CRIME BORDER | 27 December 2025 | 07:17 PM
मानवाला मिळालेल्या सुंदर जीवनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अन्न , वस्त्र , निवारा , हवा , पाणी , सूर्यप्रकाश इ. अनेक गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे . आणि ह्या सर्व गोष्टी सहजपणे मिळविण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राहणे आवश्यक आहे . आणि ह्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे . नुसते वृक्षारोपण करुन चालणार नाही , तर वृक्षसंवर्धन व त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.
गेल्या काही दशकांपासून लोकसंख्यावाढीचा आलेख वरचेवर चढताना दिसून येत आहे . शासनाने कुटुंब नियोजनाची अनेक साधने , सोयी उपलब्ध करुन दिल्या तरीही वाढत्या लोकसंखेचा भस्मासूर आ-वासून उभा आहे . प्रथमतः लोकसंख्या नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे . वाढत्या लोकसंखेला मूलभूत व अत्यावश्यक गरजा पुरविण्यासाठी विज्ञानाने खूप खूप प्रगती केली आहे . यामध्ये रोबोट , संगणक , शेतीची अवजारे , कारखाने , रेल्वे , विमाने इ. निर्माण केले . यांत्रिक युगामध्ये दुचाकी , चारचाकी वाहनेही भरपूर प्रमाणात वाढली आहेत . लोकसंख्यावाढीबरोबरच कारखानेही वाढू लागले आहेत . नवनवीन वाहने दररोज मोठ्या संखेने तयार होऊ लागले आहेत . त्यामुळे वाहने वापरणारेही वाढले . मग काही लोक वाहनांमध्ये इंधन म्हणून रॉकेल वापरु लागले आहेत . त्यामुळे ध्वनीप्रदूषणाबरोबरच वायूप्रदूषणही खूप खूप वाढत आहे . तसेच वाढत्या औद्योगिकरणामुळे कारखान्यातून निघणारा धूर , मैला व उष्णता ह्यामुळे ध्वनीप्रदूषण , वायूप्रदूषण व जलप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येत आहे . ह्याला आळा घालण्यासाठी व प्रदूषण थांबविण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे . त्यामध्ये ' वृक्षारोपण ' हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सर्वांनीच हाती घेतले पाहिजे . तसेच वाढत्या लोकसंखेमुळे व विभक्त कुटुंब पध्दतीमुळे लग्नानंतर लगेच वेगळी चूल मांडणारे भरपूर आहेत . त्यामुळे सर्वसाधारण गरीब , शेतकरी , मजूरदार ह्यांच्या चूलीला सरपणासाठी जंगलतोड चालूच राहणार आहे . तसेच घरे , इमारती बांधताना लागणारी सेंट्रींग , दारे , चौकटी , खिडक्या इ.साठी जंगलतोड चालू आहे व चालूच राहणार आहे . त्याचबरोबर वीटभट्टी , बेकरी , हॉटेल , लग्नसमारंभ इ. ठिकाणी जळतणासाठी सर्रास लाकडांचाच मुक्तहस्ते वापर केला जातो आहे . तसेच कागद , पेन्सिल , लाकडी कपाट , टेबल , खुर्च्या , प्लायवूड , सन्माईक बनविणारे कारखाने व पलंग , दिवाण , वाहनांची बॉडी इ. अनेक कामांसाठी लाकूड वापरले जाते. ह्या सर्व गरजा भागविण्यासाठी अमाप जंगलतोड चालू आहे . परंतु त्याप्रमाणात झाडे लावणे , वाढविणे , जगवणे ही कामे थांबलेली दिसून येत आहेत . आणि पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे ! नव्हे ती काळाचीच गरज आहे . कारण झाडे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत , असे म्हटले तर वावगे ठरणार नाही !
झाडांपासून मानवाला मिळणारे फायदे :- 1) लाकडी टेबल , खुर्च्या , चौकटी , दारे , खिडक्या इ. लाकडी वस्तू झाडांपासूनच मिळतात .,2) डिंक , फुले ,फळे , महत्त्वाची औषधी झाडांपासूनच मिळतात . ,3) जुनाट आजारांवर आयुर्वेदिक औषधी वनस्पतीच आवश्यक असते .,4) झाडांमुळेच हवेमध्ये गारवा , थंडावा राहतो .,5) उन्हाळ्यात माणसांना , जनावरांना थंडगार सावली मिळते .,6) झाडांच्या मुळांमुळे मातीची झीज होत नाही .,7) उन्हामुळे होणारी जमीनीची धूप थांबते.,8) औषधी व बलयुक्त मध झाडांपासूनच मिळते .,9) झाडांमुळे ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण थांबविण्यासाठी मदत होते .,10) झाडांमुळेच ढगाला थंडावा लागतो , पाऊस पडतो आणि पाणीप्रश्न दूर होतो .,11) सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडांपासून श्वसनासाठी अत्यंत आवश्यक असणारा शुद्ध आँक्सिजन वायूचा पुरवठा होतो .,12) झाडांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाडे वातावरणातील कार्बनडायॉक्साईड वायू शोषून घेतात , जो मानवाला हानीकारक असतो आणि शुद्ध आँक्सिजन सोडतात .,13) पृथ्वीच्या सौंदर्यात वाढ होते .
