CRIME BORDER | 27 December 2025 | 08:05 PM
पडद्यावर किंवा स्टेजवरील अभिनयातून स्टंटबाजी करत खलनायकांना ( खोट्या ) नेस्तनाबूत करणे म्हणजे तो कधीच खरा हिरो होवू शकत नाही...ते केवळ काही काळापुरते मनोरंजनच करणारे असते...पण,वास्तव जीवनात मात्र समाजाला घातक ठरणा-या गोष्टींचा बिमोड करत सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी जे विविध माध्यमातून प्रयत्न करतात, ते म्हणजे खरे हिरो असतात...याचा प्रत्यय आजच्या घडीला कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि केवळ जनतेचा जीव वाचावा ,म्हणून गरजूंना आरोग्य सुविधा देतानाच प्रत्येक प्रभागात नियमित स्वच्छतेबरोबर औषध फवारणी,लाँकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवणे असे अनेक मोठ्या धाडसाने काळ वेळ न पाहता आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणा-या प्रशासनातील आरोग्य विभाग ,पोलिस विभागातील अधिकारी,कर्मचा-यांच्या कार्यातून येत आहे...यामध्ये जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे ,यासाठी जनतेमध्ये जागरुकता आणणे,गरीब व गरजूंना मोफत जेवण ,धान्य आणि मास्क ,सँनिटायझरचे वाटप ,सँनिटायझर कक्षाची उभारणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत सामाजिक बांधिलकी
जोपासणा-या सामाजिक संघटना, संस्था,प्रसारमाध्यम आणि जागरुक नागरिकांचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे , हे कुणीही नाकारु शकत नाही...सध्याच्या बिकट परिस्थितीत डॉक्टर, नर्सेस ,आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तर युध्दभूमीवर थांबून कोरोनारुपी शत्रूशी दोन हात करताना त्याला पुरते नेस्तनाबूत करत दाखवत असलेली हिंमतीची लढवय्या भूमिका तर नक्कीच अफलातून आणि थक्क करणारी आहे...हे लढवय्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून केवळ जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत, निदान एवढी जाणीव ठेवून तरी त्यांना सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे ( उदा.घराबाहेर न पडणे ,गर्दी टाळणे ,मास्क व सँनिटायझरचा वापर करणे ) काटेकोर पालन करुन सहकार्य करण्याची खरी गरज आहे...
कोरोनारुपी देशावरील हे मोठे संकट केवळ स्वयंशिस्त पाळूनच आपण टाळू शकतो आणि यासाठी सर्वांनी जागरुक राहण्याचं गांभिर्य दाखवलं तरच तो समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अविरत झटणाऱ्या या ख-या हिरोंच्या कर्तव्यनिष्ठ कार्याला खरा मनापासून सलाम ठरणार आहे...
- सागर बाणदार