CRIME BORDER | 27 December 2025 | 08:00 PM
वाघमारे साहेबांच्या केबीन मधे उर्मीला आली "सर आज मला जरा लवकर जायचंय" वाघमारे सर भुवया उंचावून म्हणाले "ओके पण उद्या लेट टर्न करावी लागेल" असं म्हणताच उर्मीला चक्क लाजली आणि "ठिक आहे" म्हणाली वाघमारेंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. लाडीक आवाजात बाय म्हणून ती बाहेर पडली पण समोर पाटील चपराशी उभा होता. त्याला पाहून तीचा चेहरा पडला. हा पाटील मेला वाॅचवरच असतो "काय मॅडम मिळालं का कन्सेशन" "हो" उर्मीला जरा रागातच बोलली "मिळालं म्हणजे मिळणारच होतं" "म्हणजे?" "अहो तुम्हाला नाही तर कुणाला मिळणार कनसेशन हो" पाटीलकडे रागावून बघून पर्स उचलून ती निघाली पाटील छद्मी हसत होता "कशाला हो चिडवता तीला?"
कुलकर्णी मॅडम म्हणाल्या "अहो मी काय खोटं बोलतू का?
परवा साने मॅडमचा मुलगा आजारी होता त्याना दिलका कनसेशन? आणि ह्यानी विचारलं की लगेच मिळतय ह्यांना कनसेशन, आता गंमत बघा उद्या ह्यांची लेट टर्न असणारच"
"तुमचं आपलं काहीतरीच असतं हां पाटील" "घ्या आता अनुभव आहे इतक्या वर्षाचा" असं म्हणून पाटील निघून गेला पण कुलकर्णी मॅडम च्या डोक्यात भुंगा सोडून गेला. अलीकडे वाघमारे आणि उर्मीची जरा जास्तच जवळीक जाणवतेय हा पाटील म्हणतोय त्यात काही तथ्य असेल, छ्या! उगाच काहीतरी
ह्या पाटलाला नाही धंदा, नुसत्या जगाच्या उठाठेवी करत फिरतो. असं म्हणून कुलकर्णी मॅडम नी फाईलीत तोंड खुपसलं
दुसया दिवशी उर्मीला जरा जास्तच नटून आली "काय गं कुठे लग्नाला वगैरे जायचं आहे का?" काळे बाईंनी विचारलं "नाही हो नेहमीची तर साडी आहे काही विशेष नाही" कुलकर्णी मॅडमनी पण नोटीस केलं पण त्या कांही बोलल्या नाहीत. "उर्मी चहाला जाऊया का?" " नको माझा झाला सकाळीच साहेबां बरोबर" अच्छा म्हणजे सकाळी साहेबांनी ट्रे मागवला तो ह्या मॅडम साठीच वाटतं, पाटील म्हणतो त्यात खरंच काही तथ्य असेल? कुलकर्णी मॅडमच्या डोक्यात चक्र सुरू झालं कामं सुरू झाली आणि तो विचार बाजूला पडला.
संध्याकाळ झाली नेहमी प्रमाणे साडेपाच ला फ्रेश होण्यासाठी कुलकर्णी मॅडम उठल्या "उर्मी चल येतेस ना" "नाही तुम्ही व्हा पुढे आज मला थांबायला सांगितलंय साहेबांनी" "का? आता तसं काही विशेष काम पेंडीग नाही" "बघाना मी पण तेच म्हणाले पण साहेबांच्या पुढे कोण बोलणार" उर्मीला नाटक करतेय हे एव्हाना कुलकर्णी मॅडमच्या लक्षात आले कुठंतरी पाणी मुरतंय बरं असं म्हणून त्या एकट्याच निघाल्या. फ्रेश होऊन आल्या उर्मीला जागेवर नव्हती, म्हणजे ती आत होती आणि साहेबांच्या केबीनचा लाल दिवा जळत होता म्हणजे इतरांना आत येण्यास मज्जाव, आता ही आत असतांना लाल दिव्याची गरज काय? त्या पर्स उचलणार इतक्यात पाटील आत आला "काय मॅडम मी म्हणलो तसंच झालं नव्ह" "काय?" कुलकर्णी मॅडमनी वेड पांघरून विचारलं "अहो लेट टर्न मला कळले नाही" मॅडम आव आणत म्हणाल्या "अहो मी काल तुम्हाला म्हंटल ना !उद्या लेट टर्न होणार" "हं ते होय .... बरोबर आहे" असं म्हणून मॅडमनी पळ काढला.
दुस-या दिवशी सकाळी पाटील कुलकर्णी मॅडमकडे येऊन उभा राहिला. "मॅडम काल तुम्ही गेलात मला ऑफिस बंद करायला आठ वाजले" "बापरे! आठ वाजेपर्यंत काय करत होता?" पाटील हसून म्हणाला "मी कुठे काय करत होतो मी, हे दोघे जाण्याची वाट पहात होतो" "म्हणजे हे दोघे आठ वाजेपर्यंत होते?" " हो म्हणून तर मला आठ वाजले, मी वाट पहात होतो हे दोघे केबीन मधून केव्हा बाहेर येतात याची" "तुम्ही निघून जायचं" "मॅडम कसं निघणार पोटा पाण्याचा प्रश्न आहे."
