CRIME BORDER | 27 December | 02:39 PM
मी अर्जुन शंकर राणे निवृत्त पोलीस निरीक्षक २००६ मध्ये मी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन ला नेमणूकीस होतो तेव्हा ची गोष्ट.एक दिवस एक आदिवासी समाजाचे एक इसम सोबत तथाकथित पुढाऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्याची तक्रार होती की,त्यांचे दोन रेडे एका इसमाने चोरून नेले.
मी म्हणालो तुम्ही ज्या माणसाचे नाव सांगता ते त्यानेच नेले कशावरून ?ते म्हणाले आम्ही त्याच्या गोठ्यात जाऊन पाहून आलो. मला थोडी शंका आली. म्हणून संबंधित इसमाला बोलावून आणायला पोलीसाला पाठवले.थोड्या वेळात संबंधित इसम गावातील पोलीस पाटीलसह पोलीस स्टेशन ला हजर झाले .त्या इसमाला विचारले की तुम्ही ह्या माणसाचे दोन रेडे (जनावरे) चोरून नेले अशी ह्यांची तक्रार आहे. त्यावर ते इसम म्हणाले साहेब ती दोन्ही जनावरे (रेडे) माझी आहेत. एक वर्षापूर्वी चरण्यासाठी सोडले ते परत आले नाहीत. माझी सर्व शेती त्यांच्यावरच अवलंबून होती मी आणि माझ्या गावातील लोकांनी त्यांचा खूप शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. महिनाभर शोध घेतल्यावर आम्ही असा समज करून घेतला की,आपली दोन्ही जनावरे कसायाच्या ताब्यात गेली,आता आपल्याला सापडणे कठीण आहे असे समजून निराशेने शोध घेणे बंद केले.
दोन दिवसापूर्वी पोलीस पाटील स्वतः मला सांगायला आले की तुमचेे वर्षापूर्वी चुकलेले दोन्ही रेडे परत आले आहेत,माझ्या घराच्या मागे चरत आहेत. असे सांगितल्याने मी खात्री करण्यासाठी पोलीस पाटील यांच्यासह त्यांच्या घराकडे निघालो तोपर्यंत दोन्ही रेडे आमच्या गोठ्याजवळ आले ते माझेच होते. मी गोठ्याचा दरवाजा उघताच दोन्ही रेडे गोठ्यात जाऊन आपापल्या पूर्वीच्या जागेवर जाऊन उभे राहिले. ते दोन्ही रेडे माझेच आहेत मी कोणाचेही चोरलेले नाहीत.आदिवासी इसम म्हणाला ते दोन्ही रेडे माझेच आहेत मी चार वर्षांपूर्वी विकत घेतले आहेत.आता आमच्या पुढे प्रश्न पडला की एकाच रेड्यांच्या जोडीवर दोघेजण हक्क सांगत होते. मी पाटलांना दोन्ही जनावरे पोलीस स्टेशनला आणायला सांगितली. गोरेगाव पोलीस स्टेशनची इमारत एकांतात होती.बाजूला मोकळे रान,जंगल आणि स्मशान भूमी त्यामुळे पोलीस स्टेशन च्या परिसरात निरव शांतता होती. पाटलांनी दोन्ही जनावरे आणून पोलीस स्टेशन जवळ झाडाला बांधून ठेवले.
आदिवासी इसमाला म्हणालो तुम्ही ज्या माणसाकडून रेडे विकत घेतले त्या माणसाला घेऊन येवू शकता का? ते म्हणाले आणतो. तेवढ्यात आदिवासी इसमासोबत असलेल्या पुढाऱ्याने आदिवासी इसमाला चिमटा काढला. त्याबरोबर तो म्हणाला साहेब मला ह्या माणसाने कातकरी म्हटले म्हणून माझी तक्रार घ्या.मी म्हणालो घेतो ,आधी तुम्ही,मी सांगितलेल्या माणसाला घेऊन या.दुसऱ्या दिवशी आदिवासी इसम संबंधित इसमाला घेऊन आले. तोपर्यंत रेड्यांना पाटलांनी पुरेसे गवत (चारा)आणून घातले होते .आदिवासी इसमा सोबत आलेल्या इसमाला मी म्हणालो,तुम्ही ह्याना रेड्याची जोडी विकत दिली होती का?त्यावर ते म्हणाले मी दोन वर्षापूर्वी ह्या माणसाला रेड्याची जोडी विकत दिली होती.पुढे मी वर्णन विचारून माहिती घेतली तेव्हा दोन वर्षापूर्वी विकलेले रेडे लहान तीन वर्षाचे होते,मी आताही ओळखू शकतो.
मला तेवढेच निमित्त मिळाले. त्याला रेडे बघून यायला सांगितले. तो परत येवून म्हणाला साहेब,मी नाही ओळखू शकत . मी त्याला म्हणालो ह्या रेड्यांचे वय नऊ वर्षे आहे. दोन वर्षात एवढी वाढ होवू शकत नाही.एवढे सगळे झाले तरी दोन्ही पार्टी आपल्या म्हणण्यावर ठाम.पाटील म्हणाले दोन्ही जनावरे माझी आहेत. आदिवासी इसम म्हणतो दोन्ही जनावरे माझी आहेत.माझ्या समोर मोठा प्रश्न पडला. पाटलांच्या बाजूने थोडेसे माप झुकत होते परंतु आदिवासी इसमाजवळ एक हुकमी हत्यार होते ते म्हणजे रेडे पाटलांना दिले तर पाटलाच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा .रेडे आदिवासी इसमाच्या ताब्यात दिल्यास त्यांची काही तक्रार नाही.आदिवासी इसमाच्या सोबतचा पुढारी अधून मधून चिमटा काढायचा की, तो ताबडतोब म्हणायचा साहेब ह्याने मला कातकरी म्हटले.
इथे वाचकांना आवर्जून सांगावेसे वाटते की,रायगड जिल्ह्यात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना मुळ विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेक सामाजिक संघटना निस्वार्थ भावनेने काम करीत आहेत त्यात्यांना बऱ्याच प्रमाणात यशही आले आहे. परंतु आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेणारे सुध्दा भरपूर आहेत.
पाटलांकडून माहिती घेतली की, आदिवासी इसमाला ओळखता का ?ते म्हणाले मी ह्यांना पहिल्यांदाच पाहीले.आदिवासी इसमाला म्हणालो तुमची तक्रार घेणार पण त्या अगोदर ही जनावरे कोणाची आहेत ती ठरवतो. मी दोघांनाही म्हणालो, आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत. तुम्ही दोघांनाही आपापल्या घरी निघून जायचे.मी बरोबर रात्री बारा वाजता दोन्ही जनावरांना सोडून देणार ज्याच्या गोठ्यात जनावरे जातील त्याने तात्काळ पोलीस स्टेशन ला कळवायचे आहे. असे सांगून दोघांनाही पाठवले.
रात्री बरोबर बारा वाजता दोन्ही जनावरांना सोडून दिले. सकाळी सहा वाजता पाटील मला उठवायला आले." साहेब,दोन्ही रेडे पहाटे सव्वा चार वाजता माझ्या गोठ्यात येऊन बसले. मला यायला गाडी नसल्याने उशीर झाला. पहिल्या एस् टी ने आलो.अशा प्रकारे ज्याची जनावरे होती त्याची त्याला मिळाली. पुढे मी असेपर्यंत कोणाची तक्रार आली नाही.
व.पो.निरी अर्जुन राणे-(से.नि) मोबा . 8380089191