CRIME BORDER | 27 December | 02:30 PM
बरेच दिवस झाले. ती भेटली नाही. तो तसा अस्वस्थच होता. आज नाही उद्या येईल या आशेवर जगत होता. जुन्या आठवणीत रमून जात होता. त्याची अन तिची पहिली भेट झाली होती, सिनेमाच्या तिकिटांच्या रांगेत. त्याला तिकिट मिळाले आणि शो हाऊसफुल झाला. विंडो बंद झाली हा वळला, तेव्हा तीचा हिरमूसलेला चेहरा त्याच्या समोर आला. ती त्यावेळीच त्याला खूप आवडली होती. ह्याने मित्राला फोन करून खोटेच सांगितले तिकिट मिळाले नाही म्हणून आणि तीला म्हणाला, "एस्क्यूज मी, माझ्याकडे एक एक्स्ट्रा तिकिट आहे, काय आहे ना माझा मित्र येणार होतां पण अचानक त्याला काहीतरी काम निघालं" "बरं झालं!" ती पुटपुटली "काय?" "नाही बरं झाल तुम्ही मला विचारलं असं म्हणायचं होतं मला", "अच्छा!" "मला द्या मी घेते ते तिकीट" असं म्हणून तीनं तिकिट घेतलं, तिच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. तीच्या फेव्हरेट हिरो शाहरूख चा सिनेमा होता. ह्या पठयानं तीच्या सोबत म्हणजे, बाजूला बसून संपूर्ण सिनेमा पाहिला आणि मित्राला झालेली हकीकत सांगितली. आधी त्याने शिव्या घातल्या, पण नंतर त्याला धीर दिला म्हणाला 'कदाचित हीच असेल तुझ्या स्वप्नातील परी' नंतर रस्त्यात येता जाता दोघे एकमेकांना स्माईल द्यायचे. दोघंही एकाच इमारतीत पण वेगवेगळ्या कंपनीत कामाला होते. दोघांची वेळ ही सारखीच होती.
अचानक एके दिवशी ती त्याला त्याच्या ऑफिसमध्ये दिसली. "इकडे कुठे?" त्यानं विचारलं "इंटरव्हयूसाठी आले" "अरे वा! माझ्याच डिपार्टमेंटला व्हॅकॅन्सी आहे म्हणजे तुझं, साॅरी तुमचं.." "नाही इट्स ओके! तुझं चालेल" "ओके तुझं काम झालंच समझ" "अहो पण" "नाही अहो नाही" "बंर! अरे पण कसं शक्य आहे?" "अगं दोन जागा आहेत आणि उमेदवार चारच आहेत, आणि इंटरव्ह्यू मीच घेणार आहे" "अच्छा म्हणजे साॅलीड वशीला आहे" "हो पण मी लाच घेणार आहे" "काय?" "अगं म्हणजे जास्त काही नाही एक काॅफी तरी देशील ना?" "हो नक्की आधी नोकरी तर मिळूदे" "ती मिळालीच समज, चल बाय! भेटू" म्हणून तो निघून गेला पण ती त्याच्या पाठमो-या आकृतीकडे पहात राहिली. तो तीला आवडायला लागला होता.
तो जागेवर गेला, घाई घाईतच त्यानं पोर्टफोलीओ ओपन केला, लिस्ट आणि फोटो पाहिला आणि त्याचा चेहरा पडला. तीचे नाव होते 'रोझा फर्नांडिस', म्हणजे ख्रिश्चन आणि हा महाराष्ट्रीयन. इंटरव्हयू झाला, ती सिलेक्ट झाली, ह्याने काॅन्ग्रॅटस केलं ती हसून म्हणाली "चला काॅफी प्यायला" तो म्हणाला "आता तूला जाॅब लागलाच आहे पुन्हा कधीतरी घेऊ" "नाही" ती म्हणाली "मी प्रॉमिस केलंय मला ते पूर्ण करावच लागेल हां तुम्हाला माझ्याकडून घ्यायची नसेल तर राहुदे" "नाही तसं काही नाही आपण जाऊया" बरिश्ता मधे दोघं काॅफी घेत गप्पा मारत बसले, ती मुळची मुंबईतली आणि गिरगांवातली त्यामुळे तीचे मराठी अस्खलित होतं, रात्री मित्राला हे सांगीतले तो म्हणाला "अरे आधी तीला प्रपोज तर कर, ती हो म्हणाली तर पुढे बघू" "अरेच्चा! आपण तर तीला गृहीत धरून चाललो होतो," काही दिवस असेच गेले रोज भेट व्हायची ऑफिसात आणि कधी कधी बरिश्तात.
