CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
अहमदाबाद (क्राईम बॉर्डर विशेष प्रतिनिधी) : खान्देशातील बोदवड येथील रहिवाशी व हल्ली गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील मॉडेल स्कूल शारद-शिष उच्चतर माध्यमिक ज्युनियर कॉलेज साबरती या ठिकाणी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.अजय पाटील (सर), यांचे वडील पुंडलिक भगवान पाटील (सर) यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने अहमदाबाद येथे प्रा. अजय पाटील यांच्या निवासस्थानी आज निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना,जावाई, नातवंडे असा भलामोठा परिवार आहे.
माजी मुख्याध्यापक पुंडलिक भगवान पाटील हे मुक्तळ येथे १२ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वाकी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी ३३ वर्ष सेवा केली.त्यांच्या या शैक्षणिक कार्याची विशेष दखल घेऊन त्याकाळी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार हरिभाऊ जवळे यांच्या हस्ते देण्यात आला होता.त्यांचा मनमिळावू व जातिभेद न मानणारा स्वभाव असल्याने ते परिसरात परिचित होते. मानवता हाच धर्म मानावा व आपले कार्य करीत राहावे अशी त्यांची शिकवण होती.
प्रा. अजय पाटील यांचे वडील मुख्याध्यापक तर आई अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. मुख्याध्यापक पुंडलिक पाटील हे नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असत की स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा तुम्हाला यश हमखास मिळेल.त्यांच्या या शिकवणीनुसार प्रा. अजय पाटील हे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच साबरमती गांधी ट्रस्ट संचलित साधना ट्रस्ट द्वारा साबरमती येथे अनाथ, निराधार मुलां, मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करीत आहेत.त्यांच्या दुःखात क्राईम बॉर्डर परिवार सहभागी आहे.