CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली ( क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क ) : डोंबिवली शहरात सर्वत्रच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी अवस्था सध्या डोंबिवली शहरात सर्वत्र बघायला मिळत आहे. तसेच येथील रस्ता खचून गेल्याने खड्याचे साम्राज्य सुरू झाले आहे डोंबिवली कोपर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने डोंबिवली शहरतील पूर्व पश्चिम येथील संपूर्ण वाहतुक ही ठाकुर्ली जोशी हायस्कूल येथील नव्याने सुरु केलेल्या उड्डाण पुलावरून सुरू करण्यात आली.
वाहतुक कोंडी आणि येथील खड्यांमुळे पूर्व पश्चिम असा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागते, त्यामुळे येथील वाहन चालकांना कधी पर्यंत याच त्रासातून जावे लागेल असा प्रश उपस्थित झाला आहे. या पुलावर गर्दी झाली की वाहतूक पोलीस रस्ता सुरळीत करण्याचे काम करतात पण नंतर पुन्हा या पुलावर वाहनाची गर्दी होते व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, या पुलाची इतक्या लवकर अशी दुरवस्था होईल असे नागरिकांना वाटलेही नव्हते.
येथील खड्यांमुळे होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता चक्क आता डोंबिवली वाहतुक पोलीस कर्मचारी व ट्राफिक वार्डन यांनीच पुढाकार घेवून या रस्त्यावरील खड्डे बुजविले व नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला.हे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका व येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेवून करण्याचे आवश्यक असताना आता तेच काम डोंबिवली वाहतुक पोलीसांनाच करावे लागत असल्याचे दिसून येत आहे .
नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास काम करणाऱ्या पोलीसांना आता रस्त्यांवरील खड्डेही बुजवावे लागत असल्याचे दिसुन येत आहे पण या सर्व गोष्टींकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी,अधिकारी, लोकप्रतिनिधी,तसेच येथील स्थानिक लोकनेते यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
डोंबिवलीकारांना असा हा त्रास अजून किती दिवस सहन करावा लागेल असा प्रश्न निर्माण होत आहे.या सर्व गोष्टींचा आढावा क्राईम बॉर्डरचे पत्रकार अविनाश वाकचौरे यांनी घेतला.