CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ग्रामीण भागातील गरजू महिलांपर्यंत-विविध योजना पोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत-जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील
ठाणे, दि. १ (जिमाका) : ग्रामीण भागातील गरजू महिलांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. या योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने आयोजित ‘पोषण माह सप्टेंबर २०२१’ अभियानाचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.
कुपोषण छोड पोषण की ओर, थामे क्षेत्रिय भोजन की डोर या संकल्पनेवर आधारित पोषण माह हा उपक्रम राबविण्यात येत आहे. श्रीमती पाटील म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित असते. मात्र ग्रामीण भागातील महिलांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणी येतात. आधार कार्ड नसणे, बँक खाती नसणे, बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले नसणे अशा अडचणींमुळे या महिलांना योजनांचा लाभ घेता येत नाही. या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी पोषण माह उपक्रम महत्त्वाचा आहे.
जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद करून सांगितले की, कुपोषण मुक्तीसाठी पोषण माह उपक्रमातून जिल्ह्यातील महिला, युवतींबरोबरच त्यांच्या कुटुंबियांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करण्यात यावी. ठाणे जिल्ह्याने पुढाकार घेऊन झोळीमुक्ती व हिमग्लोबिन चाचणी, उपचार व संवाद हे दोन उपक्रम सुरू केले आहेत. हे दोन्ही उपक्रम महत्त्वाचे आहेत. पोषण आहाराचे महत्त्व वाढवित असताना स्थानिक पदार्थांच्या पाककलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तरुणांना स्वयंरोजगाराच्या योजना सुरु करण्यासाठीही प्रयत्न करावेत.
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. दांडगे यांनी येत्या महिनाभर पोषण माहचे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांचा सहभाग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष रेंघे,जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंदारे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी आदी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आदीही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
काय होणार पोषण माह उपक्रमात
• कुपोषण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महिनाभर विविध उपक्रम
• जिल्हा तसेच तालुकास्तरावर उपक्रमाचा शुभारंभ
• स्थलांतरीत लाभार्थ्यांसाठी पोषण कार्ड वाटप; गृह भेटींचे आयोजन
• पोषण वाटिका नावाने वृक्षारोपण उपक्रम
• गरोदर महिला व किशोरींसाठी हिमग्लोबिन चाचणी, उपचार व संवाद उपक्रम
• पौष्टिकतेसाठी योग सत्र, पाककला स्पर्धेचे आयोजन
• पोषण किट/पोषण समृद्धिकरण उपक्रम
• सॅम मुलांची निश्चिती करून पौष्टिक अन्नांचे वितरण