CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

यू. पी. चा कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर गेम - षडयंत्राचाच भाग

CRIME BORDER | 27 December | 02:35 PM

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विकास दुबे हा गुंड होता आणि तो दोषीच असल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे होती,याबाबत कोणतेही दुमत नाही.मात्र त्याला एन्काऊंटर करून त्याचा खात्मा करणे हा प्रकार न्यायोचित तर नाहीच नाही मात्र हा प्रकार म्हणजे फार मोठ्या षड्यंत्राचाच भाग आहे. हैदराबादमधील घटनेतील बलात्कारींचे "झालेले" एन्काऊंटर आणि विकास दुबेचे "करण्यात" आलेले एन्काऊंटर यामध्ये फार मोठा फरक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.ज्याला कायद्याचे ज्ञान नाही आणि ज्याचा कायद्याचे राज्यावर विश्वास नाही तसेच कोणत्याही घटनेकडे उतावीळपणे पाहणारा आणि दिखाव्याची देशभक्ती विचारशून्यतेने दाखवण्याच्या प्रसिद्धीच्या लालसेपोटी जो विकास दुबेचे एन्काऊंटरचे आंधळेपणाने समर्थन करतो आणि "जशास तसे उत्तर" म्हणून अशा घटनेचे स्वागत करतो अशा व्यक्तीचा आणि विकास दुबेच्या "विचारसरणीत" काहीही फरक नाही.

अशा एन्काऊंटरचे समर्थन करणाऱ्यांनी क्षणभर विचार करा की, विकास दुबेच्या जागेवर तोच स्वतः आहे आणि त्याचे सुद्धा अशाच प्रकारे एन्काऊंटर झाले असते तर त्याच्या नातेवाईकांनी,मित्रांनी अगर आम जनतेने असे समर्थन केले तर त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय राहीली असती? म्हणजे विचार शून्यतेने उतावीळपणाने समर्थन करणाऱ्यांची बुद्धी ठिकाणावर येण्यास उशीर होणार नाही.विकास दुबे गुंड होता हे मान्य आहे,मात्र तो हुशार आणि बुद्धिमान होता म्हणूनच तो "महाकालांचे" शरणात आला होता. *"गुंड" होण्यासाठी हुशारी आणि बुद्धिवादी असणे आवश्यक असते.नाहीतरी अश्यांचीच संख्या राजकारणात सन्मानित केली जाते. अशांनाच तिकीट देताना विचारात घेतले जाते.

अगर त्यांच्या ताकदीवर निवडणूक जिंकण्याचे प्रयोग होऊन नंतर त्यांनाच सुरक्षितता देऊन राक्षसाचा ब्रह्मराक्षस निर्माण केला जातो.हे उतावीळपणे समर्थन करणाऱ्यांनी लक्षात घेतले तर बरे होईल.उतावीळपणे प्रतिक्रिया देणारे "गुंड"* नसले तरी ते हुशार आणि बुद्धिवादी असतातच असे नाही. विकास दुबेला त्याचा मृत्यू दिसत होता. त्याला एन्काऊंटर करूनच मारले जाईल याची भणक व खात्री होती म्हणूनच मृत्यूला टाळण्यासाठी त्याने राज्य बदलून दुसऱ्या राज्याच्या माध्यमातून अटक होऊन काही काळ कायद्याच्या सहाय्याने आणि अंतिम क्षणापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याच्या मार्गाने "सुखरूप" रहाणेचा मार्ग त्याने निवडूनच तो "महाकाल" यांचे शरणात आलेला होता.कोणत्याही आरोपीला अटक झाल्यापासून २४ तासाच्या आत न्यायालयात हजर करणे आवश्यक असते त्यानुसार विकास दुबे याचा जाबजबाब घेऊन चेहरापट्टी करून, मेडिकल तपासणी होऊन त्याला "उज्जैन" न्यायालयासमोर हजर करून नंतर त्याला कानपूर पोलिसांच्या ताब्यात देण्या संदर्भातील "रिमांड ट्रान्झिस्ट पास" काढून उत्तर प्रदेशात पाठविण्याचा अगर सोपविण्याचा सोपस्कार झालेला होता किंवा नाही ? किंवा अशी गरज कायद्याने होती किंवा नाही ? या संदर्भातील पुरेसा खुलासा अजून पावेतो कळू शकलेला नाही.

