CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

प्रतारणा...!!!..लव इज कोल्ड ब्लडेड मर्डर, लव इज ब्लाइंड,ती १५ वर्षानंतर त्याला मुंबईतील हेड ऑफिसमध्ये पाहते अन्...लेखक - दीपक कांबळी

CRIME BORDER | 27 December 2025 | 08:00 PM

No image available

प्रतारणा...!!!...... या प्रेम कथेत तुम्ही तर नाही ना ? काहींना हि प्रेमकथा नक्कीच भूतकाळात घेऊन जाईल. आज त्याला अचानक समोर बघून सुखद धक्का बसला.किती वर्षाने त्याचा चेहरा दिसला. अजूनही तो तसाच दिसत होता.फक्त चेहऱ्यावर एक उदासीची छटा होती,त्याला पाहून ती भूतकाळात गेली....तो तीचा ऑफिसातील पहिला दिवस.मनात एक वेगळी हुरहूर,थोडेसे दडपण होते.आस्थापनेतील औपचारिक बाबी आटपून,तिला दिलेल्या डेस्कमधे ती गेली.तिथे तिने पहिल्यांदा त्याला पाहिलं.प्रथमदर्शनीच तो तिला आवडला होता.छान दिसत होता.त्याच्या चेहऱ्यावर मोकळे हास्य होते."या आपले लेखा शाखेत स्वागत आहे" असे म्हणून त्याने एक गुलाबाचे फुल दिले.हे तिला अनपेक्षित होते.सगळ्यांनी हस्तांदोलन करून तिला शुभेच्छा दिल्या.ह्याने फक्त हात जोडले.थोडी रागावलेच होते हात मिळवायला काय झालं? उगाच शिष्टपणा करतो.मग माझेच मला हसायला आले.अशी काय वागते मी,पण एकंदरीत तो आवडला होता.तसा गप्पिष्ट नव्हता,पण छान बोलायचा.माझ्यापेक्षा चार वर्षे सिनियर होता.काही अडले की,मी त्यालाच विचारायचे.अगदी छान समजावून सांगायचा.हळूहळू ओळख वाढत गेली.मग कळले कि तो नागपूरचा होता. ही त्याची पहिलीच नोकरी होती.घरची गरीबी होती,वडील लहानपणीच गेलेले,एकटी आई घरी असायची,तीच्या मजूरीवर ह्याचं शिक्षण झालं.हा पण काम करत करतच शिकला.

मुंबईत चार मित्र मिळून एकत्र रहायचे.हा तसा फार कुणात मिसळत नव्हता.साहजिकच होतं खेडेगावातून मुंबई सारख्या शहरात थोड बुजण्यासारख होतंच.साधारण सहा महिन्यात मी ऑफिसात रूळले होते.लंचगृप तयार झाला होता.सुरवातीला मैत्रिणींमधे त्याचीच चर्चा असायची. मी लक्ष देत नाही म्हंटल्यावर मग ती कमी झाली.तरी कधीतरी विषय निघायचा "कसा आहे गं तो?" "कसा म्हणजे?" "अगं बोलतो का तुझ्याशी?" "हं कामानिमित्त बोलणे होतेच ना,का गं?" "नाही तसा जरा शिष्टच वाटतो ना","नाही मला तसे वाटत नाही","पण काही म्हण दिसतो छान,हसतमुख" "जाऊ दे, आपल्याला काय करायचंय?" म्हणून मी विषय थांबवायची. मला कळत नव्हतं दुसऱ्या कुणी त्याच्या बद्दल बोललेलं मला आवडत नसे,पण मेली ती नलू कुलकर्णी नेहमी त्याचाच विषय काढायची.कधीतरी उगाच मला भेटायला यायची आणि त्याच्याकडे पाहत राहायची.मला कोण जाणे का पण तिचा राग यायचा.मी तिला घेऊन उगाच बाहेर पडायची "चल वाॅशरूमला जाऊया"

