CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
कर्जत जि.रायगड ( क्राईम बॉर्डर : गुरुनाथ नेमाणे ) :- कोरोना विषाणूरूपी महामारी दारात येऊन उभी असतांना आलेल्या संकटाच्या काळात घरातच राहून लढा देऊन सुरक्षित रहाण्याचे आवाहन शासन - प्रशासन करत असतांना सकाळच्या प्रहरी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या कर्जतकरांची कर्जत पोलीस ठाण्याकडून धरपकड करण्यात आली.या धरपकडीत ४५ जण असून त्यांना कर्जत पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला व ताकीद देऊन सोडण्यात आले.
कर्जत नगर परीषदेने केलेल्या आवाहनानुसार कर्जतमध्ये चार दिवस सर्वत्र कडक बंद पाळला जात असतांनाही मॉर्निंग वॉकला कर्जत टेकडीवर व हायवेवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या आज ४५ होती.अत्यावश्यक सेवेखेरीज बाहेर पडायचे नाही व संचारबंदी असतांनाही बाहेर पडू नका, घरीच राहून सुरक्षित रहा,असे वारंवार आवाहन करूनही नागरिक सवयीनुसार पहाटेची गार हवा खाण्यास बाहेर पडतात.त्यात अनेकांना आजार हि असल्याने फिरल्याने त्यांना बरे वाटते,मात्र कायदा हा कायदा आहे,त्यातच कोरोना विषाणू कधीही तुमच्यावर झडप टाकू शकतो हि काळजी म्हणूनच आपली सुरक्षितता अबाधित रहावी म्हणून शासन-प्रशासन खबरदारी घेत आहेत.