शिवाय एवढा मोठा "गुंड" आणि गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला पोलीस "हाथकडी" (बेड्या) घालत नाहीत ही बाब म्हणजे सरकारचे अपयश मानायचे की तो षड्ययंत्रातील मुख्य भाग समजायचा?आणि नेमका याच गाडीचा अपघात व्हावा,अपघातात पोलीस जखमी व्हावेत,मात्र गुंड विकास दुबे जखमी झालेला नसावा. त्याने पोलीस अधिकाऱ्याची पिस्तोल हस्तगत करावी हा प्रकार सहज घडण्यासारख्या आणि पटण्यासारखा नाही.पोलीस अधिकाऱ्याची पिस्तोल इतकी "असुरक्षित" आणि लहान मुलांच्या खेळण्याप्रमाणे निष्काळजीपणाची दुर्लक्षित करण्याजोगी वस्तू समजावी असे समर्थन करणाऱ्यांचे बाजूने टाळी वाजवून "गुंड" मेला म्हणून पिस्तोल हिरावली गेली तरी त्या गुंडाला मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला "राष्ट्रपती पदक" देऊन सन्मानीत करावे काय ? असेच समर्थन करणाऱ्यांना वाटते काय ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुंड विकास दुबे पळत असताना मारला गेला तर त्याच्या पाठीवर गोळ्या लागण्याऐवजी छातीवरच कशा लागल्या ? तो उलट्या पायाने पळत होता काय ? कमरेखाली पायाला एक गोळी लागून सुद्धा मनुष्याचा पळण्याचा वेग मंदावतो आणि त्याला पकडणे विशेष कठीण नसते.आणि विकास दुबे याने हिरावलेल्या पिस्तोल मधून गोळ्या कोणत्या आणि किती पोलीसांना लागल्या ही माहिती सुद्धा माध्यमातून दिलेली नसल्याने हस्तगत पिस्तोल खरोखरच हस्तगत केले गेले होते काय ? याचाही उलगडा होणे क्रमप्राप्त होणार आहे.

विकास दुबे मारला गेला म्हणून दुःख मुळीच नाही. मात्र त्याच्या मृत्यू सोबतच सर्वपक्षीय पुढारी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे "गुपित रहस्याचा" उलगडा होऊ शकला नाही, याचे शल्य मात्र निश्चितपणे आहे. "क्रुरकर्मा मुलगा" मेला मात्र "क्रुरकर्माची आई" अजूनही जिवंत आहे.तिला मारणार कोण?ही "क्रुरकर्मा आई" पुन्हा शेकडो "विकास दुबेना" जन्माला घालणार आहे ही चिंतेची बाब आहे.विकास दुबे याने ८ पोलीसांना ठार मारल्याची ही पहिलीच घटना किंवा गुन्हा नव्हता तर यापूर्वीचे सुद्धा त्याचे विरोधात डझनावर नव्हे तर ५०/६० गुन्हे होते. प्रत्येकवेळी त्याला वाचविणाऱ्या तत्कालीन पुढाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी म्हणजे या "क्रुरकर्मा मुलाच्या आईनेच" स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच त्याला पायदळी घेऊन त्याचा एन्काउंटर करण्याचा गेम षड्यंत्र रचून करण्यात आला हे कटू सत्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनवलेले कायदे आणि स्विकारलेली घटना या एन्काउंटरच्या घटनेमुळे खल्लास झाली.विकास दुबे सारखेच नव्हे तर तत्सम असणाऱ्या गंभीर गुन्हेगारांना वेळखाऊ कायद्याच्या घटनेच्या माध्यमातून शिक्षा देण्यापेक्षा अशाच पद्धतीने एन्काउंटर करून यमसदनी पाठवून एकाच वेळी "स्वच्छ भारत" करण्यास समर्थन करणाऱ्यांचे मताने हरकत नसावी. मुंबई बॉम्बस्फोट घडविणारे गुन्ह्यातील आरोपी "अजमल कसाब"आणि संसदेवर हल्ला करणारा आरोपी "अफजल गुरू" अगर निर्भया बलात्कार हत्याकांडातील आरोपींना देशाने नाहक वर्षानुवर्षे पोसले,त्यांचे बिर्याणीवर करोडो रुपयांचा खर्च केला,त्यापेक्षा बंद असलेल्या कालकोठडीतच वेगवेगळ्यामार्गाने मारून टाकून अगर एन्काउंटर करून खल्लास केले असते तरी चालले असते.महात्मा गांधी खून खटल्यातील आरोपी नथुराम गोडसे याला तर, गांधीजींचा खून करतांना जगाने पाहिले होते.म्हणूनच नथुराम गोडसे यांना तेथेच एन्काऊंटर करून मारले पाहिजे होते.असे विकास दुबेच्या एन्काऊंटचे समर्थन करणाऱ्यांना रुचले असते काय ?

