CRIME BORDER | 26 December | 01:29 PM
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.तसेच संसद विसर्जित करण्यात आली आहे.त्याचबरोबर विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कराने या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटले आहे. लष्कराचा राजकीय मुद्द्यांशी काहीही संबंध नसल्याचेही पाकिस्तानी लष्कराने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांनी रविवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानी संसद विसर्जित केली. त्याच्याच काही मिनिटांपूर्वी संसदेच्या उपसभापतींनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना मध्यावधी निवडणुका घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आता ९० दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत.
मंत्रिमंडळ बरखास्त : माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री फारुख हबीब यांनी सांगितले की, राष्ट्रपती अल्वी यांनी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार संसद विसर्जित केली आहे. ९० दिवसांत निवडणुका होतील, असे ते म्हणाले. माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले आहे, मात्र पंतप्रधान आपले कर्तव्य बजावत राहतील. तत्पूर्वी, 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये आपले बहुमत गमावलेल्या पंतप्रधान खान यांनी संसदेचे गोंधळी अधिवेशन तहकूब केल्यानंतर उपसभापती कासिम सूरी यांनी राष्ट्राला एक संक्षिप्त संबोधित केले.