CRIME BORDER | 27 December 2025 | 08:05 PM
मी अर्जुन शंकर राणे निवृत्त पोलीस निरीक्षक संगमेश्वर पोलीस स्टेशन ला दुसर्यांदा २००८ ला नेमणूक झाली .तेव्हा एक दिवस सकाळी एक अरूण गवळी नावाचा गुराखी (इथे हे खरे नाव आहे.गँगस्टरचा संबंध नाही) धावत पोलीस स्टेशन ला आला आणि म्हणाला साहेब जाकादेवी मंदिराच्या बाजूला एक लहान मंदिर आहे. त्यात एक लहान बाळ कोणी तरी ठेवून गेले आहे. बाळ जोरजोरात रडत आहे .आवाज आला म्हणून पाहून आलो जवळपास कोणीही नाही.असे सांगितल्याने आम्ही सर्व जण तात्काळ जाग्यावर पोहोचलो. संगमेश्वर जाकादेवी म्हणजे जागृत देवस्थान संपूर्ण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.त्याच मंदिराच्या बाजूला एक लहान देवीचे मंदिर आहे. दरवाजा उघडा होता. आत एका कपड्यात गुंडाळलेले सुमारे तीन ते चार महिन्याचे गोंडस बाळ होते. खात्री केली तेव्हा तो ३ ते ४ महिन्याचा मुलगा होता.गालावर काळ्या काजळाची तीट लावली होती गळ्यात काळ्या दोऱ्यामध्ये गणपती चे पिवळ्या धातूचे लाॅकेट त्यामुळे बाळ आणखीन च गोंडस दिसत होते. आमच्या टीममधील प्रत्येक कर्मचारी बाळाला उचलून घ्यायला उतावीळ झाला होता. पण
बाळाला भूक लागली होती म्हणून ते रडत होते आमच्या टीममधील मिलिंद चव्हाण आणि सचिन घाग दोघेजण दुधाची व्यवस्था करण्यासाठी पळाले .आम्ही पोलीस स्टेशन ला येईपर्यंत मिलिंद आणि सचिन दुधाची बाॅटल आणि गाईचे दुध घेऊन हजर झाले. बाळाला महिला पोलीस च्या ताब्यात दुध पाजण्यासाठी दिले .बाळ दुध पिल्यावर खेळायला लागले सर्व कर्मचारी बाळाभोवती जमा होवून बाळाचे कौतुक करत होते काहीजण बाळाला सोडून जाणार्याला शिव्या देत होते.
मी बाळाला सरकारी हाॅस्पीटलमध्ये नेवून तपासणी करून घेतली व डॉक्टरांचे सल्ल्यानुसार सिव्हील हाॅस्पिटलमध्ये स्वतंत्र बाल विभागात दाखल केले. अज्ञात पालकांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला व मा .बालन्यायालयात रिपोर्ट पाठवून तपास सुरु केला .पोलिस स्टेशन मधील प्रत्येक कर्मचारी तपासात जुडला होता.
दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात बातमी छापून आली . त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बातमी पसरली जसे पोलिस तपासात जुडले होते तसेच संगमेश्वर मधील सर्व पत्रकारही आपापल्या परीने तपास करीत होते. मला संगमेश्वर मधील सर्व पत्रकारांचा अभिमान वाटतो कारण ते नेहमी पोलीसांच्या बरोबरीने काम करायचे त्यामुळे आमच्याकडून सुद्धा काही समाज उपयोगी कामे झाली.
दुसऱ्या दिवशी एक जोडपे माझ्या कडे आले त्यानी बाळाबाबत चौकशी केली आणि आपली माहीती सांगितली. बाळ दत्तक घेण्यासाठी काय करावे लागेल .म्हणजे प्रोशिजर काय आहे. मी आवश्यक ती माहिती पुरवली.
तिसऱ्या दिवशी मा . न्यायालयाने मला बोलावून गुन्ह्याच्या तपासाबाबत प्रगती विचारली व बाळ दत्तक घेण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल झाल्याचे सांगितले. कोणाचे अर्ज याबाबत गोपनीयता ठेवली .
मी बाळ कोठे सापडले कोणत्या परिस्थितीत सापडले .आणि ज्या परिस्थितीत सापडले त्यावरून ठेवणार्याचा हेतु याबाबत माहिती दिली.
न्यायालयाचा आदेश होईपर्यंत मी आणि माझे सहकारी कर्मचारी रोज सिव्हील हाॅस्पिटलमध्ये बाळाला पहाण्यासाठी जात होतो .बाळाची प्रगती पहात होतो. हाॅस्पीटलमधील स्टाफकडून बाळाचे कौतुक ऐकत होतो.
आठव्या दिवशी मा . न्यायालयाच्या आदेशाने बाळ आम्हाला अपेक्षित असलेल्या जोडप्याच्या ताब्यात दत्तक म्हणून दिले .आम्हा सर्वांना अतिशय आनंद झाला कारण बाळाच्या भविष्याच्या दृष्टीने ते चांगले होते.
माझा संगमेश्वर पोलीस स्टेशन चा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होवून माझी बदली मुख्यालयातील एका शाखेत झाली.
तेथे काम करीत असतांना माझी आई एका गंभीर आजाराने आजारी झाली. तिला एका नामांकित हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यामुळे मी हाॅस्पिटलमध्ये होतो. अचानक बाळ दत्तक घेतलेले जोडपे बाळासह माझ्या समोर येवून उभे राहिले. ते आईला पाहून आले. नंतर आम्ही गप्पा मारत बसलो बाळाची प्रगती पाहून आणि बोबडे बोल ऐकून फारच आनंद झाला. बाळाला मी माझ्या कडे बोलवले परंतु ते आपल्या आईला बिलगले कारण त्याच्या दृष्टीने मी त्याला अनोळखी होतो
मी म्हणालो कसे काय चाललंय? तेव्हा बाळाचे वडील म्हणाले फारच छान चालले आहे. दिवस कसा निवून जातो ते समजत नाही. घरात बरीच वर्षे बाळ नसल्यामुळे चिडाचीड व्हायची आता घरात बाळ आल्यापासून त्याचे सगळे करताना त्याचे बोबडे बोल ऐकताना त्याच्या छोट्या पावलांच्या मागून पळताना अतिशय आनंद होतो .पत्नी तर बाळाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी सोबत घेऊन जाते .दुसर्या कोणावर सोपवत नाही. देवाने आमच्या वर कृपा केली.
मी गंमतीने विचारले साहेब देव कधी दिसला का हो ?
त्यावर ते म्हणाले हो मला देव दिसला .
मी म्हणालो कसा होता?
ते म्हणाले तुमच्या सारखा होता. ते गृहस्थ मला म्हणाले साहेब तुम्हाला कधी देव दिसला काहो ?
मी म्हणालो हो आताच तुमच्या समोर क्षणभर डोळे मिटले तेव्हा देव दिसला तो तुमच्या दोघांसारखा होता. सरकारी नोकरी करीत असताना आपल्या छोट्याशा कामांने एखाद्याच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद निर्माण करण्याची संधी परमेश्वराने तुमच्या रूपाने
मला दिली तो परमेश्वर तुमच्या सारखाच असणार .आम्ही भरपूर हसलो.
अर्जुन शंकर राणे - निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक - मोबा.8380089191