नथुराम गोडसे यांना न्यायालयीन कारवाईतून का जावू देण्यात आले ? याचेही उत्तर अशा एन्काऊंटरचे समर्थकांना देणे कठीण जाणार आहे. इंदिरा गांधी खून खटल्यातील आरोपी सुद्धा याच न्यायाने कां एन्काऊंटर करण्यात आले नाहीत ? कशाला हवी घटना आणि सुप्रीम कोर्ट? कशाला हवेत वकील? उच्च पदस्थ अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेला निर्णय अगर केलेले कृत्य म्हणजेच न्याय,आरोपी म्हणजेच गुन्हेगार आणि एन्काउंटर म्हणजेच समर्थनीय कार्यपद्धती.अशी धारणा बाळगणार्‍यांना विचारावेसे वाटते की एरवी जागोजागी नेत्यांचे वाढदिवस बॅनर लावून शहर विद्रूप करणारे आपण आज आपल्या शहरात कोरोना संबंधी नागरिकांनी काय काय काळजी घ्यावी याबद्दलचा किती बॅनर लावले ?.अगर दुकान बंद करण्यासाठी आपण जेवढा उत्साह दाखवतो तेवढा उत्साह लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी का दाखवत नाही? देशाच्या सीमा रेषेवर प्राणार्पणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांपेक्षा सुद्धा जास्तीची राष्ट्रभक्ती दाखविणाऱ्या उत्साही उथळ समर्थकांनी आंधळे राष्ट्रप्रेम न दाखवता समतोल,संयमी,डोळसपणे विरोध अगर समर्थन करण्याचा पोक्तपणा स्विकारावा. मा. पंतप्रधान मोदींजीनी भारत-चीन युद्धाच्या कुरुक्षेत्रात "उठवं धैडी नवरा कर" अशी भूमिका गलवान घाटीच्या प्रसंगानंतर अजून पावेतो घेतलेली नसून कुटनीतीचा चक्रव्यूह आणि तेवढीच सावधानतेची व प्रसंगानुरूप कृतीपूर्ण क्षमतेची मोट बांधून डोळ्यात तेल घालून परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे

विकास दुबेला एन्काउंटर करून त्याचा खात्मा करण्यापेक्षा तो जिवंत राहिला असता तर सर्वपक्षीय नेतेगण व उच्चपदस्थ अधिकारी यांच्या मधील लपलेले सर्व "विकास दुबे" उघडकीस येऊन राजकारणातील आणि प्रशासनातील घाण स्वच्छ होण्यास मदत झाली असती हे तेवढेच खरे असून,ही घाण स्वच्छ होवू नये म्हणूनच राजकारणातील सर्वपक्षीय नेते आणि उच्चपदस्थ अशा सर्व कौरवांनी मिळून विकास दुबे हा अभिमन्यू नव्हता आणि नसला तरी औरंगजेब वृत्तीच्या अधिकार कर्त्यानी त्याला तुरुंगात न टाकता औरंगजेबापेक्षाही पुढे जाऊन षड्यंत्र "रचित चक्रव्यूह" रचून विकास दुबेचा एन्काऊंटर करून कायद्याच्या राज्याला आणि घटनेला सुरुंग लावला आहे हे मात्र मान्य करावे लागेल.

लक्ष्मण हि. कदम.-9422787500