CRIME BORDER | 26 December | 11:43 AM
नांदेड - भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे आईने दोन चिमुकल्यांचा खून करून, भाऊ व आईयांच्या मदतीने पुरावा नष्ट केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुरपताबाई गणपत निमलवाड वय ३० रा.पांडूरणा असे आईचे नाव आहे. सदर महिला पांडुरणा येथे शेतात पती आणि दोन वर्षीय मुलगा आणि अवघ्या ४ महिन्याच्या मुलीसह रहात होती. तर सासु - सासरे दोघे अन्य दुसऱ्या शेतात राहायला होते. धुरपताबाई निमलवाड हिने मुलगा दत्ता गणपत निमलवाड (वय. २ वर्षे) व मुलगी अनुसया गणपत निमलवाड वय ४ महिने या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली. त्यानंतर तिने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड दोघे रा. ब्राम्हणवाडा ता.मुदखेड यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला.
धुरपताबाईने असे कृत्य का केले हे मात्र समजु शकले नाही, याबाबत गावातील गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून धुरपताबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासफौजदार दिगंबर पाटील करीत आहेत.