CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
Mob Lynching सच्चाई (मॉब लिंचिंग ) झुंडबळी भय इथले संपत नाही : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला देशातील विविध भागात जमावाकडून होणारे हल्ले(मॉब लिंचिंग),त्यातून होणाऱ्या हत्या आणि त्या नंतर त्या घटनांवर होणारं राजकारण ह्याबाबत आपण नेहमीच ऐकत आलोय,वाचत आलोय पण गेल्या काही काळात वेगवेगळ्या कारणांमुळे म्हणा किंवा अफवांमुळे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना पाहायला मिळतेय.एक समुदाय दुसऱ्या समुदायाशी भिडला, एका समुदायातील व्यक्तीला दुसऱ्या समुदायातील जमावाने धरून ठार केले किंवा हल्ला केला ह्या घटना अत्यंत निंदनीय आहेतच पण एखादा समूह किंवा समुदाय एवढं टोकाचं पाऊल उचलण्यासाठी का प्रवृत्त होतात? माणसांमधली संवेदना खरंच संपत चाललीय की काय ? असा विचार करायला भाग पाडणाऱ्या ह्या घटना आहेत. अलीकडच्या काळातील हिंसाचार हा धार्मिक -सामाजिक वैचारिकतेमुळे डोकं वर काढत आहे आणि ह्याही पेक्षा वाईट म्हणजे ह्या गोष्टींबद्दल राजकीय अनास्थाही वेळोवेळी दिसून आलेली आहे.झुंडबळीच्या ह्या अमानुष आणि क्रूर अश्या घटनांचा केवळ तीव्र निषेधच नाही तर अश्या घटना घडू नयेत म्हणून त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला कठोरातील कठोर शासन होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे ती कठोर कायद्यांची आणि त्या कायद्यांच्या निःपक्ष अंमलबजावणीची आणि त्याही पुढे जाऊन ह्या घटना का घडतात? अश्या घटनांमध्ये एखाद्या समुदायाची, समूहाची नेमकी मानसिकता काय असते? ह्यावर समाजातील विविध घटकांच्या माध्यमातून चिंतन होणं गरजेचे आहे.
भारतासारख्या देशात जिथे न्यायव्यवस्था ही सर्वोच्च मानली जाते अश्या ठिकाणी लोकांना कायद्याची जराही भीती राहिलेली दिसत नाही,झुंडबळी च्या घटना ह्या कोणत्याही देशात घडो त्या घटना त्या देशासाठी लांछनास्पद असतात. फार पूर्वी पासूनच ह्या घटना होताना आपण पहात आलो आहोत पण गेल्या काही वर्ष्यांमधे ह्या घटना सातत्याने वाढतांना दिसतायत.खरंतर अश्या पद्धतीने घडणाऱ्या गोष्टींकडे केवळ जात, धर्म, वर्ग, वर्ण आणि कोणता विशिष्ट प्रदेश म्हणून म्हणून पहिले जाऊ नये,कारण म्हणतात ना 'ते जात्यात असले तर तुम्ही सूपात आहात,आणि आज तुम्ही सुपात आहात तर उद्या जात्यात येऊन तुम्ही भरडले जाऊ शकता.तेव्हा आपल्याच धुंदीत न राहता आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये बघ्याची भूमिका घेत असंवेदनशील राहू नका, उद्या तुम्हीही अश्या घटनांचे बळी ठरू शकता.मॉब लिंचिंग सारख्या घटना ह्या एका विशिष्ट मानसिकतेतून घडतांना आपल्याला दिसतील, देशातील इतर अनेक उदाहरणांसोबत गेल्या वर्षी धुळे येथील घडलेलं अमानुष हत्याकांड असो किंवा काल परवा घडलेले पालघर मधील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या गडचिंचले गावातील उदाहरण असो, ह्या सर्व घटनांमधून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येते की व्यक्तिगत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसतात.हेच ह्या उदाहरणांवरून स्पष्ट होत.