झाडांचे वरील सर्व उपयोग पाहता वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन व वृक्षांचे जतन करणे किती आवश्यक आहे हे आपणांस कळून आलेच असेल !वाढती लोकसंख्या , शहरीकरण , कारखाने , वाहनांचा वाढता वापर , वाहनांमध्ये रॉकेल भरणे , नदीमध्ये कारखान्यातील , शहरातील मैला सोडणे , वृक्षांची अमाप तोड करणे इ. कारणांमुळे ध्वनीप्रदूषण , वायूप्रदूषण व जलप्रदूषण होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे . वाढत्या कार्बनडायॉक्साईडमुळे आकाशातील ओझोन वायूचा थर कमी होऊन सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे पृथ्वीवर सरळ येत असल्यामुळे पृथ्वीवरील उष्णतामान वाढले आहे . पाण्याचे बाष्पीभवन वाढले . त्यामुळे अंगाची लाही लाही होते आहे . तसेच अनेक भागात त्सुनामी लाटा , भूकंप होताना दिसत आहेत . म्हणून .....
जंगल तुटले , प्राणी घटले
जमीन अस्वच्छ , पाणी आटले !
बिघडले सर्व जगण्याचे मंत्र
जुळेल कसे निसर्गाचे तंत्र ?
अशा चार ओळी सहज ओठांवर येऊन जातात . म्हणून प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येकाने किमान दहा झाडे लावणे आवश्यक आहे . दहापैकी किमान
दोन तरी झाडे सहज वाचतील व पर्यावरण संतुलनास मदत होईल .
चौकटी , दारे , खिडक्या , पलंग , दिवाण , कागद , सरपण , वाहनांची बॉडी इ. गरजा भागविण्यासाठी लाकूड आवश्यक आहे . पण त्याप्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे . अमाप वृक्षतोडीमुळे जंगल घटले , परिणामी पाण्याने भरलेल्या ढगांना थंड हवा मिळत नाही व पाऊस पडत नाही . म्हणून प्राण्यांसह मानवालाही पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे . त्यामुळे वानर , हरिण इ. जंगली प्राणी शहराकडे धाव घेताना दिसत आहेत . पावसाअभावी कित्येक शेतकरी हवालदिल होऊन , कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत . मूळात भारत हा कृषीप्रधान देश असून अन्नधान्यांच्या गरजांसोबत देशाच्या तिजोरीमध्ये शेतीच्या उत्पन्नाचा सिंहाचा वाटा आहे . अर्ध्याच्यावर व्यापार हा शेतीवरच अवलंबून आहे . उदा.कापड उद्योग , गोडतेल उद्योग इ. म्हणून शेती पिकण्यासाठी पाऊस पाहिजे . पाऊस येण्यासाठी झाडे पाहिजेत . म्हणूनच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे ! म्हणून फळाची अपेक्षा न करता भावी पिढीसाठी व देशाच्या हितासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून त्याचे जतन करणे ही काळाचीच गरज आहे !
पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे भूकंप , गारा , महापूर , उष्णतामान , त्सुनामी लाटा , चक्रीवादळ अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे . म्हणून असे म्हणणे भाग पडते की ......
कधी चक्रीवादळ अन्
कधी सुसाट्याचा वारा
बिघडला निसर्गाचा
समतोल पहा सारा !
आणि म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण केले पाहिजे . वाहनांतून निघणारा धूर- कार्बनडायॉक्साईड वायू शोषून घेण्यासाठी प्रत्येक पावसाळ्यात नित्याने रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक आहे . धूर - कार्बनडायॉक्साईड वायू शोषण होऊन शुद्ध प्राणवायू म्हणजेच आँक्सिजन वायू मिळेल . म्हणून पर्यावरण संतुलनासाठी तेवढीच मदत होईल . त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की......
किती करावे तुमच्यापुढे कथन ?
वृक्षतोड पाहता येते रुदन
वृक्षारोपणाचे गाऊनी कवन
एक तरी झाड लावा प्रत्येकानं !
-------- * -------- * --------
- लेखक, कवी डॉ. माधव सैनाजीराव कुद्रे