CRIME BORDER | 27 December 2025 | 08:00 PM
रघुनाथ पाटील, एक तडफदार व्यक्तिमतव, हुशार, शिस्तप्रिय पण तितकाच हळवा. एकदा तो गाडीतून ऑफिसला जायला निघाला. तो गाडी स्वतःच चालवायचा. आज रहदारी थोडी कमी होती. त्याचे लक्ष एका रेस्टॉरंटकडे गेलं. एक गरीब मुलगा दारात उभा आणि होता त्याला वेटर हकलवत होता. रघुनाथने गाडी बाजूला घेतली, पार्क केली आणि तो त्या मुलाजवळ गेला. त्याच्याकडे पाहून त्याला त्याचे बालपण आठवले. तो पंचवीस वर्षे मागे गेला....रघुनाथ एक गरीब घरातील मुलगा, वडील लहानपणीच वारले होते. आई धुणीभांडी करून घर चालवत होती.
हा सुद्धा इतर मुलां प्रमाणे, बुटपाॅलीश करायला तयार होता. पण आई म्हणाली "नाही तू शिकून मोठा हो पोरा, मी तुझ्या शिक्षणाचा खर्च करीन, मी आहे ना? तुला काय बी कमी पडू द्यायची नाही" असे म्हणून तिने त्याचे शाळेत नाव घातले. आजूबाजूची लोकं म्हणाले "शाळेत जाऊन काय कलेक्टर हुणार हाय हा?" पण तिने कुणाचच ऐकलं नाही. रघूला शिक्षणाचं महत्व समजलं होतं, तोही रोज न चुकता शाळेत जात होता आणि रोजच्या रोज अभ्यासही करायचा. त्याला वाईट वाटायचं, आई लोकांची भांडी घासायला जाते म्हणून पण, परिस्थिती पुढे कुणाचेच काही चालत नसते. तो तसा समजुतदार मुलगा होता. पण रघू आज खूशीत होता. घरी लांबचा कुणी मामा आला होता, जातांना त्याने दहाची नोट हातात ठेवली. नको नको म्हणून आईकडे पाहिले, आईने हसून घे म्हणून नजरेने खुणावले. मनात शंका आली मी चुकीचा तर अर्थ घेतला नाही ना? म्हणून पुन्हा आईकडे पाहिले तर आई खरंच घे म्हणत होती. हिंमत करून मी ती नोट स्विकारली.
मामा गेल्यावर आईच्या पुढ्यात ती नोट ठेवली. आई म्हणाली "अरे वेड्या ती मामाने तुला दिली आहे जा तुला वडापाव हवा होता ना परवा? जा घेऊन ये" मी धावत वडापाव वाल्याकडे गेलो. शाळेतून येता जाता वड्याच्या वासानं चित्त विचलित व्हायचं पण खिशात पैसे नसायचे, शेवटी परवा आईला हे सांगितले, तिचा चेहरा पडला, मला वाटले उगाच बोललो, आपल्या लेकराला आपण वडापाव देऊ शकत नाही म्हणून किती वाईट वाटले असेल तिला? पण ती म्हणाली "बेटा आज नाही पण मी नक्की तुला वडापाव देईन" आणि आईने जड मनाने मला पैसे घ्यायला सांगितलं असणार, कारण कितीही उपाशी असलो तरी कुणाची दया घ्यायची नाही ही आईची शिकवण होती. विचार करत करत वडापाव वाल्याकडे पोहचलो. ऐटीत दहाची नोट पुढे केली म्हणालो "काका वडापाव द्या" त्यानेही विचारले "इथे खाणार की बांधून देऊ" "बांधून द्या" कारण आई समोर वडापाव खायचा होता. आईलाही एख घास द्यायचा होता. वडापाव घेऊन बाहेर पडलो, इतक्यात माझी नजर समोर गेली. एक लहान मुलगी माझ्या हातातील पुडीकडे आशाळभूतपणे पहात होती. तिचे कपडे फाटलेले होते.
चेहऱ्यावरून बरेच दिवस काही खाल्लं नसेल असं वाटलं. तिने हात पुढे केला मी नजर वळवून एक पाऊल पुढे गेलो पण मला बरं वाटलं नाही, मी वळलो आणि वडापावाची पुडी तिच्या हातात दिली. मला वाटलं ती लगेच तो वडापाव खाऊन टाकेल पण माझ्याकडे कृतज्ञतेने पाहुन ती वळली आणि घाईत चालली. मला आश्चर्य वाटले मी तिच्या मागे गेलो. पाहतो काय एक लहान मूलगा फुटपाथवर बसला होता. बहुतेक त्याचे पाय अधू होते, तो चालू शकत नव्हता. या मुलीने ती वडापावची पुडी उघडून वडापाव त्याच्या हातात दिला. तो त्या वडापाववर तुटून पडला. ती मुलगी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पहात समोर बसली होती. मला खूप वाईट वाटले माझ्याकडे फक्त एकच वडापाव होता. मी जड पावलाने घरी परतलो. मनात ठरवले आईशी खोटं बोलायचं वडापाव खाल्ला असे सांगायचं, पण आयुष्यात ही एक गोष्ट मला कधीच जमली नाही. मी आईशी कधीच खोटं बोलू शकलो नाही.
त्यादिवशीही मी तिला सत्य हकिकत सांगतली आणि हे पणसांगितले की मी वडापाव खाऊ शकलो नाही, त्यापेक्षा माझ्याकडे एकच वडापाव होता याचे मला वाईट वाटले. दोन असते तर दोन्ही मी तिलाच दिले असते. तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. आईने मला घट्ट मिठी मारली म्हणाली "पोरा आता माझी तुझ्याबद्दलची चिंता मिटली तू खूप मोठा होशील पोरा खूप मोठा होशील" आजही तिचे ते शब्द त्याच्या कानात गुंजत होते. रघुनाथ त्या मुलाला घेऊन त्या रेस्टॉरंटमधे गेला. आता त्या मुलाला अडवायची कुणाचीच हिंमत नव्हती. त्याने प्रथम त्याला वाॅशरूमला नेले. त्याला स्वच्छ हात धुवायला सांगितले. नंतर तो त्याला एका टेबलावर घेऊन बसला. काय हवंय तुला त्याने विचारले त्याला काही सांगता येईना. वडापाव चालेल हो तो मुलगा म्हणाला त्याने तीन वडापाव मागितले. दोन त्या मुलाला दिले आणि एक स्वतः खाल्ला. आणखी काही हवंय? त्याने त्या मुलाला विचारले. नको तो मुलगा म्हणाला. त्याने अजून दोन वडापाव पार्सल घेतले आणि त्या मुलाला सांगितले हे घरी घेऊन जा त्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
जा आता तू घरी. असं म्हणताच तो मुलगा निघाला थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळुन पाहिले रघुनाथने त्याला टाटा केला. तो मुलगा हसून निघून गेला. पैसे देण्यासाठी त्याने पाकीट काढलं त्याची पाकिटातील आईच्या फोटो वर नजर गेली. आईचा चेहरा त्याला हसरा भासत होता.पैसे भरून तो ऑफिसला निघाला एक चांगल काम केल्याचं समाधान त्याच्या चेहयावर होतं.
लेखक - दीपक कांबळी : राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई - ९९८७१९३३३८
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे: बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा - मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६