फेब्रुवारी महिना जवळ येतोय 14 फेब्रुवारीला तीला प्रपोज करूया व्हॅलेंटीयन डे ला असं ह्या पठयानं ठरवलं, पण नेमकी त्याच दिवसा पासून ती ऑफिसात येत नव्हती मोबाईल पण बंद आहे काय करावं ह्याचं कामात लक्षच लागत नव्हतं. एवढयात एक ख्रिश्चन बाई ह्याच्याकडे येताना दिसली जवळ येत ती म्हणाली "तू राजेश का?" "हो" हा म्हणाला "मी रोझाची मम्मी, तीचं रेजीगनेशन लेटर घेऊन आलीय, ती सांगत होती तू तीला जाॅब साठी मदत केली" "पण ती नोकरी का सोडते?" तीच्या मम्मीच्या डोळ्यात पटकन पाणी आलं "काहीतरी रिजन असणारच ना बेटा उगीच कोण एवढा चांगला जाॅब सोडेल? मला तीनं सांगीतले आहे तुला काही सांगू नकोस" "मी तीला भेटू शकतो का?" "व्हाय नाॅट? पण तुला घरी यावं लागेल, ती सध्या बाहेर पडत नाही" "ठीक आहे मी येईन घरी" "ओके बेटा गाॅड ब्लेस यू" "थॅन्कस् " ती निघून गेली हा विचारात पडला. काय झालं असेल तीला, ती घरात असते म्हणजे आजारी असू शकते पण एवढी? नोकरी सोडायला लागेल एवढी? तो हैराण होता. संध्याकाळी घरी गेल्यावर त्याने मित्राला झालेली हकीकत सांगितली तो पण स्तब्ध झाला. "ठीक आहे परवा व्हॅलेंटाईन डे आहे त्याच दिवशी मी तीच्या घरी जातो, नाहीतरी त्याच दिवशी मी तीला प्रपोज करणार होतो, हंममम! प्रपोज! मॅन् प्रपोजस् अँड गाॅड डिस्पोजस् " "अरे एवढा निराश होऊ नकोस काहीतरी मार्ग निघेलच" "हो निघेलच आणि तो मलाच काढावा लागेल" एवढं बोलून तो निघून गेला.
आज व्हॅलेंटाईन डे. आज तीच्या घरी जायचंय, छातीत धडधड होत होती, कशी असेल ती? तीलाही मला पहावं असं वाटत असेल? त्याने मोबाईल उचलला मॅसेज होता कुणाचा बरं असेल? अरे रोझाचा! "हॅप्पी व्हॅलेंटाईन, डे गुड बाय!" माय गाॅड कधी पाठवला रात्री बारा वाजता? नाही आता मला जायलाच हवं मी येतोय रोझा.....पत्ता तर बरोबर आहे ही गर्दी कसली एवढी लोकं का जमलीत? बापरे ही तर मयताची सजवलेली गाडी कुणीतरी गेलंय वाटतं शी अशा चांगल्या दिवशीच.... पुढे गेल्यावर त्याला शोकाकुल रोझाची मम्मी दिसली बापरे...म्हणजे? एवढ्यात मम्मीने त्याला पाहिले "यू आर टू लेट माय सन शी इज वेटींग फाॅर यू" तिला कॅन्सर झाला होता आणि कळला तेव्हाच तो लास्ट स्टेजला होता. ह्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली काय झालं हे "साॅरी रोझा......'इट्स टू लेट' हे शब्द त्याच्या मेंदूवर घण घालत होते..'इट्स टू लेट....
लेखक - दीपक कांबळी
राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी,
महाराष्ट्र राज्य मुंबई - ९९८७१९३३३८