हळूहळू तो ओपन व्हायला लागला,माझ्याशी बराच बोलायला लागला,मला आपलं सगळं सांगायचा.एकदा घाम पुसतच आला आणि माझ्याकडे पहातच नव्हता.आजुबाजुला कुणी नाही याची खात्री केल्यावर मी विचारले "बरं वाटत नाही का?" "नाही तसं काही नाही" "मग घरी काही झालंय का?" "नाही नाही सगळं ठीक आहे" "मग अपसेट का वाटताय?" "तुम्ही कसं ओळखलत?" "त्यात काय ओळखायच? सरळ दिसतंय चेहऱ्यावर " असं म्हणताच त्याने रूमाल काढून चेहरा पुसला.मला हसायला आलं,तसा तोही हसला आणि म्हणाला "आता जरा बरं वाटतंय" आणि नाॅर्मल झाला. "अहो शाळेत सुद्धा मी मुलींशी बोललो नाही.प्रथम तुमच्याशीच बोललो पण मला त्यात वावगं काही वाटलं नाही.तुमचा स्वभाव कसा छान" आहे "म्हणजे कसा?" तो माझी स्तुती करतोय पाहून मी आत कुठेतरी सुखावत होते . "छान म्हणजे चांगला," "अहो मी समानार्थी शब्द नाही विचारत, माझा स्वभाव तुम्हाला का आवडला?" आता तो गडबडला "म्हणजे बघा तुम्ही जशा दिसता तसा तुमचा स्वभाव आहे" "मी कशी दिसते" "सुंदर छान" तो पटकन बोलून गेला "तुम्हाला मी आवडते?" "हो" "किती?" मी त्याची फिरकी घेत असले तरी मनातून मी सुखावत होते."किती म्हणजे?" "किती म्हणजे किती?" असे म्हणत मी त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली.त्याला घाम फुटला होता माझाही तोल सुटेल असं वाटत होतं.त्याने माझ्या डोळ्यात पहावं असं वाटायचं पण तो ते टाळत होता.मी भानावर आले आणि म्हंटल "किती म्हणजे पाव किलो की अर्धा किलो?" असं म्हणत मी जोरात हसले तो पण हसला "काय मॅडम गरिबाची फिरकी घेताय,मी आधीच परेशान होतो" "का?" "आपल्या ऑफिसातल्या एक मॅडम लिफ्टमधे मला मागून चिकटत होत्या,म्हणजे तशी गर्दी होती लिफ्टमधे पण गर्दीचा फायदा घेत होत्या,मी पुढे सरकत होतो त्या आणखी पुढे येत होत्या,शेवटी मला जागाच उरली नाही आणि त्यांनी छाती पाठीवर घासायला सुरवात केली.

मला कसं तरी व्हायला लागलं.मी लिफ्ट थांबल्या बरोबर,माझा मजला आला नव्हता तरी उतरलो,आंणि चालत आलो म्हणून मी मघाशी अपसेट होतो. का? ही लोकं अशी वागतात?" "कोण होती ती बाई?" "नाही मी सांगू शकत नाही" "तुम्हाला सांगाव लागेल" "नाही" "ठिक आहे मग यापुढे माझ्याशी बोलायचं नाही" "अहो पण मॅडम मी कसं सांगणार त्या विवाहीत आहेत" "हे ऐकल्यावर मीच बधीर झाले त्याच्याकडे न पाहता उठले आणि वाॅशरूमला गेले. सपासप पाणी तोंडावर मारले.जरा बरं वाटलं,मी विचार करू लागले,की मी का डिस्टर्ब झाले? त्याने नाव सांगितले नाही? त्याचे बरोबरच होते,मला का राग आला? मघाशी मलाही मोह झालाच होताना? पण! विवाहीत स्त्रीलाही? मी पुन्हा एकदा सपासप पाणी तोंडावर मारले चेहरा नीटनेटका करून मी डेस्कमधे आले.तो जागेवर नव्हता पुढचे दोन दिवस कठीण गेले.आम्ही एकमेकांबरोबर बोलत नव्हतो.