"म्हणजे?" "अहो प्रत्येक लेटटर्नला मला हजार रुपये मिळतात"
"हजार रुपये कोण देतं?" "आपले साहेब आणि कोण" "पण साहेब का देतात?" "अहो त्यांची लफडी बाहेर पडू नये म्हणून"
"बापरे" कुलकर्णी मॅडम डोकं धरून खाली बसल्या दिवसभर कामात त्यांच लक्षच लागलं नाही दिवस कधी संपला त्यांना कळलंच नाही. उदास मनानं त्या निघाल्या.
दुस-या दिवशी कुलकर्णी मॅडम जरा लवकरच ऑफिसात आल्या. 'मी आज काय तो सोक्षमोक्ष लावणार. निदान माझ्याकडून तरी समजवण्याचा प्रयत्न करणार. कमीतकमी आपण प्रयत्न केला होता याचं समाधान' याच विचारात असतांना उर्मिला आली "काय मॅडम कसल्या विचारात अहात?" त्यांना गंभीर पाहून तिनं जवळ येऊन त्यांचा हात धरला "कांही सिरीयस तर नाही ना?"
"हो तसं सिरीयसच आहे" मॅडम म्हणाल्या "उर्मीला मला तुझ्या बद्दलच बोलायचंय" "माझ्या बद्दल?" " हो मला माहीत आहे मी तुझ्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करतेय पण त्याला माझा इलाज नाही" "काय झालंय? कशा बद्दल बोलताय? "तुझ्या आणि त्या वाघमारे बद्दल" "मॅडम तुमचा कांहीतरी गैरसमज होतोय" "उर्मीला तुला या नोकरीत जेमतेम तीन वर्षे होतायत आणि मी माझ्या तीस वर्षाच्या नोकरीत अशा ब-याच उर्मीला पाहिल्यात, त्यांचे भरलेले संसार उध्वस्त होताना पाहिले आहेत, तुझ्या सारखीच माझी एक खास मैत्रीण होती 'कुमूद' कुमूद राणे तीचं नाव.अतिशय सुंदर! हसतमुख चेहरा, कुणालाही क्षणात आपलंस करायची. माझी आणि तीची घट्ट मैत्री होती, अगदी आज डब्यात काय आणले असशील हे ओळखण्या एवढी आमची मैत्री होती. तीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. दोन गोंडस बाळं होती. एक मुलगा, एक मुलगी, सुंदर चौकोनी कुटुंब! तीचा नवरा इंजिनिअर होता. दोघांचा संसार सुखात चालला होता. त्यावर्षी आम्हांला महाजन म्हणून एक तरूण साहेब आले. हॅन्डसम होते. वागणं, बोलणं, अगदी रूबाबदार. तीची आणि त्यांची अशीच मैत्री जमली. सेंट, परफ्यूम, घड्याळ, यांवरून सुरवात झाली, ती दागिन्या पर्यंत पोहोचली. मला संशय यायला लागला. माझ्या बरोबर निघणारी ही उगाच 'लेटटर्न' ला थांबू लागली. आजंबाजूला या दोघांची चर्चा सुरू झाली आणि एकदिवस नको ते घडले, तीचा नवरा ऑफिसात आला ती तेव्हा साहेबांच्या केबीन मधे होती. लाल दिवा जळत होता तरी तो जबरदस्तीने केबीन मधे घुसला आणि त्याने काय पाहिलं माहित नाही, तो तसाच माघारी फिरला. ही बाहेर आली पर्स घेऊन तडक निघाली. मी तीला हाक मारली, पण माझ्या नजरेला नजर मिळवण्याची तीची हिंमत नव्हती. ती तशीच निघाली. त्या दिवसानंतर ती कधीच ऑफिसात आली नाही. "मग पुढे काय झालं?" "काही दिवसांनी पेपर मधे बातमी वाचली, तीनं ट्रेन खाली आत्महत्या केली याची" दोघी सुन्न अवस्थेत बसल्या. थोड्या वेळाने सावरून मॅडम म्हणाल्या "मी बदलीसाठी अर्ज केलाय आता दुसरी कुमूद पहाण्याचं बळ माझ्यात उरलं नाही" असं म्हणून त्या निघून गेल्या, उर्मीला त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिली. "मॅडम" चपराशाच्या हाकेनं उर्मीला भानावर आली. "मॅडम साहेब चहासाठी बोलावतायत" त्याच्याकडे पहात ती म्हणाली "साहेबांना म्हणावं मी चहा सोडलाय" तीच्याचेहऱ्यावर ठाम निर्धार होता. तीच्या बाजूला असलेल्या कुलकर्णी मॅडमकडे तीचं लक्षच नव्हतं. मॅडमनी तीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या "मी बदलीचा अर्ज मागे घेतेय" दोघी एकमेकांकडे पाहून हसल्या.....
लेखक - दीपक कांबळी
राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी,
महाराष्ट्र राज्य मुंबई - ९९८७१९३३३८
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा - मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६