून तुझी आठवण करतात हे तुझे मोठेपण आहे.
तुझा कामाचा उरक आणि कामावरिल निष्ठा वाखाणण्यासारखीआहे. त्यामुळे नोकरी मध्ये तुला सर्व संधी मिळाल्या . शिक्षकांच्या संघटनेमध्ये तू जीव ओतून काम केलेस. त्यामुळे तुला संघटनेमध्ये चांगले पद भूषविता आले. शिवाय शिक्षकांच्या पतपेढी मध्ये संचालक पदांमध्ये एवढी चुरस असताना सुद्धा तू निवडून आलीस आणि पतपेढीची उपाध्यक्ष सुद्धा झालीस हे केवढी मोठी कामगिरी आहे.

 

 

तुझ्या कामाचे कौतुक सर्वांनीच केले म्हणूनच जिल्हा परिषदेचा सर्वोच्च समजला जाणारा "आदर्श शिक्षक पुरस्कार" तुला मिळाला याशिवाय राज्यस्तरीय "गुरुवर्य अ .आ. देसाई "पूरस्कारही तुला मिळाला.तेव्हा अनेक सामाजिक संस्थांनी तुझा सत्कार केला.एवढ्या कमी वयात अशा प्रकारचे सर्व पुरस्कार , उच्च पदावर काम करण्याची संधी कमी लोकांना मिळते ,त्यात तू आहेस.आतापर्यंत स्त्री म्हणून तुझ्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदार्या  तू यशस्वीपणे पार पाडल्यास आणि सर्व नाती सुद्धा जपत आहेस.आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श आई , आदर्श बहीण, आदर्श वहीनी, आदर्श आत्या, आदर्श मावशी, आदर्श काकू आणि आता आदर्श आजी अशा विविध नात्यात तू आदर्श आहेस आणि ते जपण्यासाठी सदोदित प्रयत्नशील असतेस.
       

 

 किचनमधील तुझा वावर उत्साहवर्धक असतो.घरात बनवलेले पदार्थ गोड केव्हा लागतात,तर घरातील गृहिणी जेवण करताना प्रसन्न असेल तर."मी बनवलेले पदार्थ माझा नवरा ,माझी मुले, नातवंडे,माझे प्रिय नातेवाईक किंवा अन्य प्रिय व्यक्ती खाणार आहेत. ही भावना मनात ठेवून ज्या प्रेमाने पदार्थ बनविले जातात ते प्रेम त्या प्रत्येक पदार्थांमध्ये उतरते आणि म्हणून ते गोड किंवा चविष्ट लागते . हे सर्व तू किचन मध्ये वावरताना तुझ्या ठिकाणी असते म्हणूनच तू केलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट आणि गोड असतो. तू अशीच कायम स्वरूपी हसत आणि आनंदात राहा तुला निरोगी दीर्घ आयुष्य लाभो अशी श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो तुला पुन्हा एकदा वाढदिवसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
 

 -अर्जुन राणे