तिसऱ्या दिवशी आजुबाजुला कुणी नाही पाहून तो समोर आला."मॅडम साॅरी मला माफ करा,पण मी काय करू? मी डिस्टर्ब होतो,मला काही सुचत नव्हते,मी पहिल्यांदाच ही गोष्ट अनुभवत होतो,मी कुणाला सांगू शकत नव्हतो,पण तुम्ही विचारले आणि माझा बांध सुटला,मी धडाधडा बोलत गेलो साॅरी,आता मी तुम्हाला काही सांगून त्रास देणार नाही,पण तुम्ही अबोला धरू नका.मला दोन दिवस चैन नाही,मला झोप येत नाही मी तुम्हाला त्रास दिला याचं मला दुःख होत आहे" "ठिक आहे मी बोलीन तुमच्याशी पण मला नाव सांगा" "पण तुम्ही नाव ऐकून काय करणार?" "ते मी ठरवीन" "तुम्ही कुणाला सांगणार तर नाही" "नाही" "मला वचन द्या" असं म्हणून त्याने हात पुढे केला,मी पटकन त्याच्या हातावर हात ठेवला माझ्या शरीरावर रोमांच उभा राहिला.त्या स्पर्शाची ओढ वाटू लागली मी पटकन हात सोडवला.त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा तसाच शांत होता. "डोंगरे मॅडम" मी हादरले! आस्थापना अधिकारी, दोन मुलांची आई, "नाही काहीतरी चुक होतेय! तुम्ही नीट पाहिलंत?" "हो दुसऱ्या दिवशी काहीच काम नसतांना मला त्यांनी बोलावलं होतं" "कशासाठी?" "मला विचारलं त्यांनी काल लिफ्ट मधे मजा आली का? आली असेल तर मी तुम्हाला आणखी मजा देऊ शकते मी नाही म्हंटल" "ठिक आहे मग तुम्ही जाऊ शकता,पण लक्षात ठेवा ही गोष्ट कुणाला कळता कामा नये,नाहीतर परिणाम वाईट होतील" "मी नाही सांगणार म्हणालो आणि बाहेर पडलो" "का नाही सांगणार? काय करू शकते ती?" "मॅडम त्यांनी उलटी तक्रार केली तर मी बारच्या भावात जाऊ शकतो,कायदा बायकांचेच म्हणणे ऐकतो,कारण अत्याचार बलात्कार, नेहमी बायकांवरच होतात,पुरषाने बलात्काराची तक्रार केलेली ऐकलीय का कधी?" मी सुन्न झाले माझं डोकं जड झाल्या सारखे वाटत होते.त्यानंतर त्याला नाॅर्मल व्हायला महिना लागला आम्ही कामा पुरतेच बोलत होतो.

दरम्यान डोंगरे मॅडमची बदली झाली होती.त्या रायगड जिल्ह्यात गेल्या,त्या दिवसापासून तो नाॅर्मल वाटायला लागला.परत पुर्वीचा प्रशांत दिसायला लागला.यावरून मला जाणीव झाली त्याने काय सोसलं असेल आणि पुरूषांवर पण असे प्रसंग येतात.या सगळ्या गोष्टीत मीही अनाहूतपणे गुंतत गेले आणि आम्ही जास्त जवळ आलो.कधीतरी चहाला बाहेर जायला लागलो,कधी जेवायला,माझ्या मैत्रिणींचा मात्र जळफळाट होत होता,पण मला त्यात आसूरी आनंद होत होता. मधे याने वनरूम किचन फ्लॅट विरारला बुक केला होता,आईला पण मुंबईत आणले होते.सरकारी कार्यालयात स्त्री आणि पुरुष एकत्र दिसले की लगेच जोड्या लावायला सुरुवात होते.तसे कदाचित आमच्या बाबतीतही झाले असेल.काही तथाकथित स्री धुरीण्यांनी मला हे बरोबर नाही. तुझं अजून लग्न व्हायचं आहे,कुणी चौकशीला आले तर पंचाईत होईल,असे सल्ले द्यायला सुरुवात झाली होती.मी आपलं "तस काही नाही आमची जस्ट फ्रेंडशीप,आहे हे सांगून हसायचे पण आतून सुखावत होते.

