CRIME BORDER | 27 December 2025 | 08:00 PM
कधी कधी मन फार हळवं होत. एकटेपणा असह्य होतो, वाटत बाहेर पडून चालत राहावं रस्ता दिसेल तिकडे अविरतपणे. जुन्या जखमा पुन्हा भळभळून येतात त्यांच्यावरच्या खपल्या सुकतात न सुकतात तोच आणखी एक ओरबाडा उठतो आणि पुन्हा तोच आठवांचा पाऊस दाटून येतो.
मन पुन्हा त्या गुलाबी दिवसात पोहचत जीवापाड केलेलं प्रेम, माया, विश्वास सगळं सगळं एखाद्या चित्रपटाच्या फ्लॅशबॅक सारखं डोळ्यासमोरून सरकत. त्या व्यक्तीच्या फोनची मेसेजची वाट पाहण्यातली उत्सुकता त्यातला आनंद काही औरच असतो. काळ वेळ सार काही थिट पडत त्या एका व्यक्तीसमोर. जिथे तिथे त्याचा भास आठवणी स्पर्श सगळं कस हवंहवंस वाटणार. पण अचानक ती वेळ येते जेव्हा त्या व्यक्तीला आपण नकोसे झालेले असतो. आपलं असण त्याला असह्य होत आणि त्या वेळी तिथून निमूटपणे निघून जाण इतकंच आपल्या हातात उरत. मग ज्या रात्री एकमेकांत गुंतून गेलेल्या असतात त्याच निखळून पडतात. हवाहवासा वाटणारा एकांत आता नकोसा वाटू लागतो. रात्री रात्री जागवताना ती भयाण शांतता जिव्हारी लागते. मनात उगाच विचार येतो मी कोण आणि माझं असं कोण ? उत्तर शोधता शोधता रात्र सरून जाते पुन्हा नवीन दिवस नवीन सुरवात पण दिवसाच्या शेवटी पुन्हा तीच सांजवेळ येते. सूर्य पश्चिमेकडे झुकू लागतो आणि माझ मन पुन्हा भूतकाळात रमू लागत.
सांजवेळ, समुद्र ,तू आणि मी हे कस एकदम सुटलेलं गणित वाटायचं. कोण आनंद व्हायचा मला त्या सायंकाळी जगातलं सार सुख जणू आपल्या पायी लोळण घेतंय असच भासायच. तुझया खांद्यावर डोकं ठेवलं कि सार दुःख वेदना क्षणात विरून जायच्या अन उरायचा तो फक्त निखळ आनंद. पण त्यावेळी मला कुठे माहित होत ज्या खांद्यांवर मी इतक्या विश्वासानं डोकं ठेवतेय तेच खांदे मायावी आहेत. ज्या हास्यावर मी सार काही पणाला लावलय ते हास्य खोट आहे. ज्या नजरेत मी विश्वास मिळवलाय ती नजर फसवी आहे. आणि ज्या व्यक्तीला मी आपलं सर्वस्व मानलय ती व्यक्ती एक मायावी पाश आहे.
हे सार कळेपर्यंत सांज सरून रात्रीच अधिराज्य आलेलं असत. सगळीकडे भयाण शांतता आणि मिट्ट काळोख. विषन्न मनाने आकाशाकडे पाहत बसण्याखेरीज हातात काहीच उरलेलं नसत. पुन्हा तो एकांत आणि त्या सुन्न रात्री. पुन्हा तोच विचार मी कोण आणि माझं असं कोण ?
तळटीप : ह्याचा माझ्या वैयक्तिक जीवनाशी तसूभर देखील संबंध नाही तरी उगाच मनाशी तर्कवितर्क लावून माझ्या खाजगी जीवनाविषयी विचारपूस करण्याची तसदी कुणी घेऊ नये हि नम्र विनंती.
-स्नेहा शिंदे.