CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

लाखमोलाची गोष्ट....!!!....लेखक - दीपक कांबळी

CRIME BORDER | 27 December | 02:30 PM

राजेंद्र देशमुख एक "आय ए एस अधिकारी" सरकारी बंगला,सरकारी गाडी,नोकर चाकर,आज सगळंच होतं त्यांच्याकडे.गरीबीतून वर आलेला अधिकारी म्हणून त्यांचा बोलबाला होता.अगदी कठीण परिस्थितीत अभ्यास करून सामान्य घरातील मुलगा "आय ए एस अधिकारी" होऊ शकतो हे त्यानी दाखवून दिले होते,म्हणूनच मोठ मोठ्या संस्था,काॅलेजेसमधे त्यांना 'मोटीवेशन स्पिकर' म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्या करता त्यांना बोलावलं जायचं.त्यासाठी मानधनही मिळायचं,पण ते पैसे ते गरीब गरजू विद्यार्थ्यास मदत करण्याकरता वापरायचे.आजही एका अशाच मार्गदर्शनपर भाषणासाठी ते निघाले.कोट,सूट,बूट,बाकी सगळं ठीक होतं,पण त्यांच्या हातात एक जुनी छत्री होती.ती त्यांनी आपल्या कपाटात जपून ठेवली होती.आज ती छत्री पाहून ड्रायव्हर,नोकर चाकर,सगळेच आश्चर्याने पहात होते.साहेब निघाले भाषणाच्या ठीकाणी पोहोचले. त्यांना रिसिव्ह करायला प्रिन्सिपाॅल वगैरे नामी व्यक्ति होत्या.साहेब गाडीतून बाहेर पडले सगळ्यांशी हस्तांदोलन झाले.सगळ्यांची नजर त्या जुन्या छत्रीवर पडताच त्यांना आश्चर्यच वाटायचं.सर व्यासपीठावर आले तरी ती छत्री त्यांच्या हातातच होती.त्यांचं स्वागत झालं सत्कार झाला.आता सर बोलायला उभे राहिले तरी त्यांच्या हातात ती छत्री होती.विद्यार्थ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली."नमस्कार" सरांनी भारदस्त आवाजात सुरवात केली.

आता सारं शांत झालं होतं.सर पुढे म्हणाले. "आपण शिकत असतांना सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला शिकवण्यासाठी आपले पालक किती कष्ट घेत आहेत.हे जर तुम्हाला समजलं,तर तुम्ही तुमच्या पूर्ण ताकदीनिशी अभ्यास कराल आणि यशस्वी व्हाल.मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो.खरंतर ही माझी गोष्ट नसून या छत्रीची गोष्ट आहे.जिच्याकडे सगळेच आश्चर्याने पहात आहेत"

"माझा जन्म एका आडगावात झाला.गरीबीचा भरपूर सहवास लाभला.आई वडील रोज मजूरीसाठी बाहेर पडायचे.येताना काहीतरी खायला घेऊन यायचे.आई आजारी पडली तरी वडील एकटेच जायचे.मला मात्र फक्त अभ्यास करायला सांगितलं जायचं.वडील कधी आजारी पडलेले मला आठवत नाहीत.किंबहुना त्यांनी तसं कधीच दाखवलं नाही.मी दहावी पास झालो.शिक्षणासाठी शहरात आलो.माझ्या गावा पासून चाळीस किलो मीटर दूर.दर महिन्याला मनी ऑर्डर यायची मी ते पैसे जपून खर्च करीत असे.माझे मित्र माझी यावरून चेष्टा देखील करायचे.

एकदा नुकताच पाऊस सुरू झाला होता माझ्याकडे छत्री नव्हती.कपड्यांचे दोनच जोड असल्याने भिजण्याची हौस परवडणारी नव्हती.इतक्यात कुणीतरी भेटायला आलेत म्हणून निरोप आला.मी खाली गेलो तर, पहातो काय बाबा गेटवर उभे होते.त्यांच्या हातात नवी छत्री होती.मी आत बोलावलं तर "नको माझे कपडे ओले आहेत" म्हणाले मी विचारले "छत्री होती तर उघडली का नाही?" तर म्हणाले "मी कधी वापरली का छत्री? तुझ्यासाठी आणली,तू भिजू नये म्हणून" "हो पण पाऊस आला तर उघडायची ना भिजायचं कशाला छत्री होतीच की" "छे छे तुला वापरलेली छत्री कशी देणार? तुझे मित्र काय म्हणतील?" असे म्हणून ते परत निघाले,मी म्हंटल "जाणार कसे?" तर म्हणतात "चालत जसा आलो तसा" बापरे! मला छत्री देण्यासाठी बाबा चालत चाळीस किलोमीटर भिजत आले होते,आणि परत चाळीस किलोमीटर चालत घरी जाणार होते.मी ती छत्री हातात घेतली.त्यावरील प्लास्टीकचं आवरणही काढलं नव्हतं.मी त्या छत्रीवर हात फिरवला मला बाबांच्या मायेची उब जाणवत होती.एक बाप आपल्या मुलाला नवी कोरी छत्री देण्यासाठी,चाळीस किलोमीटर चालत येतो आणि परत चाळीस किलोमीटर चालत जातो.छत्रीवर शंभर रूपयाचे लेबल होते.मी ते काढून टाकले,कारण माझ्या लेखी ती लाखमोलाची होती.

मित्रांनो मी आजही ही छत्री जपून ठेवली आहे.जेव्हा आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात तेव्हा आपण शिक्षण घेऊ शकतो.ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवलीत तर तुम्ही नक्की मेहनत करून यशस्वी होऊ शकता. "धन्यवाद" सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सर निघाले आता त्या छत्रीकडे बघण्याची प्रत्येकाची नजर बदलली होती.आता प्रत्येकाला वाटत होतं आपल्याकडेही अशी एक छत्री हवी होती....

लेखक - दीपक कांबळी

राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी,

महाराष्ट्र राज्य मुंबई - ९९८७१९३३३८


मुख्य संपादक : राजेंद्र वखरे

बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा - मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६