CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
लोणावळा (क्राईम बॉर्डर रिपोर्टर ) : लोणावळ्या जवळील राजमाची किल्ला परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या ठाकुर्लीतील तरुणाचा येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी सहा ,साडेसहाच्या सुमारास घडली आहे. कौशिक अय्यर (वय- २१, राहणार. ठाकुर्ली जि.ठाणे असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कामशेत पोलीस सूत्रानुसार ठाकुर्ली- डोंबिवली येथील शिव सह्याद्री ट्रेकर्सच्या वतीने राजमाची येथे ट्रेकिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंग करिता १०० ते १५० ट्रेकर्स सहभागी झालेले होते असे समजते.
हे सर्व ट्रेकर्स राजमाची येथे सायंकाळी ५ साडेपाच वाजता पोहोचल्यानंतर त्यातील काहीजण राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तळ्याजवळ गेले त्या ठिकाणी कौशिकने पोहण्या करिता कपड्यासह तळ्यात उडी मारली. मात्र कौशिक बराच वेळ होऊनही तलावाच्या बाहेर न आल्याने तेथे जमलेल्यांनी आरडाओरडा करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना यश आले नाही .रात्र झाल्यामुळे त्यांनी शोध घेणे थांबविले.
सदर घटनेची माहिती कामशेत पोलीस स्टेशनचे एपीआय प्रफुल कदम यांना समजताच ते आपल्या पोलिस पथकातील महेश दौंडकर, महेंद्र वाळुंजकर, मिथुन झेंडे यांच्यासह शनिवारी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने कौशिकचा शोध घेण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेनऊ वाजता कौशिकचा मृतदेह सापडला तो मृतदेस बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहे.