CRIME BORDER | 27 December 2025 | 07:17 PM
बऱ्याचदा सगळ काही ठीक चालू आहे असं वाटत असतानाच आत खोलवर कुठे तरी खूप काही साचलेलं उचंबळून बाहेर येऊ पाहत. शांत शीतल पाण्यासारख्या मनपटलावर अचानक विचारांचे आघात होतात अन स्थिरावलेल मन खवळलेल्या लाटांप्रमाणे धडका देऊ लागत. एखादी शांत रम्य सायंकाळ देखील हळूच मनावरची खपली काढून जाते अन त्या ओलावल्या जखमेतुन भळभळा रक्त वाहू लागत. अश्यावेळी समोरच नयनमनोहर दृश्य देखील मनात संकोच निर्माण करून जातं, निवळलेलं मन असं गढूळ होत जात.
आनंद नाती सगळं सगळं असत आयुष्यात पण तरी देखील मन एक दुःखी कोपरा शोधू पाहतच. त्या दुःखाला कवटाळून मनसोक्त रडून घेतल्यावर जो आनंद होतो तो सगळ्या सुखांच्या सीमा पार करून जाणारा असतो.
सगळे आपापल्या आयुष्यात सुखी असतात. पण आपण कधी विचार केलाय का ? ते खरच आयुष्यात सुखी आहेत कि सुखी असल्याचा दिखावा करतायत ? कित्येकदा आपल्या माणसांसमोर तो सुखाचा दिखावा गळून पडतो. मायेचा हात डोक्यावरून फिरला कि सत्याच्या जाणीवा आणखी प्रखर होऊ लागतात; त्यात होरपळणारे हात आपल्या माणसांचेच असतात.
समाजाला घाबरून कित्येकदा लोक सगळ्याच गोष्टी कश्या वेळेत करतात. कारण एकच लोक हसतील. पण त्यांना हे कळत नाही कि लोक हसतील ते त्यांचं कामच आहे तुम्ही चांगलं करा किंवा वाईट हसणारे हसणारच आहेत मग ज्यांचा काही संबंधच नाही अश्या शुल्लक लोकांचा विचार करून आपण आपलं आयुष्य का जगायचं ? गोष्टी वेळेत करण्याच्या नादात अनेकदा आपण चुकीचा निर्णय घेऊन बसतो. सुरवातीला त्याची जाणीव आपल्याला होतच नाही. सगळं कस छान सुखकर चाललेल असत पण सुरवातीचा आनंद शेवट्पर्यंत टिकतोच असं नाही. मग आपणच घेतलेल्या निर्णयाचा आपल्याला प्रचंड राग येतो पण आपण तिथून माघारी देखील फिरू शकत नसतो कारण एकच लोक हसतील. लोकांचा विचार करणाऱ्या जीवांचं आयुष्य हे असच काहीस असत. म्हणून विचार आपला करा आपल्या भविष्याचा करा आपल्या माणसांचा करा. थोडा उशीर झाला तरी काय हरकत आहे आयुष्य आपलं आपल्यालाच जगायचंय. सुखाच्या मागे धावण्यापेक्षा आहे त्यात सुख मानलं ना कि जगणं कस सोप होऊन जात. सुख आनंद जो सुरवातीला आहे तोच शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल असं नातं ज्याला मिळत ना तोच सर्वार्थाने सुखी होतो.
अश्या वेळी निवांत सायंकाळी सागराच्या किनारी पाण्यात पाय सोडून एकट्यानेच अस्ताला जाणार ते लालबुंद सूर्यबिंब न्याहाळत बसायच. मनातल्या साचलेल्या गोष्टींचं सागराशी हितगुज साधायचं. कमावलेलं अन गमावलेल सार काही त्याच्यात रितं करायचं अन आपण उरलेलं आयुष्य जगायला रितेपणाने चालत राहायचं रस्ता दिसेल तसा अन तिथवर.
-स्नेहा शिंदे.