अधून मधून त्याच्या बरोबरच्या संसाराची स्वप्नेही पहायला लागले होते. त्याचे सोबत असणे,कळत नकळत होणारा स्पर्श.सारे बरे वाटत होते पण जेव्हा सगळे बरे होत असते तेव्हाच नियतीला कहानी मे ट्विस्टचा मूड येतो.तसेच झाले घरी लग्नाची बोलणी सुरू झाली.माझ्या पायाखालची जमीनच सरकली.मी त्याला सांगितले त्याचाही चेहरा पडला,पण तो काहीच बोलत नव्हता.मी वाट पहात राहिले मला कळत होतं तो डिस्टर्ब आहे पण तो काहीच बोलत नव्हता. मी डेस्कमधे मुद्दाम विषय काढायचे मी उद्या जरा लवकर निघणार आहे.आमच्याकडे कांद्यापोह्याचा कार्यक्रम आहे.सगळे म्हणायचे वाह! जा जा लवकर जा हा उठून बाहेर जायचा. ऑफिस सुटल्यावर मला बस पर्यंत सोडायचा.पण बोलायचा काहीच नाही मी रागाने लग्नाला तयार झाले.माझे लग्न ठरले मी पहिली पत्रिका मुद्दाम त्यालाच दिली.हा शांतपणे अभिनंदन म्हणून गप्प राहिला.लग्नाच्या रजेवरून मी ऑफिसात रूजू झाले.माझी बदली आस्थापनेत झाली तेव्हा मला कळले त्याने नागपूरला बदली मागून घेतली.

त्या घटने नंतर पंधरा वर्षाने आज तो उगवला होता.मी हसले बसा म्हंटले.तो गप्पच होता मी विचारले "काय कसं काय चाललंय तुझं ?" "ठिक आहे" कोरडेपणाने म्हणाला मला विचारलं तुम्ही कशा आहात?" मी म्हंटल "मी मजेत आहे, मिस्टर बॅकेत अधिकारी आहेत,दोन मुले आहेत,अंधेरीला मोठा फ्लॅट घेतलाय,गाडी आहे,तुमची मिसेस काय करते? किती मुलं आहेत?" तो खिन्नपणे हसला "लग्नचं केलं नाही तर मुलं कशी होणार?" "का? नाही केलं लग्न" तर म्हणाला "पहिल्यांदा ज्या मुलीशी बोललो,जिच्याबरोबर सुख दुःखाच्या गोष्टी शेअर केल्या,ती दुसऱ्या बरोबर लग्न करून गेली, मग आता लग्न कुणाबरोबर आणि कशासाठी करायचं? केलं तरी कधीतरी आठवण येणार आणि ती सहचारीणीशी प्रतारणाच होणार,एवढं सोपं असतं का विसरणं ? तुम्ही विसरलात का मला?" आता मला राग आला होता "इतकं होतं तर मग त्यावेळी विचारले का नाही?" "मॅडम विचारायचं काय बाकी होतं? तुम्हाला माहित नव्हतं का? आम्ही गावंढळ, तुम्ही हुशार,मला वाटलं मुंबईत ही पद्धतच असेल,दाखवायचे वेगळे अन खायचे वेगळे".....एवढं बोलून तो निघून गेला.

पण माझ्या डोक्यावर घणाचे घाव घालून गेला. बरोबरच होतं त्याचं,तो बोलला नाही, तर मी कुठे बोलले होते ?, आणि मी कुठे त्याला विसरले होते. म्हणजे ही प्रतारणाच झाली?.....

लेखक - दीपक कांबळी

राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी,

महाराष्ट्र राज्य मुंबई - ९९८७१९३३३८