CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
इचलकरंजी
कोरोनाच्या महामारी संकटामुळे सगळा समाज समस्येने ग्रासला आहे... या संकटाला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्नांची मोठी पराकाष्ठा करीत आहे...विशेषतः आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनामुक्त समाज व्हावा ,यासाठी झटत आहेत...तर टाळेबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी ,यासाठी पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी देखील रात्रंदिवस आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत..मुळात कोरोनारुपी हे संकट भिषण आणि वेगाने वाढणारे असल्याने यापासून जनतेच्या आरोग्याला धोका पोहचू नये,यासाठी प्रशासनाला संचारबंदी,टाळेबंदी यासारखे कठोर निर्णय घ्यावे लागेल...त्यामुळे साहजिकच उद्योग - व्यवसाय बंद ठेवावे लागेल आणि यातून दररोजची होणारी मोठी आर्थिक उलाढाल थंड होवून पूर्णतः बंद पडली...अनेकांना तर रोजगार नसल्याने स्वतःसह कुटूंबाचे पोट कसे भरायचे ,याचीच चिंता सतावू लागली...
टाळेबंदीमुळ जनतेनेे घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले ,त्यामुळे इचलकरंजीशहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ली - बोळातील रस्तेही सामसूम होवून भयाण शांततेचे वातावरण चहूकडे दिसू लागले... पण ,याच काळात शहर परिसरातील बेघर ,निराधार लोकांना निवारा म्हणून प्रशासनाने बेघर निवारा केंद्र व अन्य ठिकाणी त्यांच्या निवा-याची सोय केली...यानंतर खरा प्रश्न होता तो म्हणजे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करायची ? याचवेळी माणुसकी फौंडेशनने ही जबाबदारी स्विकारुन ती अत्यंत जबाबदारीने गेली दीड महिने कोणताही खंड न पडता पार पाडली आहे...तत्पूर्वी ,फौंडेशनने रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर ,निराधारांना मोफत दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचे कार्य सुरुच ठेवले होते...यासाठी त्यांना सामाजिक संघटना, संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून अन्न -धान्य व गरजोपयोगी साहित्याची चांगल्या पध्दतीने मदत झाली आणि आजदेखील होत आहे...विशेष म्हणजे हे कार्य केवळ बेघर निराधार लोकांपुरतेच न राहता समाजातील गरीब ,गरजू लोकांसाठी देखील अगदी निरपेक्ष भावनेने सुरु ठेवून माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवी जावळे आणि त्यांच्या सर्वच सहका-यांनी ख-या अर्थाने माणुसकीचा धर्म जोपासला आहे...रिक्रेशन हाँल येथून शहर परिसरातील विविध ठिकाणी वेळेत जेवण पोहच करण्यासाठी फौंडेशनचे सर्व कार्यकर्ते अगदी तत्पर भूमिका बजावत आहेत...सुरुवातीपासून ते साधारण सव्वा महिने दररोज सकाळ आणि संध्याकाळी मिळून सुमारे तीन हजार लोकांना जेवण पुरवण्यात आले...यासाठी अनेक संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तींनी विविध स्वरुपात मदत देवून या सत्कार्यात आपलाही खारीचा वाटा उचलला आहे...
आता टाळेबंदीचे नियम शिथील झाल्याने काही प्रमाणात यंत्रमाग उद्योगासह अन्य उद्योग सुरु झाले आहेत... त्यामुळे आता ही संख्या कमी होतानाच दररोज सुमारे साडे सातशे ते आठशे लोकांना जेवण पुरवण्यात येत आहे...समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून समाजाच्या हितासाठी सदैव तत्पर हे आपले घोषवाक्य माणुसकी फौंडेशनने टाळेबंदीच्या काळात गरीब ,गरजूंच्या पोटासाठी जेवणाची चांगली व्यवस्था करुन प्रत्यक्षात साकारले आहे...याशिवाय रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांबरोबरच अन्य रुग्णांसाठी रक्त व अन्य तपासणीसाठी अत्यंत माफक दरामध्ये सोय उपलब्ध करुन दिली आहे...प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत अविरतपणे कार्य सुरु असलेल्या त्यांच्या या कार्याची दखल प्रांताधिकारी डॉ. विकास खरात , पोलिस उपाधिक्षक श्रीनिवास घाटगे ,डीवायएसपी गणेश बिरादार ,गावभाग पोलिस ठाण्याचे पो.नि.गजेंद्र लोहार यांनी घेत कौतुकही केले आहे...संकटकाळात सर्वांच्या मदतीला धावून येत माणुसकी फौंडेशनने जोपासलेला हा माणुसकीचा खरा धर्म सर्वांसाठी निश्चितच आदर्शवत आणि अनुकरणीय असाच आहे...हे कार्य असेच जोमाने पुढे सुरु राहण्यासाठी या कार्याला आपलाही मदतीचा हात लागला तर काहीअंशी समाज ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न नक्कीच मनाला खूप मोठे समाधान देणारा असेल ,यात काहीच शंका नसावी...
समाजातील युवकांना संघटीत करत या संघटीत ताकदीचा वापर केवळ विधायक कार्यासाठी करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या माणुसकी फौंडेशनने आजतागायत आयजीएम रुग्णालयात सर्व अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात,यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करणे , अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे ,त्यांचे प्राण वाचवणे ,रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर ,निराधारांना पोटभर जेवण देवून त्यांना बेघर निवारा केंद्रात दाखल करणे , रस्त्यावर बडबड करत एकटे फिरणाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुखरुप पोहच करणे ,पूरग्रस्त व आपदग्रस्तांना गरजोपयोगी साहित्याचे वाटप आणि बेवारस मयतांवर अंत्यसंस्कार करुन जनसेवा हीच ईश्वरसेवा ,याची देखील प्रचिती आणून दिली आहे...उधळू फुले प्रकाशाची ,अंधाराच्या वाटेवरी या ध्येयाशी एकनिष्ठ राहून समाजाच्या मदतीसाठी सदैव तत्पर भूमिका घेवून ती जबाबदारीने पार पाडणा-या माणुसकी फौंडेशनला माझा मनापासून सलाम आणि पुढील कार्यास उदंड शुभेच्छा...
- सागर बाणदार, इचलकरंजी