CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कल्याणमधील ट्रान्सजेंडर समुदायाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी ‘प्रोजेक्ट समनिता’चे उद्घाटन

13 December 2025 10:24 PM

CRIME BORDER | 17 December 2025 | 12:06 PM

कल्याणमधील ट्रान्सजेंडर समुदायाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी ‘प्रोजेक्ट समनिता’चे उद्घाटन

कल्याण : येथील किरण अस्मिता परिसरात वास्तव्यास असलेल्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्यांच्या राहणीमानात तसेच स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ ठाणे रॉयल्स व रोटरी क्लब ऑफ भिवंडी बेकरी यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट समिता” या जिल्हा अनुदान प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रकल्पांतर्गत परिसरातील असुरक्षित वीज वायरिंगचे संपूर्ण नूतनीकरण, मोठ्या प्रमाणात गळती दुरुस्ती, शौचालय व बाथरूमचे अद्ययावतीकरण, सुधारित प्लंबिंग व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना तसेच सुरक्षित, स्वच्छ व सन्मानजनक राहणीमानासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा लाभ ३० हून अधिक ट्रान्सजेंडर समुदायातील सदस्यांना होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून किरण अस्मिता येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. असुरक्षित वीज व्यवस्था, अपुरी स्वच्छता व पाण्याच्या सुविधांमुळे त्यांचे दैनंदिन जीवन कठीण झाले होते. रोटरी क्लबच्या सदस्यांनी परिसराला भेट देऊन परिस्थितीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले असता, या सामाजिक परिवर्तनकारी उपक्रमाची संकल्पना आकारास आली.

या उपक्रमासाठी उदार देणगीदार तसेच ठाणे नॉर्थ स्टार ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले. प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा गव्हर्नर (रोटरी वर्ष २०२४–२५) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर पाहुणे तसेच ट्रान्सजेंडर समुदायातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी बोलताना सांगितले की, “समाजातील वंचित घटकांसाठी समावेशक व सेवाभावी कार्य करणे हे रोटरीचे मुख्य ध्येय आहे. ट्रान्सजेंडर समुदायाला सन्मानाने व सुरक्षित वातावरणात जगता यावे, यासाठी रोटरी क्लब कटिबद्ध आहे.”

या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ट्रान्सजेंडर समुदायासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले तसेच किरण अस्मिता येथील रहिवाशांना दैनंदिन वापरासाठी उपयुक्त किट्स देण्यात आल्या. रहिवाशांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा प्रकल्प त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रकल्पाबाबत :
रोटरी वर्ष २०२४–२५ दरम्यान संकल्पित करण्यात आलेला “प्रोजेक्ट समिता” हा रोटरीच्या विविधता, समानता व समावेशन (DEI) या मूल्यांना बळकटी देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, ट्रान्सजेंडर समुदायाच्या सामाजिक सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल ठरत आहे.