दि. १६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील गडचिंचले ह्या गावात रात्रीच्या साडेअकराच्या दरम्यान शंभर सव्वाशेच्या जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या ड्राइवरला लाठया काठ्यानी अमानुषपणे ठार मारण्यात आल्यानंतर ही बातमी राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचली, आणि लगेचच समाजातून वेगवेगळ्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. आणि त्यावर राजकीय चिखलफेक सुरु झाली.अनेक दिवसांपासून त्या परिसरात पसरवल्या गेलेल्या अफवांमुळे ही घटना घडली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असतांनाच एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी सदर घटनेचा निषेध करत हे स्पष्ट केले की ,सदर घटनेतील सुमारे ११० संशयीत आरोपींना पकडण्यात आले असून चौकशी सुरु आहे.सोबतच ह्या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल हे सांगतांनाच त्यांनी पुढे हेही स्पष्ट केले की, ह्या प्रकरणात कुणीही धार्मिक आणि राजकीय रंग देण्याचं काम करू नये.तर दुसरीकडे आखाडा परिषदेच्या पूर्व महामंत्री परमहंस डॉ अवधेशपुरी महाराज यांनी ही ह्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे नेणार असल्याचे सांगितले त्याप्रमाणे मानवाधिकार आयोगाने ह्या प्रकरणाची दाखल घेत घडलेल्या घटनेबाबत संबंधितांकडून अहवाल मागविला आहे.ह्या घटनेच्या वेळेस तेथे उपस्थित पोलीस अधिकारी ह्यांच्या निष्काळजीपणा मुळे संबंधित पोलिसांना बडतर्फ करण्यात आले असले तरी समाजातील सर्वच थरातून पोलिसांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेबद्द्ल नाराजी व्यक्त केली जात आहे.घटना घडली त्या परिसरात ह्यापूर्वीही अश्या समूहाकडून मारहाणीचे आणि हल्ल्यांचे प्रकार पूर्वी घडलेले असतानाही अश्या संवेदनशील भागात अश्या घटनांना रोखण्यासाठी प्रशासनाने काहीच उपाययोजना का केल्या नाहीत? असाही प्रश्न उपस्थित होतोय.तर दुसरीकडे ह्या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून होताना दिसतोय.सोबतच संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अशी गोष्ट घडणं ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी वारसा असलेल्या राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे असे मत विविध स्तरातून उपस्थित होताना दिसत आहे.
खरं पाहता गडचिंचले मधील जमावाकडून केल गेलेलं कृत्य हे पाशवी मानसिकतेतून झालेलं आहे ह्यात शंकाच नाही,पण संपूर्ण जग हे कोरोना ह्या महासंकटाचा सामना करीत असतांना , संपूर्ण देशात जमावबंदी लागू असतांना एवढा मोठा मॉब एकत्र आलाच कसा? नेमकी ही कोणत्या प्रकारची मानसिकता म्हणायची?अश्या प्रकारच्या बहुतांश घटना ह्या अफवांच्या माध्यमातून घडलेल्या दिसत आहेत. समाजमाध्यमांमध्ये एखादा मेसेज हा शहानिशा न करता पुढे पाठविला जातो ह्यातून लोकांमध्ये संभ्रम, अस्वस्थता, भीती आणि राग पसरतांना दिसतो एकीकडे प्रसारमाध्यमांवर कुणाचं तरी नियंत्रण असतं पण समाजमाध्यमांवर कुणाचंच नियंत्रण नसतं त्यामुळे अश्या अफवा वेगाने पसरतात, जे लोक अस्वस्थ, असुरक्षित,आणि अशिक्षित असतात त्यांच्याकडून असे मेसेज विचार न करता पुढे जाऊन अश्या पद्धतीच्या पाशवी आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडत असतात.आता पुढे राज्य सरकार मार्फत नेमलेल्या उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून काही दिवसात अहवाल सादर केला जाईल. जे जे दोषी असतील त्यांना कठोर शासन होईल,पण त्यानंतरही काही प्रश्न हे अनुत्तरीतच राहतील.राज्यघटनेच्या एकविसाव्या कलमानुसार आपल्या देशातील कोणताही नागरिक इतर दुसऱ्या व्यक्तीचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. घटनेने प्रत्येकाला सन्मानाने आणि आदराने जगण्याचा हक्क दिलेला असतांना कुणालाही कायदा हातात घेऊन, गर्दी करून मारण्याचा अधिकार नाही. पण तरीही जर ह्या घटना मग त्या कोणत्याही समाजाशी संबंधित असो, त्या थांबणार नसतील तर मग सरकारने ह्याबाबतीत कायद्यामध्ये कठोरता आणून सदर खटल्यांत फास्टट्रॅक पद्धतीने निकाल कसा लागला जाईल हे पाहणं गरजेचे आहे. सोबतच सतर्क समाज घडण्याच्या बाबतीत चिंतन होणं गरजेचं आहे.एखादी घटना, एखादा प्रसंग माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, काही करणार नाही, हा दृष्टीकोन बदलणं गरजेचा आहे.नाहीतर अश्या घटनांमध्ये बघ्यांच्या भूमिकेत राहून आपला समाज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्या विकृतांच्या समूहाचाच एक भाग होऊन जाईल.घटना घडून गेल्यानंतर मोर्चे आणि निषेध म्हणून मेणबत्त्या लावणं ह्याने काहीच हाती लागणार नाही.व्यक्तिगत स्वातंत्र्याची जपणूक आणि सर्व व्यक्ती समान आहेत यावरील विश्वास हा जर समाजाच्या नीतिमत्तेचा पाया असेल तरच समान हक्कांचे उद्दिष्ट साध्य होईल आणि हे नीतिमत्तेच बीज रुजलं तरच समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा बसेल.
संतोष राणे , (क्राईम बॉर्डर ) , रायगड जिल्हा प्रतिनिधी