CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (बापू वैद्य):-दुसऱ्याला सल्ले देणाऱ्या सुसंस्कृत डोंबिवलीतील नागरिकांना करोनाचे भय राहिले नाही.अनेक नागरिक उजाडताच किरकोळ कामासाठी रस्त्यावर येत आहेत.यात विशेषतः जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे.पोलीसांनी या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.मात्र हे जेष्ठ नागरिक पोलीसांच्या आवाहनाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.कल्याण डोंबिवलीतील करोनाची रुग्ण संख्या अटोक्यात येण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आणि डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्याच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत.त्यातील समाजिक वावराचे कडक निर्बंध पाळणे अंत्यत गरजेचे असताना डोंबिवलीतील जेष्ठ नागरिक मात्र खुलेआम किरकोळ कामासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहेत.
वीज बील भरणा केंद्रात जाणे,बँकेचे पासबुक प्रिंट करणे,पोस्ट कार्यालयात जाणे,भाजी खरेदीसाठी भटकणे,इत्यादी किरकोळ कामे करण्यासाठी फिरत असल्याचे दिसून येत आहे.फडके रस्त्यावर भाजी खरेदी करणे,बाजी प्रभू चौकात वीज भरणा केंद्र,केळकर रस्त्यावरील बँकेत आणि द्वारका हाँटेल चौकातील वीज कार्यालय,बँका येथे सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडून रांगेत उभी असलेली दिसतात.पास बुक प्रिंट न करण्याच्या बँकानी बाहेर सूचना देउन सुध्दा जेष्ठ नागरिक रांग लावून उभे असतात.पोस्टाच्या कार्यालयाखाली जेष्ठ नागरिक उभे असतात.
५० ते ६०वयातील व्यक्तींंना करोनाची लागण लागण्याची आकडेवारी पुढे येत आहे.या वयातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी तज्ञांनी आरोग्याच्या काळजीबाबत अनेक वेळा सूचना केल्या आहेत.पालिकेच्या आणि पोलिसांच्या वतीने सातत्याने उदघोषणा आदी माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे मात्र या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देता हे जेष्ठ नागरिक खुशाल फिरत असतात.या नागरिकांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींंना करोनाची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
डोंबिवलीतील एका आजींना करोनाची लागण झाली.त्या आजींच्या उपचारासाठी तीन लाख खर्च करण्यात आला.रुग्णालयातून घरी येताच त्यांचे निधन झाले.हतबल अर्धांगवायू पिडीत आजोबा आता एकटेच घरात आहेत.या दुर्दैवी आजी आजोबांची कहाणी अनेकांकडून ऐकायला मिळते.तसेच हि जेष्ठ म़ंडळी घरातील तरुणांचे ऐकत नसल्याचे सांगण्यात येते.तर एकाच ठिकाणी बसण्याची त्यांना सवय नसल्याचा परिणाम असल्याचे म्हटले जाते.
करोनच्या कठीण काळात सामाजिक वावराचे निर्बंध न पाळणाऱ्या जेष्ठ नागरिकांबद्दल अनेक जण संताप व्यक्त करीत आहेत.बाहेर फिरण्यामुळे करोनाची लागण झाल्यास त्याचा त्रास आपल्याच कुटुंबातील व्यक्तींंनाहोऊ शकतो.यासाठी जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन रामनगर पोलीस ठाण्याचे व.पो.नि.सुरेश अहिर यांनी केले आहे.