जीवन ह्याचे नाव ...-स्नेहा शिंदे.

ट्रेन मध्ये बसल्या बसल्या सहज खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. दुपारची वेळ बाहेर रखरखीत ऊन पडलं होत.गाडीने मुंब्रा स्टेशन पार केलं आणि दिवा आणि मुंब्रा च्या मध्ये असलेली खाडी आणि आजूबाजूची दाट झाडी नजरेस पडू लागली. रखरखीत उन्हात सार कस चमकून निघत होत. बाजूचे रिकामे रूळ सुन्न पडून निमूटपणे उन्हाचा मारा सहन करत होते. भर दुपारची वेळ का कोण जाणे पण मला खूप आवडते. भर दुपारी रखरखीत उन्हातून वाट दिसेल तिकडे चालत राहावं कधी ध्येयाच्या शोधात तर कधी स्वतःच्याच शोधात.
गाडीच्या गतीसरशी मनातल्या विचारांनी देखील वेग घेतला अन मन वाऱ्याच्या वेगानं एका वेगळ्याच विश्वात जाऊन पोहचल. रखरखल्या उन्हात पोरांना रस्त्यावर टाकून राब राब राबणाऱ्या मजूर बायका दिसल्या. एकीकडे काम आणि दुसरीकडे मुलाची काळजी तिच्या डोळ्यात मातृत्वाची एक वेगळीच चमक दिसली. संध्याकाळी काम झाल्यावर जेव्हा ती मुलाला छातीशी कवटाळून त्याला आपल्या पदराखाली घेत असेल त्या क्षणी सगळे श्रम कष्ट विसरून ती मातृत्वाच्या वर्षावात न्हाऊन निघत असेल. त्या एका क्षणासाठी तिची ती साऱ्या दिवसाची दगदग धडपड. तिच्या त्या घामेजल्या अंगाच्या सुगंधापुढे कस्तुरीचा सुगंध देखील फिका पडत असावा.
जरा पुढे भर उन्हात डोक्यावर ओझे घेऊन छातीशी लहान बाळ बांधलेली एक बाई अनवाणी पायांन रस्ता तुडवत चालली होती. तिच्या डोक्यावरची स्टीलची भांडी उन्हात चांदीप्रमाणे चमकत होती. तिच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब क्षभर मला दवबिंदूंची आठवण करून गेले. पोटासाठीची तिची पायपीट पाहून मन भरून आल. इतक्यात माझ्या एका मित्राचं वाक्य आठवलं तो खूपदा म्हणतो जेव्हा आपल्याला आपली दुःख असह्य होतात ना तेव्हा घराबाहेर पडून रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचं जगणं पाहायचं ते कसे जगतात हे जेव्हा कळेल ना तेव्हा तुम्हाला तुमची सारी दुःख क्षणभंगुर वाटतील. आज त्याचा शब्दन शब्द पटत होता.वाटलं आपण किती सुखी आहोत अन्न वस्त्र निवारा ह्या तिन्ही गोष्टी आहेत आपल्याकडे शिवाय आपल कुटुंब मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळं कस छान आहे. पण ह्या लोकांचं काय? कोण असेल ह्यांना आपलं म्हण्याजोगं ? कोण घेत असेल ह्यांना समजून? कोण बनत असेल ह्यांचा आधार ? मनात विचारांचं काहूर माजलं. विचारांच्या गर्दीत झपाझप पावलं पडत गेली.
पुढे रस्त्याच्या बाजूला डोंबाऱ्याचा खेळ दिसला. सहा सात वर्षांची चिमुरडी निर्भयपणे उंच टांगलेल्या दोरीवरून नाचत होती. खाली तिचे बाबा ढोलकीवर थापा मारत होते. त्या बापलेकांकडे पाहून वाटलं खरंच भूक माणसाला काय काय करायला भाग पाडते. खेळण्या बागडण्याच्या वयात पोट भरण्यासाठी करावी लागणार धडपड त्या कोवळ्या जिवाच्या चेहऱ्यावरील निर्विकार भावामध्ये स्पष्ट दिसून येत होती.
खूप जणांना दुपार फारशी आवडत नसावी कारण ती रखरखीत उन्हात न्हाऊन निघालेली असते. संध्याकाळ शांत सावली घेऊन येणारी म्हणून सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. पण काहींचं अखंड आयुष्यच रखरखीत दुपार असत. त्यांना त्या उन्हातानाशी काही एक सोयरसुतक नसत. दिवस- रात्र दुपार -तीपार कशाचीच तमा नसते त्यांना. आलेला दिवस नव्या जोमानं जगायचा वीतभर पोटासाठी मैलोनमैल पायपीट करत गावोगाव भटकायचं. ऊन वारा पाऊस थंडी सगळं अंगावर झेलत चालत राहायचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पोटाची खळगी भारण्यासाठीचा हा अविरत प्रवास म्हणजेच आयुष्य.