CRIME BORDER | 27 December 2025 | 07:17 PM
कवी मन.....
खूपदा आपलं भावनावश होणं इतरांच्या त्रासाला कारणीभूत ठरत अश्यावेळी वाटत नकोच आपल्यात इतकी माया नको एखाद्यावर जीव लावण नको इतकं भावनावश होणं. कृत्रिम जगात एक कृत्रीम माणूस म्हणून जगणंच हल्ली जो तो सोयीचं समजतो. भावनाच नसतील तर एखाद्यामध्ये मन गुंतणारच नाही. त्याच्या असण्या नसण्याचा त्याच्या वागण्या बोलण्याचा काही फरकच पडणार नाही. पण पुन्हा मनात विचार आला असं भावनाशून्य जगणं खरच जमेल का तुला ?
तस पाहिलं तर कवी लेखक हे जरा जास्तच भावनिक असतात. कदाचित म्हणूनच त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भावनिक असतो. त्यातून ते एक नवी गोष्ट नवी कथा शोधत असतात म्हणजेच काय तर भावनांचा शोध घेत असतात. जेव्हा समोरच्याच्या मनातील भावना प्रेम दुःख व्यथा समजून घ्यायची असते ना तेव्हा इतरांपेक्षा थोडी जास्तीची भावनिकता तुमच्यात असावीच लागते. समोरच्याच दुःख जेव्हा तुम्ही तुमचं समजून विचार करता ना तेव्हाच तुम्ही कवितेला जन्म देऊ शकता. प्रत्येक कवितेगणिक तुम्ही घडत जाता . तुमच्यातल्या भावनेमुळेच तुम्ही कवी बनता. खूपदा लोक म्हणतात आम्हाला सुद्धा लिहावंसं वाटत पण नेमकं कोणत्या शब्दात मांडावं हे कळत नाही. कविता हे सुद्धा एक गणितच आहे ते सोडवायला शब्द आणि भावना यांचा समतोल साधता यायला हवा इतकंच. ते कवीला साधत आणि म्हणूनच तो इतरांपेक्षा थोडासा वेगळा असतो.
जग किती यांत्रिक झालं ना तरी कवी कधीच त्या यांत्रिक जगात रमत नाही. त्याची ओढ निसर्ग माणस आपलेपणा प्रेम याच गोष्टीत असते. सतत भावनेत अडकून राहणे हाच तर त्याचा छंद असतो. त्या छंदापायी तो अनेकदा दुखावला जातो कधी नकळत आपल्याच जवळच्या माणसांना दुखावतो पण त्यातही त्याची आपुलकी प्रेम माया दडलेली असते. ती ज्याला समजते तो कायम सोबत राहतो पण त्याच प्रेमाचा ज्याला उबग येतो तो मात्र निघून जातो. भावनिक असण हाच जर जीवनाचा श्वास असेल तर माणूस श्वासाविना कसा बर जिवंत राहू शकतो ?
तरीही आपल्याच माणसांना जेव्हा आपल्या प्रेमाचा आपुलकीचा कंटाळा वाटतो तेव्हा नात्याला थोडं अंतर देणंच योग्य ठरत. ओढ हि एकाच बाजूने असेल तर तिला भेटीचा आनंद कधीच लुटता येत नाही. नदीला सागराची ओढ असते पण सागराने तिला आपल्यात सामावून घ्यायलाच नकार दिला तर मात्र तिची ती ओढ काय कामाची ? भावनाशून्य तर नाही पण भावनांवर नियंत्रण ठेवणं मात्र जमावावं लागेल अन्यथा कवितेशिवाय जगात कोणीच सोबतीला नसेल.
- स्नेहा शिंदे.